6 एप्रिल रोजी हनुमान जन्मत्सोव (Hanuman Jayanti) सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. यासाठी श्री हनुमानाच्या मंदिराची सजावट सुरु आहे. देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. त्यासाठी आठवड्याभरापासून हनुमान चालीसा आणि अन्य मंत्रोत्सव सुरु होतो. हनुमानाच्या नामात प्रयागराज येथील मंदिरही असेच सजवण्यात येत आहे. उत्तरप्रदेश, प्रयागराज येथील बडे हनुमानाचे स्थान हे जागृत स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. प्रयागराज येथे येणार सर्वच भाविक या मंदिराला भेट देतात. अत्यंत जागृत स्थान म्हणून या मंदिराचा महिमा आहे. झोपलेल्या स्थितीतील येथील हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी रोज हजारो नागरिक येथे येतात. त्यात हनुमान जन्मोत्सवासाठी लाखोंची गर्दी या ठिकाणी होईल असा अंदाज पुज-यांनी व्यक्त केला आहे.(Hanuman Jayanti)

प्रयागराज, उत्तर प्रदेश, भारत येथे असेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे श्री हनुमानाची झोपलेल्या स्थितीतील मुर्ती. मंदिराच्या गर्भगृहात असलेली ही मुर्ती तब्बल 8.10 फूट खाली आहे. प्रयागराजच्या संगमावर असलेल्या या हनुमान मंदिराची अनेक नावांनी ओळख आहे. बडे हनुमान जी, किल्ले हनुमान जी, लेटे हनुमान जी आणि दम वाले हनुमान जी अशी नावं या मंदिराला आहेत. येथे जमिनीच्या खाली हनुमानजींची मूर्ती पडलेल्या स्थितीत आहे. हनुमानानं एका हाताने अहिरवाणाला आणि दुसऱ्या हाताने दुस-या राक्षसाला धरले आहे. (Hanuman Jayanti)
या हनुमानाला प्रयागराजचे कोतवाल असेही म्हटले जाते. प्रयागराजचे स्थानिक येथे कोतवाल हनुमान म्हणतच पुजा करतात. विशेषतः महाकुंभमेळाव्यामध्ये येथे जास्त गर्दी होते. कारण या मंदिरात हनुमानाचे दर्शन घेतल्यावर महाकुंभात स्नान केल्यास यात्रा पूर्ण झाली असे मानण्यात येते. हनुमानजींच्या या मूर्तीची लांबी सुमारे 20 फूट आहे. मंगळवार आणि शनिवारी येथे हनुमान भक्तांची मोठी गर्दी असते. हनुमान कधीही आपल्या भक्तांना निराश करत नाहीत असे म्हणतात. त्यामुळे या मंदिरातील भक्तांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.(Hanuman Jayanti)
पावसाळ्यात जेव्हा गंगा नदीला पूर येतो, तेव्हाही या हनुमानाच्या देवळात भाविकांची गर्दी होते. गंगा हनुमानाच्या दर्शनासाठी आल्याचे तेव्हा सांगितले जाते. पावसाळ्यात पूर येतो, म्हणजेच गंगा हनुमानाला नमस्कार करते आणि मग तिचे पाणी कमी होते. गंगा आणि यमुनेचे पाणी वाढले की, हे दृश्य पाहण्यासाठी दूरदूरहून लोक येतात. याबाबत स्थानिक नागरिक सांगतात की, हनुमानजींचे गंगेत स्नान करणे हे भारत भूमीसाठी सौभाग्याचे सूचक मानले जाते. त्यामुळे मंदिरात गंगेच्या पाण्याचा प्रवेश झाल्यास तो शुभशकून मानण्यात येतो. त्यामुळे प्रयाग आणि संपूर्ण जगासाठी ते वर्ष चांगले जाईल असे मानण्यात येते.(Hanuman Jayanti)
या मंदिराच्या स्थापनेबाबत अनेक आख्यायिका आहेत. एका स्थानिक आख्यायिकेनुसार एक श्रीमंत व्यापारी आपल्या बोटीत हनुमानाची भव्य मूर्ती घेऊन जात होता. जेव्हा ही बोट प्रयागराज जवळ पोहोचला तेव्हा व्यापा-याची बोट हळूहळू जड होऊ लागली. बोट एवढी जड झाली की, संगमाजवळ आल्यावर वजनामुळे गंगा नदीच्या पाण्यात बुडाली. यानंतर व्यापा-यानं हनुमानाची मुर्ती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण मुर्तीच्या आकारानं खूप प्रयत्न केल्यावरही पाण्यातून ही मुर्ती बाहेर काढता आली नाही. शेवटी व्यापा-यानं तो प्रयत्न सोडून दिला. नंतर काही काळानं या भागातून गंगा नदी दूर गेली. तिचा प्रवाह बदलला आणि पाण्याखाली गेलेली हनुमानाची मुर्ती वर आली. ही हनुमानाची मुर्ती प्रकट झाल्यावर स्थानिकांनी येथे मंदिर बांधले. तेव्हापासून पावसाळ्यात गंगा नदी या मंदिरापर्यंत येते अशी मान्यता आहे. (Hanuman Jayanti)
=======
हे देखील वाचा : 400 वर्षांनंतर कटोच राजघराण्यामध्ये राज्याभिषेक
=======
या मंदिराबाबत आणखी एक कथा सांगितली जाते. 1582 मध्ये जेव्हा अकबर आपल्या साम्राज्याचा विस्तार करत होता, तेव्हा तो या मंदिराच्या परिसरात आला. मानगड, अवध, बंगालसह पूर्व भारतात सुरू असलेले बंड शांत करण्यासाठी अकबराने येथे एक किल्ला बांधला. या किल्ल्यात त्यानं हनुमानाची मुर्ती ठेवण्याचा प्रयत्न केला. हजारो मजुर त्यासाठी काम करत होते. पण मूर्ती जागेवरून हलली नाही. असे म्हणतात की, त्याच वेळी हनुमानजींनी अकबराला स्वप्नात येऊन आपण कुठेही जाणार नाही असे सांगितले. यानंतर अकबराने हे काम थांबवले आणि आपला पराभव मान्य केला. त्यानंतर अकबराने मंदिराच्या मागे आपल्या किल्ल्याची भिंत उभारली. अकबराने येथे खूप मोठी जमीन हनुमानाच्या सेवेसाठी अर्पण केली. याच बडे हनुमान मंदिरात हनुमान जन्मत्सोव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सहा तारखेच्या या उत्सवासाठी हजारो नागरिकांना प्रसाद देण्यात येतो. त्यासाठी तयारी सुरु असून देशभरातून हनुमान भक्त या सोहळ्याला येणार आहेत.
