युद्धाच्या कथा रम्य असतात असं आपण नेहमी म्हणतो आणि ऐकतो. प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ अशी आपण जर इतिहासाची काळानुसार विभागणी केली, तर आपल्याला आढळेल की, अगदी समस्त इतिहासात कुठली एक गोष्ट वारंवार घडत असेल, तसंच कुठली एक गोष्ट शाश्वत असेल, तर ती आहे युद्ध आणि युद्धच. यावर कोणाचही दुमत होणार नाही. मग तो इतिहास अगदी रोमन असो, ग्रीक असो, चीनचा असो. थोडक्यात कुठलाही असो, पण याला अपवाद फक्त भारताचा आहे.
भारताने स्वतःच्या साम्राज्यविस्तारासाठी कधीही कोणावरही युद्ध लादलं नाही, हे विशेष आहे. साम्राज्यवाढीसाठी, त्याच्या विस्तारासाठी, महत्वाकांक्षेसाठी, अजरामर होण्यासाठी इतिहासात युद्ध लढली गेली. यात एकाचा जय तर दुसऱ्याचा पराजय. अगदी आजच्या काळातलं उदाहरण घ्यायचं म्हणजे रशिया आणि युक्रेनमधलं युद्धं.

पुतीन यांचा उद्देश हा साम्राज्यविस्ताराचा आहे, तर यूक्रेनला वाचवण्यासाठी पश्चिमी जग पुढे सरसावलं आहे. तर अशी ही आहे युद्ध लढण्यामागची प्रेरणा. बरं ही युद्ध दीर्घ काळासाठी लढली गेल्याचीही उदाहरण आहेत. आधुनिक जगातलं विसाव्या शतकातलं उदाहरण घ्यायचं झाल्यास पहिलं आणि दुसरं महायुद्धाची घेता येतील.
ही युद्धं अनुक्रमे अगदी चार चार वर्ष चालली. पण तुम्हाला जर सांगितलं की नोंद ठेवलेल्या इतिहासात सगळ्यात कमी काळ लढलेलं युद्ध (shortest war) पण आहे? तर हो! असंही एक युद्ध आहे जे खूप कमी वेळ चाललं. ते आहे ब्रिटिश साम्राज्य आणि झांजीबार यांच्यातलं.
तुम्ही अंदाज लावू शकता का? म्हणजे किती काळ हे युद्ध चाललं असेल (shortest war)? ब्रिटन आणि झांजीबार या दोघांमधलं युद्ध चाललं केवळ चाळीस मिनिटं. युद्धाची तारीख आहे २७ ऑगस्ट १८९६.

ब्रिटिश साम्राज्य, विस्तारासाठी आतुर होतं, व्यापारासाठी नवीन नवीन वसाहती स्वतःच्या साम्राज्यात घेऊन मग वसाहतींमधला कच्चा माल स्वदेशात नेऊन त्यापासून वस्तूंची निर्मिती केली आणि त्या वस्तू ब्रिटिश वसाहतींमध्ये विकण्याच्या करामती केल्या. यात आपल्या भारताचं ज्वलंत उदाहरण आहे. अशाच काहीशा उद्देशाने ब्रिटनने पूर्व अफ्रिकन बेट असलेल्या झांजीबार सलतनत बरोबर युद्ध केलं.
झांजीबारचा सुलतान मृत्यू पावल्यानंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा राजकुमार ‘खालिद इब्न बरघाश’, याने ब्रिटिश सत्तेच्या हातात सूत्र देण्याच्या मुद्द्यावरून आणि ब्रिटनच्या मर्जितला राजा निवडण्यावरून ब्रिटिशांबरोबर थेट युद्धच केलं. (shortest war)
खालिदने ३००० सैनिक ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी जमवले, यात सुलतानचे खास सरदार, सैनिकसुद्धा होते. तसंच एक जहाजसुद्धा त्यांच्या दीमतीला होतं. तर इकडे ब्रिटिशांनी ४०० झांजीबारी एकनिष्ठ सैनिक आणि ब्रिटिश मरीन्स जमा केले. त्यांच्या दिमतीला चार रॉयल युद्धनौकासुद्धा बंदरात हजर होत्या.
====
हे देखील वाचा: 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट – अशी गवसली मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपासाची ‘किल्ली’
====
इकडे खालिदने राजवाडा सोडण्यास नकार दिला आणि युद्ध लढण्यासाठी तो तयार झाला. ब्रिटिशांनी आधी शरण येण्याचा खलिता खालिदला पाठवला, पण त्याने नकार दिल्यानंतर ब्रिटिश आरमाराचा रियर अडमिरल रॉसनने एच एम एस रकून, थ्रश आणि स्पॅरो युद्धनौकाना राजवाड्यावर हल्ला करण्याचं फर्मान काढलं.
झालं… ब्रिटिश युद्धनौका अक्षरशः आग ओकू लागल्या. हा प्रकार चाळीस मिनिटं चालला. यादरम्यान खालिदचे साधारण ५०० सैनिक मारले गेले, तर दुसरीकडे ब्रिटिशांचा केवळ एक सैनिक जखमी झाला. शेवटी ब्रिटिशांसामोर खालिदने शरणागती पत्करली. (shortest war)
याचा थोडा इतिहासपण इथे लक्षात यावा लागेल. बरघाशसमोर युरोपीयन सत्तानी सुरवातीला पर्याय ठेवले. त्याला सांगितलं की, “तुझ्या साम्राज्याच्या भागांचे तुकडे करून त्यांची विभागणी करून त्यांना ब्रिटन आणि जर्मनीकडे दे.”
====
हे देखील वाचा: व्हेटो पॉवर (Veto Power) – आंतरराष्ट्रीय राजकारणात सत्ता गाजवण्यासाठी वापरलं जाणारं साधन!
====
त्यानुसार खालिदने मेनलँड जर्मनिकडे, तर बेटाचा काही भाग ब्रिटिशांकडे देण्याच्या निर्णयाला संमती दिली. तसंच त्याला दोन गोष्टी मान्य करण्याचे सांगितले. एक म्हणजे गुलामीची पद्धत बंद करावी आणि दुसरं व्यापारासाठी अर्थव्यवस्था पूर्वीप्रमाणे खुली करावी.
तसंच यापुढच्या सुलतानाकडे राज्यकारभारात कमी अधिकार असतील आणि ब्रिटिशांकडे ज्यास्त अधिकार असतील. याला त्याने विरोध केला. त्याच्याजागी ब्रिटिशांनी हमाद नावाच्या व्यक्तीला गादीवर बसण्यासाठी पाठिंबा दिला, आणि अशा परिस्थितीत युद्धाचा अटळ पर्याय समोर होता. (shortest war)
अशाप्रकारे केवळ अगदी काही मिनिटांचं युद्ध दोघांमध्ये होऊन त्याची परिणीती ब्रिटिश जिंकण्यात झाली. अश्या या इतिहासाच्या नोंदीमध्ये सगळ्यात कमी काळ चाललेलं युद्ध म्हणून ब्रिटिश – झांजीबार युद्धाचं नाव घेतलं जातं.
१९६३ साली झांजीबारला ब्रिटिशांची प्रोटेकटोरेट म्हणून मुक्त करून स्वातंत्र्य देण्यात आलं. आज झांजीबार हा टांझानियाचा स्वायत्त प्रदेश आहे.
-निखिल कासखेडीकर