Home » या दोनच महिलांना ‘अशोक चक्र’ मिळालाय !

या दोनच महिलांना ‘अशोक चक्र’ मिळालाय !

by Team Gajawaja
0 comment
Ashok Chakra
Share

हिंदी साहित्यात एक प्रसिद्ध कवी होऊन गेले आहेत, मैथिलीशरण गुप्त त्यांच्या कवितेच्या काही ओळी आहेत, विचार लो कि मर्त्य हो न मृत्यु से डरो कभी¸ मरो परन्तु यों मरो कि याद जो करे सभी ! मृत्यू असा असावा की इतिहासाने तो कधीही विसरला नाही पाहिजे. बलिदान आणि भारत या गोष्टींचा संबंध हजारो वर्ष जुना आहे. अगदी पौराणिक काळापासून स्वातंत्र्य लढ्यामध्येही भारतात अनेक स्त्रियांनी बलिदान दिल्याचा उल्लेख आढळतो. मातृभूमीसाठी बलिदान देण्याचा आपल्या महान महिलांचा हा वारसा आजही कायम आहे. भारतीय संरक्षण क्षेत्रात शांतीकाळातला सर्वोच्च शौर्य पुरस्कार म्हणजे ‘अशोक चक्र’. आतापर्यंत ८३ वीरांना त्यांच्या धाडसासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजपर्यंत केवळ दोनच महिलांना ‘अशोक चक्र’ मिळाला आहे. त्या म्हणजे नीरजा भनोत आणि कमलेश कुमारी यादव ! पण या दोघींचाही पराक्रम येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असा आहे. (Ashok Chakra)

५ सप्टेंबर १९८६ नीरजा भनोत एअर होस्टेस म्हणून पॅन एम या कंपनीत काम करत होती. ५ सप्टेंबरला मुंबईहून निघालेलं विमान कराची इथे दहशतवाद्यांकडून हाय Jack करण्यात आलं. यानंतर पायलट आणि इंजिनिअर घाबरून पळून गेले. त्यामुळे प्रवाशांचं संरक्षण करण्याचा निर्णय थेट निरजानेच घेतला. त्यावेळी विमानात तिच्यासोबत इतर एअर होस्टेससुद्धा होत्या, मात्र प्रवाशांसाठी कोणीच पुढे येत नव्हतं. अखेर निरजाला पाहून त्यादेखील पुढे आल्या आणि दहशतवादी ज्या ज्या गोष्टी सांगत आहेत, त्याचं पालन करण्याचं त्यांनी ठरवलं. मात्र यावेळी उडालेल्या गोंधळात दहशतवाद्यांनी एका अमेरिकन नागरिकाची हत्या केली. दहशतवादी केवळ अमेरिकन नागिरकांची हत्या करण्याच्या उद्देशाने आल्याचं कळताच निरजाने १९ अमेरिकन प्रवाशांचे पासपोर्ट लपवून ठेवले. अनेक प्रयत्न करूनही दहशतवाद्यांना अमेरिकन प्रवाशांचा मागमूस तिने लागू दिला नाही. (Social News)

दहशतवादी सतत प्रवाशांवर आणि एअर होस्टेसेसवर ओरडत होते, जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. मात्र निरजाने प्रवाशांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता. १७ तासानंतर नीरजाच्या योजनेनुसार विमानातील लाईट बंद करण्यात आल्या. लाईट बंद झाल्याचे कळताच दहशतवाद्यांनी अंधाधुन गोळीबार करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान निरजाने अचानक आपत्कालीन दरवाजा उघडला आणि प्रवाशांना बाहेर पडायला मदत केली. यावेळी झालेल्या चकमकीत सर्व प्रवासी निसटले. मात्र विमानावर राहिलेल्या तीन लहान मुलांना वाचवताना निरजाला तीन गोळ्या लागल्या. गोळ्या लागूनही तिने कसंबसं मुलांना विमानाबाहेर काढलं. पण या लढ्यात तिचा जीव वाचू शकला नाही. वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी इतर लोकांच्या रक्षणासाठी तिने बलिदान दिलं. तिने वाचवलेल्या तीन मुलांपैकी एक मुलगा आज पायलट झालाय. निरजाबाबत बोलताना त्याने एकदा म्हटलं होतं की, ‘माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर नीरजाचाच हक्क आहे.’ तिच्या या पराक्रमासाठी भारत सरकारने तिचा मरणोत्तर अशोक चक्र या पुरस्काराने सन्मान केला. नीरजा भारतातील सर्वात लहान वयाची अशोक चक्र पुरस्कार विजेती आहे. मानवतेसाठी दिलेल्या बलिदानामुळे पाकिस्तान आणि अमेरिका या देशांनीही तिचा विरता पुरस्कार देऊन गौरव केला होता. (Ashok Chakra)

१३ डिसेंबर २००१ दिल्लीतील संसद भवनावर लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मुहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यावेळी दहशतवाद्यांनी जाणीवपूर्वक भारतीय सेनेचा युनीफॉर्म घातला होता. याच कारणाने त्यांना कोणीही ओळखू शकलं नाही. यावेळी सीआरपीएफच्या बटालियनमधल्या महिला कॉन्स्टेबल कमलेश कुमारी या देखील त्या ठिकाणीच तैनात होत्या. दहशतवाद्यांनी संसदेच्या बाहेर आपली गाडी थांबवली आणि अनेक शस्त्र घेऊन ते संसदेच्या आत जाण्याची तयारी करत होते. यावेळी सर्वप्रथम कमलेश कुमारी यांनीच दहशतवाद्यांना पाहिलं होतं, सुरुवातीला त्यांना हे भारतीय सैन्य असल्याचेच वाटले, मात्र त्यांच्याकडे एके-47, ग्रेनेड आणि इतर शस्त्रही होते. त्यामुळे कमलेश यांना संशय आला. संसद भवनाच्या गेट क्रमांक ११ वर त्या तैनात होत्या. याच वेळी हे दहशतवादी गाडीतून उतरून संसद भवनाच्या दिशेने निघाले. त्यावेळी कमलेश यांच्याकडे कोणतही शस्त्र नव्हतं, फक्त एक वॉकी-टॉकी होती. त्यांनी हिम्मत न हारता बहादुरीने जोरजोरात आवाज देत कॉन्स्टेबल सुखविंदर सिंह यांना दहशतवादी आल्याच्या सूचना दिल्या. आपल्या जीवाची पर्वा न करता कमलेश यांनी वॉकी-टॉकीद्वारे इतर सुरक्षा रक्षकांना माहिती देत संसदेचा अलार्म वाजवला. त्यांनी अलार्म वाजवल्यामुळेच संपूर्ण स्टाफ, खासदार आणि इतर सुरक्षा रक्षक सतर्क झाले. मात्र या सर्व गोष्टींमुळे त्या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आल्या. सुरक्षा रक्षकांना कमलेश सूचना देत असल्याचे दहशतवाद्यांनी पाहिले. (Social News)

========

हे देखील वाचा : स्वदेशीसाठी २२ व्या वर्षी मरण पत्करणारे क्रांतिकारी !

========

त्यांनी कमलेश यांच्यावर गोळ्या झाडल्या. आणि यातच त्यांना वीरमरण आलं. शहीद होण्यापूर्वी त्यांनी असं महान कार्य करून दाखवलं ज्यामुळे कित्येकांचे प्राण वाचले. त्यांनी वाजवलेल्या अलार्ममुळे आणि कॉन्स्टेबल सुखविंदर यांन सूचित केल्यामुळेच संसदेचे सर्व गेट बंद करण्यात आले. दहशतवादी कोणत्या ठिकाणी आहेत याचा पत्ता लागला आणि सर्व दहशतवादी मारले गेले. या चकमकीत ८ सुरक्षा रक्षक शहीद झाले होते तसेच १६ जवान जखमी झाले होते. कमलेश कुमारी यांचा मरणोत्तर अशोक चक्र पुरस्काराने सन्मान झाला आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या. २३ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी त्यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करलं होत. या दोन्ही महान महिलांनी जे शौर्याचं सर्वोच्च उदाहरण आपल्यासमोर ठेवलं आहे, त्यामुळे आज हजारो मुली केवळ सैन्यातच नाही, तर इतर क्षेत्रातही धाडसाने पुढे जात आहेत. गाजावाजाकडून हुतात्मा नीरजा भनोत आणि कमलेश कुमारी यांना सलाम ! (Ashok Chakra)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.