दिवाळीचा सण अगदी तोंडावर आला आहे. दिवाळीसाठी सगळीकडे नुसती लगबग चालू आहे. घराची सफाई झाली असेल तर आता घराला सजवले जात आहे. दुसरीकडे रोषणाई, फराळ हे करण्यात देखील वेळ जात आहे. आता दिवाळी म्हटले की, देवीची पूजा आलीच. सोबतच घरची लक्ष्मी देखील या सणाच्या दिवसात लक्ष्मीसारखी दिसली पाहिजे. मात्र कामाच्या नादात जर तुम्ही पूजेच्या चांदी सोन्याच्या वस्तू किंवा दागिने पोलिश करायचे विसरला असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.
चांदी आणि सोन्याचे दागिने तुम्ही रोज वापरले काय किंवा नाही वापरले काय त्यांची चमक हळूहळू कमी होऊ लागते. आणि असे काळपटलेले दागिने किंवा पूजेच्या वस्तू आपण वापरू शकत नाही. सोनाराकडे पॉलिशसाठी नेले तर खर्च देखील जास्त आणि आता त्यांचा देखील सिझन चालू असल्याने आपल्यला वेळेतच वस्तू पोलिश करून मिळतील यातही शंका. मग अशावेळेस काय करायचे. घाबरू नका काही छोटे छोटे घरगुती उपाय करून तुम्ही तुमची चांदी-सोन्याची भांडी, वस्तू मिनिटामध्ये चमकवू शकतात. चला जाणून घेऊया या उपायांबद्दल.
बेकिंग सोडा आणि पाणी
चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी हा उपाय बऱ्याचदा वापरला जातो. बेकिंग सोडा पाण्यात मिसळून चांगली पेस्ट बनवा आणि ती दागिन्यांवर लावून १५-२० मिनिटे तसेच राहू द्या.थोड्या वेळाने दागिने कोमट पाण्याने धुवा. ते पुन्हा नव्यासारखे चमकू लागतील.
लिंबू आणि मीठ
चांदीच्या दागिन्यांवरील काळेपणा दूर करण्यासाठी लिंबाचा रस आणि मीठ लावा. एका भांड्यात मीठ घ्या, त्यात लिंबाचा रस पिळून चांगले मिसळा. आता ही पेस्ट दागिन्यांवर लावा आणि काही मिनिटे ठेवून द्या. नंतर दागिने कोमट पाण्याने धुवा. त्यानंतर दागिने कोरड्या कपड्याने पुसून घ्या.
व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण
एका भांड्यात पाणी घेऊन त्यात व्हिनेगर मिसळून एक छान मिश्रण तयार करा. आता तुमचे दागिने १०-१५ मिनिटे त्यात बुडवून ठेवा. थोड्या वेळाने ते पुन्हा कोमट पाण्याने धुवा आणि कापडाने पाणी टिपून कोरडे करावे.
अमोनिया
कोमट पाण्यात अमोनिया टाकून त्यात थोड्या वेळासाठी सोन्या-चांदीचे दागिने भिजत ठेवा. त्यानंतर त्यांना या पाण्यातून बाहेर काढून ब्रशने हलक्या हाताने साफ करा. मोती किंवा इतर रत्न असणाऱ्या दागिन्यांवर अमोनिया वापरणे टाळा.
टूथपेस्ट
टूथपेस्ट चांदीच्या दागिन्यांना साफ करण्यासाठी उत्तम पर्याय मानला जातो. चांदीच्या दागिन्यांवर टूथपेस्ट लावून १० मिनीटांसाठी तसेच ठेवा. त्यानंतर हे दागिने धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करून ब्रशने हळूवार घासा, यामुळे चांदीचे दागिने अगदी नव्यासारखे दिसू लागतील.
सिल्वर पॉलिश
सिल्वर पॉलिशचा वापर करून तुम्ही चांदीच्या दागिन्यांची चमक सहज परत मिळवू शकता. सिल्वर पॉलिश चांदीच्या दागिन्यांवर चोळा, त्यानंतर कॉटनचे कापड आणि कोमट पाणी वापरून दागिने स्वच्छ धुवून घ्या.
मीठ
सोन्या–चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी मिठाचा देखील वापर करता येतो. यासाठी थोडे पाणी घेऊन त्यात चिमूटभर मीठ टाका, नंतर यामध्ये सोन्या -चांदीचे दागिने थोड्या वेळासाठी ठेवा. यामुळे दागिन्यांवर जमा झालेली घाण लगेच घालवता येईल.
कोका कोला
दागिने उजळ करा चांदीच्या दागिन्यांवरचे काळे डाग साफ करण्यासाठी कोका कोलाचा वापर केला जाऊ शकतो. त्यात अॅसिड आढळते. दागिने कोका-कोलामध्ये भिजवा आणि ते सोडा. १० मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा.
अॅल्युमिनियम फॉइल
चांदीचा काळपटपणा दूर करण्यासाठी , एका भांड्यावर अॅल्युमिनियम फॉइल झाकून ठेवा. आता कोमट पाणी घालून मीठ आणि बेकिंग सोडा समान प्रमाणात मिसळा. नंतर त्यात चांदीच्या वस्तू टाका. चांदी 5 मिनिटे भिजवू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा
केचप
तुमचे दागिने केचपमध्ये १५ ते २० मिनिटे ठेवा. नंतर ते बाहेर काढा आणि लहान छिद्रांमधील घाण साफ करण्यासाठी टूथब्रश वापरा.
==========
हे देखील वाचा : धनत्रयोदशीला पूजा केले जाणारे धन्वंतरी आहे कोण?
==========
व्हिनेगर
अर्धा कप व्हिनेगर, २ चमचे बेकिंग सोडा कोमट पाण्यात मिसळून द्रावण तयार करा. या मिश्रणात २-३ तास चांदीचे दागिने भिजू द्या. नंतर ते थंड पाण्यात घाला आणि कोरड्या जागी ठेवा.
हँड सॅनिटायझर
स्वच्छ पॉलिशिंग कपड्यावर हँड सॅनिटायझरचे काही थेंब पिळून घ्या आणि दागिने त्या कपड्यावर घासा. नंतर ते कोरडे आणि स्वच्छ होऊ द्या.
कॉर्न फ्लोअर
पाण्याचा वापर करून जाड कॉर्नफ्लोअरची पेस्ट बनवा आणि चांदीच्या दागिन्यांना लावा. तुम्हाला तुमची चांदीची भांडी पुन्हा चमकण्यास कॉर्नफ्लोअरची पेस्ट मदत करेल. नंतर, पेस्ट कोरडी होऊ द्या आणि मग दागिने मऊ कापडाने स्वच्छ करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे तज्ज्ञांकडून पडताळून मगच वापरात आणा )