भारताला अनेक वर्षांचा मोठा इतिहास आहे. या देशातील भूमीवर अनेक मोठ्या आणि महत्वाच्या घटना घडल्या आहेत. अनेक युगं आणि त्या युगातील घटना या देशाने पहिल्या आहेत. आजच्या २१ व्या शतकात जगताना आपण जर पाहिले तर आजही भारतामध्ये अशी काही ठिकाणं आहेत ज्यांचे गूढ रहस्य कायम आहे. मोठं मोठे वैज्ञानिक देखील विचार करून आणि शोध लावून थकले अशा बऱ्याच जागा भारतामध्ये आहेत.
भारताचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या देशात असणारी मंदिरं. आपल्या देशात प्रत्येक किलोमीटरवर एक मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. या देशात काही अशी मंदिरं आहेत ज्यांना मोठा जाज्वल्य इतिहास असून अनेक रहस्य देखील या मंदिरांमध्ये पाहायला मिळतात. भारतात अशी काही मंदिरं आहेत ज्यांची रहस्य आजही उलगडलेली नाही. जाणून घेऊया भारतातील अशी टॉपची रहस्यमयी मंदिरं.
ज्वाला देवी मंदिर
हिमाचल प्रदेश राज्यातील कांगडा खोऱ्याच्या दक्षिणेस ३० किलोमीटर अंतरावर ज्वाला देवीचे मंदिर आहे. हे मंदिर भारतातील रहस्यमयी मंदिरांपैकी एक आहे. याचे कारणही तसेच आहे. ज्वाला देवी मंदिर हे देवी सतीच्या ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. असे म्हटले जाते की, सती देवीच्या शरीराचा एक अंग या ठिकाणी पडला होता. या मंदिराचा शोध महाभारतात पांडवांनी लावला असल्याची जाणकार माहिती देतात. या मंदिराची रहस्यमयी बाब म्हणजे या मंदिरात हजारो वर्षांपासून देवी मातेच्या मुखातून आग निघते. शिवाय या मंदिरात वेगवेगळ्या ठिकाणांहून अग्नीच्या नऊ ज्वाला निघतात. ज्या नऊ देवीचे रुप मानले जातात. मात्र या आगीचा स्रोत आजही नाही लागला.
वीरभद्र मंदिर
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील लेपाक्षी हे मंदिर भारतातील रहस्यमय मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर लेपाक्षी या छोट्या गावात आहे. त्यामुळे या मंदिराला लेपाक्षी मंदिर असे म्हटले जाते. या मंदिरात एकूण ७२ खांब आहेत. त्यातला एक खांब छताला स्पर्श करत असून तो जमिनीपासून वर उंचावलेला आहे. अर्थात हा खांब छताला तर टेकलेला आहे, मात्र जमिनीला टेकलेला नाही. तो हवेतच आहे. त्यामुळे या खांबाला हँगिंग पिलर असे म्हणतात. या मंदिरात येणारे पर्यटक खांबाच्या एका बाजूने रुमाल किंवा कापड लावून जमिनीवरुन उभारलेल्या स्तंभाची तपासणी देखील करतात. या खांबाबद्दल आजही गूढ कायम आहे.
स्तंभेश्वर महादेव मंदिर
गुजरात राज्यात देखील एक रहस्यमयी मंदिर स्थित आहे. हे मंदिर गांधीनगर शहरापासून १७५ किलोमीटर अंतरावर जंबुसरच्या कवी कंबोई गावात आहे. १५० वर्ष जुने हे मंदिर अरबी समुद्र आणि खंभातच्या आखाताने वेढलेले आहे. स्तंभेश्वर महादेव मंदिर भाविकांसाठी फक्त दोनच वेळा दर्शनासाठी खुले होते. हायटाईडच्या वेळी मंदिर पूर्णपणे पाण्यात असते. या दरम्यान मंदिराचा एकही भाग दिसत नाही. मात्र पाणी ओसरल्यानंतर स्तंभेश्वर महादेव मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले होते.
असिरगड शिव मंदिर
मध्य प्रदेश राज्यामध्ये बुरहानपूर शहरानजीक अरिसरगड किल्ल्यात एक मंदिर आहे. हे मंदिर शंकराचे असून, इथे एक शिवलिंग आहे. माहितीनुसार हे मंदिर महाभारत काळात बांधले गेले आहे. हे मंदिर बुरहानपूर शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या असिरगड किल्ल्यामध्ये आहे. या मंदिराची रोज पहिली पूजा अश्वधामा करत असल्याचे सांगितले जाते. अश्वथामा हा पांडव आणि कौरवांचे गुरू असलेल्या द्रोणाचार्य यांचा मुलगा होता. त्याला श्री कृष्णाने युगानुयुगे भटकण्याचा शाप दिला होता. हाच अश्वथामा या मंदिरात रोज पहिली पूजा करतो अशी लोकांची मान्यता आहे. कारण या मंदिराचा दरवाजा उघडल्यानंतर शिवलिंगावर नेहमीच ताजी फुले आणि चंदन पाहायला मिळते.
मेहंदीपुर बालाजी मंदिर
राजस्थान राज्यात दौसा जिल्ह्यामध्ये मेहंदीपुर बालाजी मंदिर आहे. नाव जरी बालाजीचे असले तरी या मंदिरात हनुमानाची पूजा-आराधना केली जाते. हे मंदिर जवळपास एक हजार वर्ष जुने असून, या मंदिरात हनुमानाची बालस्परुप स्वयंभू मूर्ती आहे. काही लोकांच्या मते या मंदिरामध्ये काही विचित्र गोष्टी दिसून येतात ज्या पाहून अनेक लोकं घाबरतात. असं सांगितले जाते की, या ठिकाणी वाईट शक्ती, भूत-प्रेत यांसारख्या नकारात्मक ऊर्जा दूर केल्या जातात.