फिरण्याची हौस नसलेला व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकालाच फिरायला आवडते. डोंगर, बीच आदी अनेक ठिकाणी लोकं फिरायला जातात. मात्र कधी कधी अशा ठिकाणी जाऊन कंटाळा येतो, किंवा कधीतरी कुठे वेगळ्या ठिकाणी फिरायला जावे. वेगळे काहीतरी पाहावे, वेगळे काही अनुभवावे. मात्र तुम्हाला असा पर्याय सुचत नाही का..? जर असा काही पर्याय आम्ही तुम्हाला दिला तर?
सध्या हिवाळा सुरु झाला असून, सगळीकडे बोचऱ्या थंडीची सुरुवात झाली आहे. अशा थंडीच्या वातावरणात जर तुम्हाला एखाद्या वाईनयार्डला जाण्याचा पर्याय मिळाला तर…? सध्याच्या वातावरणात वाईनयार्डला फिरायला जाणे अतिशय उत्तम आहे. त्यातही महाराष्ट्रात वाइन कॅपिटल सिटी असल्यावर तर विचारायलाच नको. हो आम्ही बोलतोय नाशिकबद्दल.
भारतातील वाईन कॅपिटल अशी ओळख असणाऱ्या या नाशिक शहरामध्ये अनेक वाइनरीज आहे. या वाइनरीजला तुम्ही भेट देऊन तिथे फेरफटका मारू शकता. आणि तुमच्या सुट्ट्या आनंदाने व्यतीत करू शकता. हा काळ नाशिक मधील वाइनरीजला भेट देण्यासाठी अतिशय चांगला आहे. यासाठीच आज आम्ही तुम्हाला नाशिकमधील टॉपच्या काही वाइनरीज सांगणार आहोत.
सुला वाईनयार्ड्स
नाशिकमधील सुला वाईनयार्ड्स ही वाईनरी जगप्रसिद्ध आहे. येथे उपलब्ध असणारे वाईनचे प्रकार, वाईन बनवण्याची पद्धत लोकप्रिय आहे. शिवाय येथे होणारा सुला फेस्ट तर युवा पिढीत खूपच लोकप्रिय आहे. या फेस्टसाठी देशविदेशातून पर्यटक नाशिकमध्ये येतात. इथे राहण्याचीही उत्तम सोय आहे. ही वाईनरी २००० साली सुरु झाली. ३० एकरवर पसरलेली ही वाईनरी आता तब्बल १८०० एकरमध्ये विस्तारीत झाली आहे. येथे तुम्हाला वाईन टूर आणि वाईन टेस्टींग देखील दिली जाते.
यॉर्क वाईनरी
तसे पाहिले तर सुला वाईनरीच्या तुलनेत यॉर्क वाईनरीचा परिसर फारच सुंदर आहे. ही वाईनरी गोदावरी नदीच्या पात्राजवळच आहे. इथला सुंदर लँडस्कॅप, अँबियन्स, परफेक्ट वाईन आणि चविष्ट फूड सगळ्यांच्याच आकर्षणाचे केंद्र आहे. येथे तुम्हाला वाईन टूर आणि वाईन टेस्टींग देखील दिली जाते.
सोमा वाईनयार्ड्स
सोमा वाईन व्हिलेज ही देखील एक उत्तम वाईनरी आहे. सोमा वाईनचा विस्तार लक्झरी रिसोर्टमध्ये करण्यात आला असून, धावपळीच्या वेळापत्रकातून ब्रेक घेत रिलॅक्स होण्यासाठी आणि सोबतच वाईनचा आस्वाद घेण्यासाठी हे परफेक्ट ठिकाण आहे.
शँडन वाईनयार्ड्स
या वाईनरीचे मधल्या काही काळापासून नाशिककरांसोबतच बाहेरही खूपच लोकप्रिय होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे इथे सुला किंवा सोमा वाईनयार्डसारखी गर्दी आढळत नाही. सर्व वाईनरीजप्रमाणे ही वाईनरीही सुंदर आहे. गर्दी टाळून निसर्गाच्या सानिध्यात वाईनचा आस्वाद घ्यायचा असेल तर ही वाइनरीज उत्तम ठिकाण आहे.
व्हॅलोनी वाईनयार्ड्स
नाशिकपासून ४५ मिनिटांच्या अंतरावर हायवेजवळ व्हॅलोनी वाईनयार्ड्स आहे. ही एक छोटीशी बुटीक वाईनरी असून एक कुटुंब ही वाईनरी चालवत आहे.