दक्षिण मुंबई! इथं म्हणे लोकं तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात. श्रीमंती त्यांच्या दाराशी लोळण घेत असते. साहजिकच श्रीमंतीसोबत स्वतःची प्रतिष्ठादेखील येते आणि त्यामुळेच येथील लोकांना ऑटोने प्रवास करणं किंवा तिथे ऑटो फिरत असणं हे कमीपणाचं वाटतं. म्हणून दक्षिण मुंबईत (South Mumbai) ऑटोला बंदी घातलेली आहे. दक्षिण मुंबईत ऑटो का नाहीयेत? या प्रश्नाचं प्रत्येक वेळी आपल्याला हेच उत्तर मिळतं. पण खरोखरच तिथे ऑटो नसण्याला हेच कारण आहे का? तर नाही. मग दक्षिण मुंबईत (South Mumbai) ऑटोला बंदी असण्याला कोणती कारणे आहेत ते आपण जाणून घेऊया.
यातील पहिलं आणि मुख्य कारण म्हणजे ट्राफिक! दक्षिण मुंबई (South Mumbai) हा मुंबईचा सर्वात जुना भाग मानला जातो. ब्रिटीशांच्या काळातील बांधकाम इथे बऱ्यापैकी आढळून येतं. येथील रस्ते तुलनेने अरुंद आहेत त्यामुळे इथे जर ऑटोवाले आले तर ट्राफिकची समस्या मोठ्या प्रमाणात वाढेल. मुंबईच्या इतर उपनगरातील ट्राफिकसाठी ऑटो मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत हे लक्षात घेत प्रशासनाने ऑटोंना दक्षिण मुंबईत (South Mumbai) बंदी घातली आहे.
मुंबईतील कालीपिलीचा जन्म हा खूप अगोदरचा. मुंबईत पहिली टॅक्सी १९६४ साली आढळली. ऑटो त्यानंतर सुमारे दोन दशकानंतर बघायला मिळाला. त्यामुळे साहजिकच टॅक्सी युनियनचा इथे दबदबा आहे. जर दक्षिण मुंबईत ऑटोंना परवानगी दिली तर तुलनेने स्वस्त असल्यामुळे लोक टॅक्सीऐवजी ऑटोने प्रवास कारायला लागतील. त्याचा थेट परिणाम टॅक्सीवाल्यांच्या धंद्यावर होईल. म्हणून टॅक्सी युनियन ऑटोवाल्यांच्या प्रचंड विरोधात आढळून येते.
दक्षिण मुंबईत (South Mumbai) ऑटोंना प्रवेश मिळावा यासाठी २०११ साली आझाद मैदानात ऑटो युनियनने आंदोलन केले होते. ऑटोला परवानगी असावी की नाही यासाठी दक्षिण मुंबईतील रहिवाश्यांची मते घेण्यात आली. त्यात दक्षिण मुंबईत (South Mumbai) ऑटोला बंदी असावी याच बाजूने तेथील रहिवाशांनीदेखील कौल दिला. दक्षिण मुंबईच्या रहिवाशांना ऑटो नको वाटण्याला बरीचशी कारणे आहेत. ऑटोवाल्यांच्या प्रवेशामुळे ट्राफिकची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवू शकते आणि त्या ट्राफिकचा त्रास अर्थातच तेथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. दक्षिण मुंबईत राहणारे लोक बऱ्यापैकी उच्चवर्गीय असल्यामुळे त्यांचा प्रवास साधारणतः त्यांच्या चारचाकीतून होत असतो. अशात त्यांना तीन चाकीची तेवढ्या मोठ्या प्रमाणात गरजदेखील भासत नाही.
======
हे देखील वाचा : मस्कमुळे चंद्रापर्यंत प्रवास करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येणार
======
अशाप्रकारे ऑटोच्या प्रवेशामुळे उद्भवणारी ट्राफिकची समस्या, टॅक्सी युनियनचा असणारा विरोध अन स्थानिक रहिवाशांना ऑटोची न भासणारी गरज या प्रमुख कारणांमुळे दक्षिण मुंबईत ऑटोंना बंदी आहे.