आजच्या काळातील जीवन खूपच फास्ट आणि घाईचे आहे. प्रत्येकालाच उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर बक्कळ पगार असलेली नोकरी करायची किंवा व्यवसाय करायचा. यासाठी सतत अभ्यास, चांगली नोकरी, असलेल्या नोकरीमध्ये चांगले काम करण्यासाठी सगळे फक्त धावत आहे. ऑफिसमध्ये कामाचे प्रेशर, शिक्षणाचे प्रेशर, चांगले गुण मिळवण्याचे प्रेशर आदी सर्वच प्रेशरमध्ये आपण कधी ताण तणावाखाली जातो आपले आपल्यालाच समजत नाही.
काही दिवसांपूर्वीच एका मोठ्या कंपनीमध्ये उच्च पदावर काम करणाऱ्या मुलीचा कामाच्या ताणामुळे मृत्यू झाला. ही बातमी खूपच व्हायरल झाली. यावरून हे नक्कीच लक्षात येते की, तणाव आपल्यासाठी आणि आपल्या जवळच्या लोकांसाठी किती मोठा आजार आहे. आपल्या शरीराला होणार त्रास दिसून येतो आणि जाणवतो देखील. मात्र मनाला होणार त्रास ना दिसून येत ना समजत. तणावामुळे अनेक आजारांचा धोका वाढत जातो. या तणावामुळे जगभरातील लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे.
यात सर्वात जास्त मानसिक आजार घातक ठरतात. पण मग आपण आपल्या स्ट्रेसवर, डिप्रेशवर कशी मात करू शकतो. अगदी सोप्या आणि सध्या गोष्टी असल्या की करायला देखील मजा येते आणि आनंद देखील होतो. याच मानसिक ताणातून बाहेर निघण्यासाठी काही योगासने आहेत. जी आपण नित्यनियमाने केली तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. योग हा बौद्धिक आणि मानसिक व्यायाम म्हणून तणाव दूर करून व्यक्तीला निरोगी बनवतो. शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्य सुधारण्यात देखील योग महत्त्वाचा आहे. आज आपण त्याच योगासनाबद्दल जाणून घेऊया.
सुखासन
या आसनाच्या नावातच सुख आहे. याशिवाय हे आसन केल्याने सुख मिळते देखील म्हणून याला सुखासन हे नाव ठेवले असावे. या योग मुद्रेमुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळते आणि शांत वाटते. मनावरील ताण देखील कमी होतो.
हे आसन करण्यासाठी मांडी घालून खाली बसावे. डोळे बंद करून श्वास आत – बाहेर हळूहळू सोडा
या आसनामुळे चेहऱ्यावर चमक येते. चिंता, तणाव, मानसिक शांतता राखण्यासाठी याचा फायदा होतो. सर्व विचारांपासून दूर करून मनाला शांती मिळण्यासाठी हे आसन करण्यात येते.
शवासन
ध्यानमुद्रा मध्ये झोपणे म्हणजे शवासन.जर तुम्ही शवासन केले तर ते तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. शवासनाची खास गोष्ट म्हणजे ते तुमच्या शरीराला पूर्णपणे आराम देते. हे योगासन उच्च रक्तदाब आणि चिंताग्रस्त लोकांसाठी लाभदायक आणि गुणकारी उपाय आहे. याशिवाय हे आसन केल्याने मेंदूलाही फायदा होतो.
आपल्या पाठीवर सरळ झोपा. हात आणि पाय दोन्ही बाजूने मोकळे ठेवा. हळू हळू डोळे बंद ठेवा. समान रीतीने श्वास घ्या आणि रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करा. तुमचे शरीर पूर्णपणे आरामदायी अवस्थेत असल्याची खात्री करा आणि मग मनावर लक्ष केंद्रित करा. मनावर लक्ष केंद्रित होत नाही तोपर्यंत नियमितपणे सराव करा.
कपाल भाती
कपाल भाती श्वसनाच्या रुग्णांसाठी रामबाण औषधापेक्षा कमी नाही. कपाल भाती रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यास मदत करते. या आसनामुळे फुफ्फुसाची क्षमता वाढते. त्याचबरोबर शरीरात साचलेले विषारी पदार्थ बाहेर टाकतात. तसेच, जर तुम्हाला तणावाचा त्रास होत असेल तर हे तुमच्यासाठी खूप प्रभावी आसन असू शकते. हे केल्यावर तुम्हाला मानसिकदृष्ट्याही शांत वाटेल.
सुखासनात बसावे, पाठीचा कणा ताठ ठेवावा आणि हाताचे तळवे आकाशाच्या दिशेला उघडून गुडघ्यांवर ठेवावेत. श्वास घ्यावा. श्वास सोडता सोडता पोट आत घ्यावे. पोटाच्या स्नायूंची हालचाल जाणवावी म्हणून उजवा हात नाभीवर ठेवावा व नाभी आतल्या बाजूस ओढून घ्यावी. जसं ओटीपोट आणि नाभीकडचा भाग सैल सोडाल, फुफुसात हवा आपणहून शिरेल. अशा प्रकारे २० वेळा केल्याने एक चरण पूर्ण होते.
======
हे देखील वाचा : मोड आलेली मेथी खाण्याचे चमत्कारिक फायदे
======
भुजंगासन
भुजंगासनचा नियमित सराव आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कंबर किंवा पाठदुखीने त्रस्त असलेल्या लोकांना फायदा होण्याबरोबरच, हे आसन शरीरातील ब्लड सर्कुलेशन सुधारण्यास, मानसिक आरोग्यास चालना देण्यास आणि इतर अनेक समस्यांचा धोका कमी करण्यास मदत करते. याशिवाय शरीराला अनेक प्रकारे लाभ देणारे हे आसन पोटाची चरबी कमी करण्यासोबतच मानसिक शांती मिळवण्यासही मदत करते.
हे आसन करण्यासाठी आधी खाली पोटावर झोपा. यानंतर दोन्ही हात छातीच्या बरोबरीने जमिनीवर ठेवून श्वास घेताना, दोन्ही हातांवर भार टाकताना शरीर वर उचला आणि डोके मागे न्या. लक्षात ठेवा हे करताना कंबरेचा खालचा भाग जमिनीवर असावा. या आसनात २० ते ३० सेकंद स्वत:ला धरून ठेवा.