Home » कतारमध्ये होणारा ‘हा’ विश्वचषक चर्चेत…

कतारमध्ये होणारा ‘हा’ विश्वचषक चर्चेत…

by Team Gajawaja
0 comment
FIFA Football
Share

कतारमध्ये चालू असलेल्या फिफा फूटबॉल(FIFA Football) विश्वचषकाच पहिल्याच आठवड्यात मोठा उलटफेर झाला आहे.  कतारमध्ये अत्यंत कठीण अशा बंधनात सुरु झालेल्या या विश्वचषकात गेल्या काही वर्षात जी घटना झाली नव्हती ती झाली आहे.  फिफामध्ये चक्क अर्जेंटिना संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.  फिफा विश्वचषकात मंगळवारी मोठी उलटफेर पाहायला मिळाली. जेतेपदाचा दावेदार मानल्या जाणाऱ्या अर्जेंटिनाचा जागतिक क्रमवारीत 49 व्या क्रमांकावर असलेल्या संघ सौदी अरेबियाकडून 2-1 असा पराभव झाला. यासह अर्जेंटिना गट-क मध्ये शेवटच्या स्थानावर पोहोचला असून सौदी अरेबियामध्ये उत्सहाची एकच लहर आली आहे.  

या संपूर्ण सामन्यात सौदी अरेबियाने आक्रमक खेळाने उत्तरार्धात दोन गोल केले. अल-शहरानीने 48व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर 53 व्या मिनिटाला सालेम अल-दवसारीने गोल केला. अर्जेंटिनासाठी 10व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने पेनल्टीवर गोल केला. पण या गोलमुळेही अर्जेंटिनाला विजय मिळू शकला नाही.  या पराभवामुळे अर्जेंटिनाचा सलग 36 सामन्यांतील अपराजित राहण्याचा विक्रम खंडित झाला आहे. अर्जेंटिनाचा आता 27 नोव्हेंबरला मेक्सिको आणि 30 डिसेंबरला पोलंडचा सामना होणार आहे. राऊंड ऑफ 16 मध्ये जाण्यासाठी आता अर्जेंटिनाला कोणत्याही परिस्थितीत आपले दोन्ही सामने जिंकावे लागतील.  विश्वचषकाच्या इतिहासातील सौदी अरेबियाचा हा तिसरा विजय असून अर्जेंटिनाचा पराभव केल्यानं संघाचा विश्वास दुणावला आहे.  

या सामन्यात अर्जेंटिनाने सुरुवातीला चांगला खेळ केला, पण संघातील खेळाडू अनेकदा ऑफसाईड झाले. अर्जेंटिना 7 वेळा ऑफसाईड होता. अर्जेंटिनासाठी दुसरा गोल लॉटारो मार्टिनेझने केला, पण तो रेफ्रींनी ऑफसाइडसाठी रद्द केला. मेस्सीचाही ऑफसाईड गोल होता.सौदी अरेबियाच्या संघाला अर्जेंटिनानं फारसं महत्त्व दिलं नसल्यामुळे हा पराभव झाल्याचे समिक्षक सांगत आहेत.  

दरम्यान कतारमध्ये होणारा हा विश्वचषक (FIFA Football)चर्चेत येत आहे.  एकतर यादरम्यान कतारनं अनेक बंधन  परदेशी खेळाडूंवरही घातली आहेत.  दुसरं म्हणजे विश्वचषकाच्या दरम्यान दारू सेवनावरही बंदी घातली आहेत.  त्यामुळेच बियरच्या स्पॉनसर कंपनीलाही मोठा आर्थिक फटका बसला आहे.  कतारने स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवस आधी दारू विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा केली. अशा स्थितीत बिअर ब्रँड बडवेझरसमोर मोठे संकट उभे राहिले.  त्यांनी ही स्पर्धा बघता बियरचा मोठा साठा केला होता.आता बंदीनंतर या साठ्याचे काय करायचे हा प्रश्न कंपनीसमोर उभा राहिला आहे. अखेर बडवेझर कंपनीनं बियरचा संपूर्ण साठा विजेत्या संघाला देण्याची घोषणा केली आहे.आता 18 कॅरेट सोन्याच्या ट्रॉफीसह 343 कोटी रुपयांचा बियरचा साठाही विजेत्या संघाला मिळणार आहे.अर्थात फिफातर्फे (FIFA Football)कतार सरकारकडे याबाबतचे नियम स्टेडियममध्ये शिथिल करण्याबाबत विनंती करण्यात आली मात्र कतार सरकारनं स्पष्ट नकार देत आपली धोरणे महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. 29 दिवसांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी कतारमध्ये गेल्या 12 वर्षांपासून तयारी सुरू आहे. यासाठी कतारमध्ये 7 नवीन स्टेडियम, 100 हून अधिक हॉटेल्स, नवीन स्मार्ट सिटी, नवीन विमानतळ आणि नवीन मेट्रो लाईन बांधण्यात आली आहे.आतापर्यंत झालेल्या सर्व विश्वचषक स्पर्धांचा खर्च जोडला तर कतारने त्यापेक्षा जास्त खर्च केला आहे. 

=======

हे देखील वाचा : सामान्य लोकांच्या तुलनेत एथलीट्सचे हार्ट रेट कमी का असतात?

=======

मात्र हा फिफा विश्वचषक(FIFA Football) इतर देशात जसा असतो, त्यापेक्षा कतारमध्ये वेगळ्या वातावरणात खेळवला जात आहे. याचा मुख्य फटका पत्रकारांना बसत आहे. फिफा विश्वचषक(FIFA Football) कव्हर करण्यासाठी विविध देशांतील पत्रकार कतारला पोहोचले आहेत. मात्र काही ठिकाणी कतार प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि बेफिकीर वृत्ती यामुळे पत्रकारांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.पहिल्याच दिवशी रिपोर्टिंग करत असताना, डॅनिश टीव्हीच्या कर्मचा-यांना कतार सुरक्षा कर्मचार्‍यांनी थांबवले आणि त्यांचे कॅमेरे तोडण्याची धमकी दिली.  डॅनिश टिव्हीचे रॅसमस टेन्थोल्ड यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांची माफी मागण्यात आली. अर्जेंटिनाच्या पत्रकारासोबत अशीच घटना झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी लाइव्ह शो दरम्यान पत्रकार डॉमिनिक मेट्झगरच्या हँडबॅगमधून अनेक वस्तू चोरीला गेल्या होत्या. पोलिसांकडे तक्रार केल्यावर हायटेक कॅमेऱ्यांच्या मदतीने चोराला पकडू, असे आश्वासन पोलिसांनी दिले. त्यानंतर पोलिसांनी डॉमिनिकला विचारलेले प्रश्न मात्र त्रासदायक होते.  तुम्हाला कोणता न्याय हवा आहे, त्या चोराला काय शिक्षा द्यायची? चोराला तुरुंगवास हवा आहे का? त्याला देशातून हद्दपार करायचे आहे का? अशाप्रकारचे प्रश्न डॉमिनिकला विचारण्यात आले. या प्रश्नांमुळे डॉमिनिक हैराण झाला,  त्यानं याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.  यूएसए पत्रकार ग्रँट वहल यांना तर स्टेडीयममध्ये जाण्यासही रोखण्यात आले. तसेच या घटनेबाबत त्यांना सोशल मीडियावर लिहायचे असताना त्यांचा फोनही हिसकावण्यात आला.  पत्रकारांबाबत अशा एकापाठोपाठ एक घटना झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पत्रकार संघानं नाराजी व्यक्त करत आपली सुरक्षा आणि स्वातंत्र्य याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.