Home » Algeria History : एका मच्छर मारायच्या बॅटने दोन देशांमध्ये पेटवला ७३ वर्षांचा संघर्ष !

Algeria History : एका मच्छर मारायच्या बॅटने दोन देशांमध्ये पेटवला ७३ वर्षांचा संघर्ष !

by Team Gajawaja
0 comment
Algeria History
Share

आजवर जगात अनेक लढाया झाल्या आहेत. कधी एखाद्या राज्यानं दुसऱ्या राज्याचा काही भाग काबिज केला म्हणून युद्ध झाली. कधी एखाद्या राजानं दुसऱ्या राजाची मुलगी पळवली म्हणून युद्धं झाली, तर कधी एखाद्या राजानं दुसऱ्या राजाच्या राजकुमाराचा खून केला म्हणूनही युद्धं झाली आहेत. पण तुम्हाला माहितेय का? जगाच्या इतिहासात एक असं युद्ध झालं होतं, ज्याला एक साधी मच्छर मारण्यासाठी वापरतात ती बॅट म्हणजे ‘फ्लाय स्वॅटर’ कारणीभूत होती! आणि हे युद्ध २ देशांमध्ये तब्बल ७३ वर्ष चाललं होतं. कोणते होते ते देश? नक्की कशामुळे हे युद्ध झालं होतं? जाणून घेऊ. (Algeria History)

तर १७९५-९६ मध्ये फ्रान्सच्या सरकारने अल्जेरियाची राजधानी असलेल्या अल्जीयर्समधील काही व्यापाऱ्यांकडून फ्रेंच सैन्यासाठी गहू खरेदी करण्याचा करार केला. मात्र त्या व्यापाऱ्यांनी आधीच अल्जीयर्सच्या शासकाकडून कर्ज घेतलेलं होतं. जोपर्यंत फ्रान्स धान्याचे पैसे देत नव्हता, तोपर्यंत ते व्यापारी कर्ज फेडू शकत नव्हते. त्यामुळे अल्जीयर्सचा शासक फ्रान्सच्या प्रतिनिधीकडे गेला आणि त्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न अपयशी ठरला. मग २९ एप्रिल १८२७ रोजी अल्जीयर्सचा शासक आणि फ्रान्सचा प्रतिनिधी यांची बैठक झाली. या बैठकीत प्रतिनिधीनं अत्यंत उद्धट वागणूक दिली. प्रश्नांची योग्य उत्तरं न देता तो सतत टाळाटाळ करत राहिला. यामुळे अल्जीयर्सचा शासक संतापला आणि त्याने हातातल्या फ्लाय स्वॅटरने फ्रान्सच्या प्रतिनिधीला फटका मारला… झाल.. हाच अपमानास्पद प्रसंग पुढे ७३ वर्षाच्या युद्धाला कारणीभूत ठरला ! आता फ्लाय स्वॅटर म्हणजे काय… तरी ती आपल्याकडे मच्छर मारण्याची BAT असते तीच… (Top Stories)

Algeria History

हा छोटासा प्रसंग फ्रान्सला प्रचंड अपमानास्पद वाटला. लगेचच फ्रान्सनं अल्जीयर्सच्या शासकाला माफी मागण्याची मागणी केली आणि त्याचं बंदर सील करून टाकलं. तीन वर्षे नाकाबंदी चालू राहिली. यामुळे अल्जीयर्ससह फ्रेंच व्यापाऱ्यांचाही तोटा झाला. अखेर १८२९ मध्ये फ्रान्सनं पुन्हा वाटाघाटी करण्यासाठी आपला राजदूत पाठवला, पण अल्जीयर्सचा शासक अजिबात मागे हटला नाही. उलट त्याने फ्रान्सच्या एका जहाजावर तोफांचा मारा केला. या घटनेनंतर फ्रान्सनं युद्धाचा निर्णय घेतला. फ्रान्सचा राजा चार्ल्स दहावा याने आपल्या सत्तेला पुन्हा बळकटी देण्यासाठी अल्जीयर्सवर आक्रमण करण्याची परवानगी दिली. राजाने आपल्या पंतप्रधानाला संपूर्ण कारवाईची जबाबदारी दिली. त्यावेळी इजिप्तच्या गव्हर्नरशी संपर्क साधून मदत मागण्याचाही प्रयत्न झाला, पण तो नाकारला गेला. (Algeria History)

पुढे १८३० मध्ये फ्रान्सच्या नौदल प्रमुखाने तब्बल ६०० जहाजांमधून सुमारे ३४ हजार सैनिकांचा ताफा घेऊन अल्जीयर्सकडे मोर्चा वळवला. दुसरीकडे अल्जीयर्सच्या शासकाने ७ हजार ऑटोमन सैनिक, १९ हजार स्थानिक सैन्य आणि १७ हजार एका विशिष्ट जमातीचे योद्धे उभे केले. पण फ्रान्सच्या सैन्याचा तोफखाना, तंत्र आणि संघटन खूपच मजबूत होतं. १९ जूनला झालेल्या मोठ्या युद्धात अल्जीयर्सच्या सैन्याचा पराभव झाला. काही आठवड्यांतच फ्रान्सच्या सैन्याने राजधानी जिंकली. अखेर अल्जीयर्सच्या शासकाने स्वतःचं स्वातंत्र्य आणि कुटुंब वाचवण्यासाठी आपली संपत्ती फ्रान्सकडे सोपवली आणि शहर सोडून परदेशात रवाना झाला. त्याच्यासोबत ऑटोमन सैनिकांनीही अल्जीरिया सोडून तुर्कीकडे परत कूच केलं. त्यामुळे अल्जीयर्सवरील ३१३ वर्षांची ऑटोमन सत्ता संपली. (Top Stories)

=================

हे देखील वाचा : India : स्वातंत्र्यावेळी भारतात इंग्रजांची किती होती लोकसंख्या? त्यांची पण जनगणना केली जायची? घ्या जाणून

=================

सुरुवातीला फ्रान्सच्या सैन्याने स्थानिक लोकांना स्वातंत्र्य, संपत्ती आणि धर्मस्वातंत्र्य जपण्याचं आश्वासन दिलं होतं. पण लवकरच हे आश्वासन खोटं ठरलं. फ्रेंच सैन्याने शहरात मोठ्या प्रमाणावर लुटमार केली. क्षुल्लक कारणांवरून लोकांना कैद करण्यात आलं, त्यांच्या मालमत्तेवर कब्जा करण्यात आला आणि धार्मिक ठिकाणांचीही विटंबना झाली. एका अहवालानुसार, फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं की यावेळी निरपराध लोकांची कत्तल करण्यात आली आणि निर्दयपणा इतका झाला की तो रानटीपणालाही मागे टाकणारा होता. युद्ध, दुष्काळ आणि रोगराईमुळे लाखो लोक मरण पावले. अंदाजे ३० लाख अल्जेरियनांपैकी ५ ते १० लाखांचा बळी गेला. या सर्वामुळे फ्रेंच व्यापारी आणि स्थानिकांमध्ये कायमची अविश्वासाची दरी निर्माण झाली. दरम्यान, फ्रान्समध्येही राजकीय उलथापालथ झाली. राजा चार्ल्स दहावा पदच्युत झाला आणि त्याचा चुलत भाऊ ‘सिटीझन किंग’ म्हणून सत्तेवर आला. त्याने अल्जेरियात वसाहतवाद सुरू केला. त्यानंतर पुढे १९०३ पर्यंत अल्जीरियात सतत छोटे-मोठे संघर्ष होत राहिले. शेवटी, फ्रान्सने देशाच्या दक्षिण भागावर पूर्ण ताबा मिळवत या प्रदीर्घ संघर्षाला पूर्णविराम दिला. (Algeria History)

पण या युद्धाने लाखो जीव घेतले, हजारो कुटुंबं उद्ध्वस्त केली आणि एक साधा फ्लाय स्वॅटर अल्जेरियाच्या इतिहासाचा प्रवाह बदलून गेला. ही गोष्ट आपल्याला शिकवते की कधी कधी क्षुल्लक वाटणाऱ्या घटना मोठे परिणाम घडवून आणतात. जर त्या वेळी अल्जीयर्सच्या शासकाने संयम दाखवला असता, तर कदाचित आज अल्जेरियाचा इतिहास वेगळा असता.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.