Home » हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

by Team Gajawaja
0 comment
The volcanic explosion in Tonga Marathi info
Share

‘टोंगा’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत. काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया, मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. 

या राज्यावर पूर्वी साधारणतः १९७० पर्यंत ब्रिटिशांची सत्ता होती. त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला. हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण १५ जानेवारी २०२२ पर्यंत विशेष असं सांगण्यासारखं काहीच नव्हतं.

पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘हुंगा टोंगा हुंगा हापाई’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला ‘टोंगा’ हे नाव माहीत झालं (Volcanic explosion in Tonga). 

Massive Underwater Tonga Volcanic

या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं, असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली, पाण्याने प्रदेश व्यापून गेला. बरं स्फोट झाला तरीसुद्धा त्याचा परिणाम वातावरणात कदाचित कमी होऊ शकला असता, पण या स्फोटांनंतर टोंगा प्रशासनाने चक्क त्सुनामीची सूचना दिली. ज्वालामुखीचा उद्रेक इतका शक्तीशाली होता की त्यामुळे केवळ प्रशांत महासागरातच नाही, तर अटलांटिक, क्या कॅरेबियन आणि भूमध्य भागातसुद्धा त्सुनामी आले. 

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे राखेचा पाऊस पडला. टोंगा विमानतळ बंद करण्यात आले. हवेत २० मैल इतक्या वातावरणात हे राखेचे ढग पसरले. ज्वालामुखीचा उद्रेक १० मिनिटच चालला आणि एक तास चाळीस मिनिटं ही प्रक्रिया घडत होती. यामुळे चार लाख टन इतका सल्फर डाय ओक्साइड वायू वातावरणात सोडला गेला.

समुद्राखाली झालेल्या स्फोटाने तर पाण्याखाली असलेल्या दळणवळणाच्या केबल्सचंसुद्धा खूप नुकसान झालं आहे. शास्त्रज्ञांच्या हवाल्यानुसार येणार्‍या काळात कदाचित दूरसंचार उपग्रहांवर आणि संदेशयंत्रणांवर म्हणजे GPS वर याचा परिणाम जाणवू शकतो. 

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या शॉक वेव्ह्ज्स या २००० किलोमीटर लांब असलेल्या न्यूझीलंड मध्ये नोंदवल्या गेल्या. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा नोंद झाली. तर या स्फोटाचा आवाज सात तासानंतर अलास्का या अमेरिकेच्या प्रांतातसुद्धा ऐकू गेला इतका तो ताकदवान होता. 

The volcanic explosion in Tonga
The volcanic explosion in Tonga

अगदी काही दिवसांपूर्वीच झालेल्या या उद्रेकामुळे किती नुकसान झालं आहे, हे आताच सांगता येणं कठीण आहे (Volcanic explosion in Tonga). इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, अवकाशातूनसुद्धा या स्फोटाच्या शॉक वेव्ह्ज दिसल्या आणि दूरवर असलेल्या पेरु या दक्षिण अमेरिकेत स्थित असलेल्या देशातसुद्धा चक्क याचा परिणाम जाणवला. पेरूतल्या ‘ला पामिया’ या तेल रिफायनरीत एक जहाज, तेल उतरवत होते, त्या दरम्यान आलेल्या लाटांमुळे जहाजाचा तोल गेला ते हलू  लागले आणि त्यातले तेल पाण्यात सांडून ते इतरत्र समुद्र तटांवर पसरले!

=====

हे देखील वाचा: डॉ. आफिया सिद्दिकी (Aafia Siddiqui)- पाकिस्तानी आतंकवादाचा भयानक चेहरा

=====

अनेक बेटांचे समूह असलेल्या या भागात स्फोटामुळे आणि त्सुनामीमुळे संपर्क तुटलेला आहे (Volcanic explosion in Tonga). या टोंगामध्ये एकूण १६९ बेटं आहेत, त्यातल्या ३६ बेटांवरच मानवी वस्ती आहे. या देशाची लोकसंख्या एकूण एक लाखाच्या आसपास आहे. साधारणतः ७० टक्के लोकसंख्या ही टोंगाटापू या मुख्य बेटावरची आहे.

न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि फिजी या देशांनी टोंगाला त्वरित मदत केली आहे. रॉयल न्यूझीलंड नेव्हीने आपली जहाजं पाठवली आहेत, तर ऑस्ट्रेलियाने झालेलं नुकसानाची मोजणी आणि पाहणी करण्यासाठी त्यांच्या रॉयल ऑस्ट्रेलियन एअरफोर्सच्या विमानांची मदत देऊ केली आहे. तसंच चीन आणि सिंगापूरनेही मदत देऊ केली आहे. 

येणार्‍या काळात म्हणजेच पुढच्या काही दिवसात टोंगा मधील परिस्थितीचे चित्र स्पष्ट होईल. यामध्ये जीवितहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढच्या काही दिवसात चित्र स्पष्ट होईल तोपर्यंत आपण थोडी वाट पाहूया.   

– निखिल कासखेडीकर 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.