रविंद्र चव्हाण यांची काल भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. चव्हाण डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून गेली सलग चार टर्म निवडून येत आहेत. ते या पूर्वी राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री, पक्षाचे महामंत्री वगैरे वगैरे राहिलेले आहेत. २५ वर्षे भाजपाचं काम करतायत. संघ-भाजपा, सावरकर भक्त, देवेंद्र यांचे विश्वासू. याहून अधिक मीडियात त्यांच्याबद्दल अजून काही छापून आलेलं दिसत नाही. चव्हाण यांची खासियतच ती आहे, जेवढं त्यांना वाटतं इतरांना कळावं तेवढंच दिसतं. पण राजकारण नेहेमीच त्याहून दाट आणि गहिरं असतं. यशस्वी राजकीय व्यक्तींची नेहेमीच काहीना काहीतरी “बिटवीन द लाईन्स अनटोल्ड स्टोरी” असते. ती शोधण्याचा आपण प्रयत्न करू. डोंबिवली ह्या चव्हाण यांच्या कर्मभूमीपासून ही सुरुवात करावी लागेल. (Ravindra Chavan )
रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan ) यांचं डोंबिवलीतलं स्थान किती खोल आहे हे बाहेरच्यांना एका मर्यादेपलीकडे माहिती नाही. तसेच चव्हाण यांचे महाराष्ट्रात विशेषतः नागपुरात कसे हितसंबंध आहेत आणि त्यांची दिल्लीत कशी उठबस आहे, त्यांची तिथं पत काय आहे, मुंबईच्या फायनान्शियल, बिझनेस व इंडस्ट्री सर्कलमध्ये किती डीप कनेक्ट्स आहेत आणि इतर ठिकाणी त्यांच्याकडे काय म्हणून बघतात यापासून डोंबिवलीकर अनभिज्ञ आहेत. चव्हाण यांची राजकीय शक्ती दृश्य स्वरूपात न दिसणाऱ्या व्यवस्थेत आहे. राजकारणात लांब पल्ला गाठायचा असेल अशा होतकरुंसाठी आजच्या स्टार्ट अप भाषेतली रविंद्र चव्हाण ही बेस्ट यूज केस आहे असं म्हणता येईल.
रविंद्र चव्हाण यांची डोंबिवलीतली एंट्री नव्वदच्या दशकातली. ते काही मूळचे डोंबिवलीकर नाहीत. त्यातही ते गावकुसाबाहेरच्या डोंबिवलीत आले, म्हणजे अवघा महाराष्ट्र ज्या डोंबिवलीला सुसंस्कृत लोकांचं शहर म्हणून ओळखतो ती डोंबिवली रामनगर, पेंडसेनगर, विष्णूनगर, फडके रस्ता, सावरकर रस्ता, केळकर रस्ता, दातार चौकात वसलेली. त्या चोखंदळ आणि बुद्धिजीवी डोंबिवलीने मानपाडा रस्त्यावरच्या चव्हाण यांना खूप उशिरा स्वीकारले. घट्ट जातीय समीकरणांचा आपल्या समाजव्यवस्थेत सांगायचं झालं तर एका मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधीसोबत ब्राह्मण डॉमिनेटेड संस्था आणि आगरी डॉमिनेटेड राजकीय व्यवस्थेने सुरुवातीपासून चार हातांचे अंतर राखले. नंतर मात्र दोन्ही घटकांनी त्यांना अक्षरशः पायघड्या घातल्या हे सांगायला नकोच.(Political News)
चव्हाण हे गहिरं पाणी आहेत, कसं हे पाहूया. डोंबिवलीतल्या संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हणजेच ब्राह्मण समाजाच्या अधिपत्याखाली आहेत. ग्रामदैवत श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली बँक, डोंबिवली जिमखाना, शाळा-कॉलेजेस अगदी रोटरी लायन्स क्लब पर्यंत एवढंच नव्हे तर डोंबिवलीत राहणारे पत्रकारदेखील संघ स्वयंसेवक. या व्यवस्थेत भांडुपच्या रवी चव्हाण यांना शिरायचं म्हणजे अवघडच काम. चव्हाण “शातीर दिमाख” असलेले कसलेले मुंबईकर. त्यांनी त्या व्यवस्थेत जाण्याचा बिलकुल आटापिटा केला नाही तर त्या व्यवस्थाच त्यांच्या दाराशी येतील याची खात्री केली. त्यांनी पैसा, वेळ, रिसोर्सेस उभारून किंवा एकत्र जमवून अशी एक इको सिस्टीम उभी केली की वेगवेगळ्या डोंबिवलीकर व्यक्ती आणि संस्था त्यांच्यासोबत जोडल्या गेल्या. या माध्यमातून डोंबिवलीत प्रत्यक्षात दिसून न येणारे परंतु अत्यंत प्रभावी असे “चव्हाण सेंटर” उभे राहिले. आज डोंबिवलीत अशी एकही मुख्य संस्था नाही ज्यात चव्हाण फॅक्टर काम करत नाही, ते सुद्धा प्रत्यक्षपणे ढवळाढवळ न करता.(Ravindra Chavan )
कुठल्याही गावातलं राजकारण, समाजकारण यामध्ये स्थानिक आणि बाहेरचे हा वाद असतोच. डोंबिवलीत आगरी लोकं स्थानिक. त्यांनी त्याचे दोन सोप्पे भाग केलेत. स्थानिक आगरी आणि भाडोत्री. जे आगरी नाहीत ते सर्वच भाडोत्री. त्यामुळे इथल्या जमिनीवर, राजकीय व्यवस्थेवर, राजकीय रचनेवर त्यांच्याच सात बाराचा उतारा लिहिलेला असं त्या समाजाचं मत, सर्वच पक्षांना ते मान्यही. पूर्वी शेकाप- काँग्रेसला मानणारा हा समाज. ऐंशीच्या दशकात उत्तरार्धात धर्मवीर आनंद दिघेंच्या करिष्म्याने शिवसेनेकडे झुकला. तरीही आमदारकी भाजपाकडेच राहील याची खातरजमा पूर्वसुरींनी केलेली. अर्थात कल्याणचे राम कापसे ते रवि चव्हाण यांच्या दरम्यानचे दोन्ही आमदार आगरीच. जगन्नाथ पाटील आणि हरिश्चंद्र पाटील. या आगरी समाजाच्या नेतृत्वाला पहिला धक्का दिला रविंद्र चव्हाण यांनी. २००९ साली तत्कालीन विद्यमान आमदार हरिश्चंद्र पाटील यांचे तिकीट कापायला भाजपा नेतृत्वाला कन्व्हिन्स करून रविंद्र चव्हाण यांनी उमेदवारी पटकावली. (Ravindra Chavan )
==================
हे देखील वाचा : Ravindra Chavan : रविंद्र चव्हाण यांची अनटोल्ड स्टोरी – भाग दोन
==================
आता आमदारकीची उमेदवारी तर मिळाली. नगरसेवक तर ते होतेच, स्टँडिंग कमिटी चेयरमनपदही त्यांनी शिवसेनेशी असलेल्या युतीत अंडरस्टँडिंग करून पदरात पाडले होते. राज ठाकरेंची मनसे डोंबिवलीत जोमात होती. मनसेसाठी नव्याच्या नवलाईचे दिवस होते. मात्र चव्हाण पॅटर्न विरोधकांना माहित नव्हता. राजकारणातील आर्थिक गणितं समजण्याची ताकद, मनस्थिती, तयारी. पक्षावर अवलंबून न राहता स्वतंत्र सिस्टीम उभारण्याचं कसब, राजकारणाला राजकारणाच्याच गतीने खेळावं लागतं या नियमावर अगाढ श्रद्धा, दुसऱ्याचं शांतपणे ऐकण्याची वृत्ती, थेट संपर्क करण्याची शैली, लोकांपर्यंत स्वतः पोहोचावं ते ही वेळेआधी ही संघ स्वयंसेवक म्हणून लावून घेतलेली चांगली सवय आणि विचारधारेवर पक्का विश्वास हे सर्व फॅक्टर्स चव्हाण यांच्या पहिल्या विजयात कारणीभूत ठरले. विनोद तावडे आणि राज ठाकरे यांच्या मैत्रीची किनारही त्यांच्या विजयाला आहे हे इथे नमूद करणे क्रमप्राप्त आहे. (Political News)
एकगठ्ठा मतांच्या जातीय समूहाचा खेळ बनलेल्या आजच्या राजकारणात कल्याण डोंबिवलीत दबाव गट नसलेल्या मराठा समाजाचा युवक ब्राह्मण आणि आगरी स्पर्धेतून स्वतःचं स्थान निर्माण करू शकला, याचं एकमेव कारण म्हणजे विचारधारेचा मतदारांवर असलेला पगडा. संघ भाजपाची जी उजवी विचारधारा आहे, त्या विचारधारेने या परिसरात अक्षरशः मतदार घडवलेत. रविंद्र चव्हाण नेहेमी विचारधारेचे पालुपद लावतात त्याच्या मुळाशी हे समीकरण आहे. नाहीतर एकेकाळी ब्राह्मण आगरी बहुसंख्य असलेल्या या डोंबिवलीत कोकणातला रवी चव्हाण कसा टिकला असता, हे त्यांना चांगलेच माहित. कारण विचारधारा ही सॉफ्ट पॉवर आहे हे त्यांनी अनुभवलंय.