डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच पहिली घोषणा केली ती जन्मसिद्ध नागरिकत्व कायद्यात बदल करण्याची. आत्तापर्यंत अमेरिकेचे नागरिकत्व नसलेल्यांनी अमेरिकेत मुल जन्माला दिल्यास त्या मुलाला जन्मसिद्ध अमेरिकेचे नागरिकत्व मिळत असे. त्यापाठोपाठ त्या मुलाच्या आईवडिलांचाही अमेरिकेचे नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग सुलभ होत असे. मात्र ट्रम्प यांनी या कायद्यालाच रद्द कऱण्याच्या हालचाली सुरु केल्यामुळे अमेरिकेतील स्थलांतरितांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यातील अनेक भारतीय नागरिक आहे. मुख्य म्हणजे, ट्रम्प यांनी यासंदर्भात कुठलाही कायदा करायच्या आता आपल्या मुलांना जन्म देण्यासाठी या पालकांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. (America)
सध्या अमेरिकेतील हॉस्पिटलमध्ये गर्भारपणाचे सात महिने पूर्ण झालेल्या अनेक महिला येत असून त्यांना आपल्या मुलाला अपूर्ण कालावधीतच जन्म द्यायचा आहे. यासाठी या आया डॉक्टरांना गळ घालत असून सात किंवा आठ महिने गर्भापणाचे पूर्ण झालेल्या या मातांना अशामुळे आपल्या गर्भात असलेल्या बाळांना धोका होऊ शकतो, याचीही जाणीव होत नाही. गेल्या दोन दिवसात अशा अनेक माता समोर आल्यामुळे डॉक्टरही गोंधळलेले आहेत. गर्भात अपूर्ण वाढ झालेल्या या मुलांना सिझरिनद्वारे जन्मला दिले तर त्यांच्यात आजारपण येण्याची भीती आहे. मात्र ही सर्व माहिती असूनही मुलांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळावे यासाठी त्यांच्या आया त्यांना वेदना देण्यासाठीही तयार झाल्या आहेत. 20 जानेवारी रोजी अमेरिकेची सत्ता हाती घेतलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्वाचा अधिकारात बदल करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. त्या अंतर्गत, आता संविधानातील 14 व्या दुरुस्ती अंतर्गत अमेरिकेत जन्मलेल्या सर्व मुलांना जन्मसिद्ध नागरिकत्वाचा अधिकार मिळणार नाही. ट्रम्प यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली तेव्हापासून, अमेरिकेत रहाणा-या मातांना धडकी भरली आहे. या माता आता काही दिवसातच मुलांना जन्म देणार आहेत. (International News)
मात्र ट्रम्प यांचा आदेश लागू होईपर्यंत आपले बाळंतपण व्हावे यासाठी त्यांनी थेट रुग्णालयात धाव घेतली आहे. ही परिस्थिती एवढी भयाण आहे की, अमेरिकेतील प्रसूतीगृहांपुढे सात महिने पूर्ण झालेल्या महिलांनी रांग लावलेली दिसून येत आहे. या महिला याच महिन्यात आपल्या बाळाला जन्म द्यावा म्हणून डॉक्टरांकडे आग्रह धरत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा आदेश कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर 30 दिवसांनी लागू होईल. म्हणजेच 20 फेब्रुवारीनंतर जन्मलेल्या मुलांना अमेरिकेचे जन्मसिद्ध नागरिकत्व मिळणार नाही. यामुळे, अनेक माता त्यांची मुले 20 फेब्रुवारीपूर्वी जन्माला यावीत यासाठी डॉक्टरांची मनधरणी करत आहेत. यामुळे त्यांच्या बाळाला आणि त्यांनाही धोका निर्माण होऊ शकतो, याची जाणीव डॉक्टरांनी करुन दिल्यावरही या माता फक्त अमेरिकन नागरिकत्वासाठी आपल्या हट्टावर ठाम आहेत. यामध्ये भारतीय मातांचीही संख्या अधिक आहे. अमेरिकेचे जन्मसिद्ध नागरिकत्व मिळवण्याच्या नादात या माता आपल्या मुलांचे आयुष्य धोक्यात टाकत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. नऊ महिने पूर्ण झाल्याशिवाय बाळंतपण केले तर ते बाळाला आणि त्याच्या आईच्या जीवालाही धोकायदायक ठरु शकते. (America)
================
हे देखील वाचा : Trump And Musk : ट्रम्प आणि मस्क कट्टर विरोधक ते पक्के मित्र !
================
तसेच यातून जन्माला आलेल्या मुलांना फुफ्फुसांच्या समस्या, जन्मतः कमी वजन आणि मज्जातंतूंच्या समस्या होण्याची शक्यता असते. शिवाय गर्भार असलेल्या मातांना आपल्या मुलाच्या भविष्यासाठी नको तो ताण घेतला तर त्याचा परिणामही गर्भात असलेल्या मुलावर होण्याची शक्यता आहे. अनेक मातांचे ब्लडप्रेशरही या चिंतेने वाढलेले आढळून आले आहे. त्यामुळे या नवीन समस्येबाबत अमेरिकेतील डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेतील न्यूजर्सी, न्यूयॉर्क सारख्या शहरातील प्रसुतीगृहातील डॉक्टरांनी आता अशा बाळतंपणाचा आग्रह करणा-या पालकांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. तसेच त्यांच्या मुलांचे भावी आयुष्य धोक्यात येईल याची माहिती सांगायला सुरुवात केली आहे. सध्या अमेरिकेत 70 टक्क्याहून अधिक H1B व्हिसाधारक भारतीय आहेत. त्यांना अमेरिकेत रहाण्यासाठी मूल होणे हाच एकमेव सोप्पा मार्ग दिसत आहे. मात्र यासाठी ते आपल्या न जन्माला आलेल्या मुलाचे आयुष्य धोक्यात टाकत आहेत. (International News)
सई बने