Home » Khlong Khuan Ganesha : या देशात आहे, सर्वात उंच गणेशमूर्ती !

Khlong Khuan Ganesha : या देशात आहे, सर्वात उंच गणेशमूर्ती !

by Team Gajawaja
0 comment
Khlong Khuan Ganesha
Share

भारतातील नव्हे तर चक्क थायलंडमधील एका गणपती बाप्पाच्या मूर्तीनं तमाम गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतात भगवान गणेशाला समर्पित असंख्य मंदिरे आहे. मात्र भगवान गणेशाची सर्वात उंच मूर्ती भारतात नाही तर थायलंडमध्ये असून सध्या याच उंच गणपती बाप्पाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. थायलंडमध्येही भगवान गणेशाची पूजा बुद्धीचा देव म्हणून केली जाते. थाई संस्कृतीत भगवान गणेशाला ज्ञान, यश आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. याच गणेशाची सर्वात उंच मूर्ती आता थायलंडमध्ये जगातील सर्वात उंच गणेशमूर्ती चाचोएंगसाओ प्रांतात असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही मूर्ती 36 मीटर उंच म्हणजेच 128 फूट उंच आहे. (Khlong Khuan Ganesha)

ही मूर्ती कांस्य धातूपासून बनलेली आहे. ही भव्य मूर्ती उभारण्यासाठी 854 वेगवेगळ्या तुकड्यांचा वापर करण्यात आला आहे. ही मूर्ती ख्लोंग खुआन गणेश आंतरराष्ट्रीय उद्यानात आहे. बांग पाकोंग नदीच्या काठावर असलेली ही मूर्ती दूरवरून लोकांचे लक्ष वेधून घेते. त्याचे बांधकाम 2012 मध्ये पूर्ण झाले आणि मूर्ती उभारण्यासाठी तब्बल चार वर्ष लागली. आता थायलंडमध्ये ख्लोंग खुआन गणेश आंतरराष्ट्रीय उद्यान हे फक्त पर्यटन स्थळ नाही तर थाई संस्कृती आणि अध्यात्माचे एक अद्भुत प्रतीक म्हणून या स्थळाचा उल्लेख करण्यात येतो. हे पर्यटनस्थळ 40000 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेले आहे. येथे जगभरातून आलेल्या पर्यटकांची वर्षभर गर्दी असते. गणरायाची ही भव्य मूर्ती पिटक चालेउमलाओ या प्रसिद्ध मूर्तीकारांनी तयार केली आहे. गणपतीची ही मूर्ती विशेष प्रतीकात्मक अर्थांनी बनवण्यात आली आहे. या गणरायाच्या मूर्तीला चार हात आहेत. त्या चारही हातामध्ये ऊस, फणस, केळी आणि आंबा आहेत. यातून थायलंडमधील समृद्धी, संपन्नता आणि प्रगतीचा संदेश देण्यात आला आहे. (International News)

या गणरायाचे पाय हे लांब असून त्यातून राष्ट्राच्या प्रगतीचे आणि विकासाचे प्रतीक मानले गेले आहे. या गणरायाच्या मुकुटावर कमळाचे फूल कोरण्यात आले आहे. हे कमळाचे फूल ज्ञानाचे प्रतीक आहे. तर पुतळ्याच्या वरच्या बाजूला “ओम” चिन्ह त्यांच्या देवत्वाची आणि रक्षक स्वरूपाची आठवण करून देत आहे. गणरायाचे हे संपन्न आणि भव्य रुप बघण्यासाठी या उद्यानात आता पर्यटकांची नेहमी गजबज असते. थायलंडमधील नागरिक हे गणरायाचे भक्त आहेत. त्यांच्या घरांमध्ये, विद्यापीठांमध्ये आणि कार्यालयांमध्येही भगवान गणेशाच्या मूर्ती आणि प्रतिमा स्थापित करण्यात आलेल्या आहेत. यातून समृद्धीचा आशीर्वाद मिळतो, असा तेथील नागरिकांचा विश्वास आहे. थायलंडमध्येही श्रीगणेशचतुर्थी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. येथील मंदिरांमध्ये त्या दिवशी विशेष पूजा ठेवण्यात येतात, त्याला थायी नागरिक गर्दी करतात. (Khlong Khuan Ganesha)

याशिवाय थायलंडमध्ये अन्यही हिंदू मंदिरे असून या मंदिरांमध्येही कायम भाविकांची गर्दी असते. बँकॉकमधील श्री महा मरीअम्मन मंदिर हे, देवी मरीअम्मनला समर्पित आहे. हे थायलंडमधील सर्वात मोठे आणि सर्वात प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. 1860 च्या दशकात तमिळ स्थलांतरितांनी हे मंदिर उभारले. माता पार्वतीचा एक अवतार म्हणून पुजल्या जाणा-या देवी मरीअम्मन यांना समर्पित या मंदिरात अनेक उत्सव साजरे होतात. या उत्सवांना हजारो थायी नागरिक गर्दी करतात.

=======

Andhra Pradesh : श्री यागंती उमा महेश्वर मंदिरातील नंदीचे रहस्य !

========

थायलंडमध्ये येणारे पर्यटकही या मंदिराला आवर्जून भेट देतात. याशिवाय बँकॉकचेच महाब्रह्म मंदिर हे भगवान ब्रह्माला समर्पित आहे. या मंदिरात भगवान ब्रह्माला वंदन करण्यासाठी जसे मोठ्या संख्येनं भाविक येतात, तसेच मंदिराचे वास्तूशास्त्र बघण्यासाठीही पर्यटक मोठ्यासंख्येनं गर्दी करतात. या मंदिरापर्यंत जाण्यासाठी भाविकांना 3790 पाय-या चढाव्या लागतात. मात्र या उंचीवर बँकॉकचे दिसणारे दृश्य विहंगम आहे. याशिवाय बँकॉकमध्येच वाट वित्सानु मंदिर असून हे मंदिर भगवान विष्णू, उमा देवी आणि भगवान गणेश या देवतांच्या मूर्ती या मंदिरात आहेत. (International News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.