भगवान शंकराला अभिषेक घालण्यात येतो. भगवान शंकराच्या पिंडीवर सतत अभिषेक होईल यासाठी कलशही लावण्यात येतो. मात्र गुजरातमध्ये असे भगवान शंकराचे मंदिर आहे, जेथे स्वतः समुद्रदेवता त्यावर दिवसातून दोनवेळा अभिषेक करतात. हे मंदिर दिवसातून दोनवेळा समुद्रात गायब होते. गेली अनेक वर्ष या मंदिरातील भगवान शंकराच्या पिंडीवर नैसर्गितरित्या अभिषेक होत आहे. हे मंदिर म्हणजे, स्तंभेश्वर मंदिर (Stambeshwar Temple). भगवान शंकराचे हे मंदिर दिवसातून दोनवेळा पूर्णपणे समुद्रात सामावले जाते. निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी आणि या जागृत स्थळाचे दर्शन घेण्यासाठी येथे नेहमी भक्तांची गर्दी असते.
गुजरातची राजधानी गांधीनगरपासून 175 किमी अंतरावर असलेल्या जंबुसरच्या कवी कंबोई गावात भगवान शंकराचे अनोखे मंदिर आहे. 150 वर्षे जुने असेलेल हे मंदिर म्हणजे, स्तंभेश्वर महादेव मंदिर (Stambeshwar Temple). आहे. हे मंदिर अरबी समुद्र आणि खंभातच्या खाडीने वेढलेले आहे. भर समुद्रात असलेले हे मंदिर पहाण्यासाठी शिवभक्त देशभरातून येथे येतात.
स्तंभेश्वर महादेव मंदिर (Stambeshwar Temple).भर समुद्रात आहे. एवढ्या खोल भागात भगवान शंकराच्या पिंडीची स्थापना कोणी केली, हा प्रश्न विचारला जातो. कारण येथील समुद्र नेहमी खवळलेला असतो. जिथे मंदिर आहे, तो भाग दिवसातून दोनवेळा पूर्णपणे पाण्याखाली जातो, अशावेळी येथे भव्य अशी शिवपिंड कशी स्थापन झाली, हा प्रश्न भक्तांना पडतो. त्यामागे एक पौराणिक कथा सांगण्यात आली आहे.
शिवपुराणानुसार तारकासुर नावाच्या राक्षसाने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी खूप वर्ष तपश्चर्या केली. तारकासुराच्या तपश्चर्येवर देव प्रसन्न झाले आणि तारकासुराला वरदान मागायला सांगितले. तेव्हा तारकासुरानं भगवान शंकराकडे, भगवान शंकराच्या पुत्राशिवाय दुसरे कोणीही वध करू शकणार नाही. शिवाय त्या मुलाचे वय 6 दिवसांपेक्षा जास्त नसावे, असा वर मागितला. महादेवाने प्रसन्न होऊन तारकासुराला हा वरदान दिला. पण वरदान मिळाल्यानंतर तारकासुर लोकांना त्रास देऊ लागला. त्यामुळे देवांनी भगवान शंकराकडे त्याचा वध करण्याची मागणी केली. तेव्हा 6 दिवसांच्या कार्तिकेयाने जन्म घेतला आणि तारकासुराचा वध केला. पण ही बातमी समजताच भगवान शंकर दुःखी झाले. तारकासुर हा शिवभक्त होता. यामुळे भगवान कार्तिकेयाला अपराधी वाटू लागले. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला प्रायश्चित्त करण्यासाठी एक उपाय सुचवला. भगवान विष्णूनी कार्तिकेयाला ज्या ठिकाणी तारकासुराचा वध केला, त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करण्यास सांगितले.
भगवान विष्णूच्या सांगण्यावरून कार्तिकेयाने स्थापन केलेले हे शिवलिंग पुढे स्तंभेश्वर महादेव(Stambeshwar Temple) म्हणून प्रसिद्ध झाले. येथे तारकासुराचा वध झाला. म्हणजे, वाईट वृत्ती संपली, म्हणजेच इथे येणा-या भक्ताच्या मनातील वाईट विचार नष्ट होतात, अशी मान्यता आहे.
पौराणिक मान्यतेनुसार, भगवान शंकर स्वत: स्तंभेश्वर महादेव मंदिरात वास्तव्य करतात. म्हणूनच समुद्रदेव स्वत: त्यांच्यासाठी जलाभिषेक करतात. याच ठिकाणी महिसागर नदी समुद्राला मिळते. या संगमामुळे हे स्थान अतिशय पवित्र मानले जाते. हे मंदिर भर समुद्रात आहे. समुद्राला भरती आल्यावर मंदिर पूर्णपणे पाण्यात जाते. पण समुद्राला ओहोटी लागल्यावर मंदिर पुन्हा दिसू लागते. भगवान शंकराचा जलाभिषेक समुद्राच्या पाण्याने केला जातो अशी लोकांची श्रद्धा आहे. हे दृष्य पाहण्यासाठी येथे भाविक सकाळपासून रात्रीपर्यंत थांबतात.
==========
हे देखील पहा : हिंदू धर्मात या पानांना मानले जाते पवित्र, देवाला अर्पण केल्याने मिळतो आशीर्वाद
==========
स्तंभेश्वर महादेव मंदिरात(Stambeshwar Temple) दरवर्षी महाशिवरात्री आणि अमावस्येला मोठी यात्रा भरते. याशिवाय प्रदोष आणि पौर्णिमेलाही येथे भक्तांची गर्दी होते. पौर्णिमेच्या रात्री भर समुद्रातील या शिवमंदिराचे दृष्य मोठे मनमोहक असते. ते पाहण्यासाठीही येथे गर्दी होते. स्तंभेश्वर महादेवाच्या दर्शनाने भक्तांची सर्व संकट दूर होतात अशी मान्यता आहे. या मंदिराचा उल्लेख शिव महापुराण अध्याय 11 मध्ये आणि रुद्र संहिता भाग 2 च्या पृष्ठ क्रमांक 358 मध्ये आहे. या मंदिराचा शोध सुमारे 150 वर्षांपूर्वी लागला होता. या मंदिरात असलेल्या शिवलिंगाचा आकार चार फूट उंच आणि दोन फूट व्यासाचा आहे. या प्राचीन मंदिराच्या मागे अरबी समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. स्तंभेश्वर महादेव मंदिरात(Stambeshwar Temple) येतांना भक्तांनी भरती ओहोटीच्या वेळा बघूनच यावे, असे आवाहन करण्यात येते.
सई बने…