महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील देउड येथे पाषाणयुगातील चित्रे आहेत. यांना कातळशिल्प असे म्हटले जाते. या कातळशिल्पांना राज्य सरकारने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. देउड येथे प्रसाद शंकर आपडे यांच्यासह अन्य ग्रामस्थांच्या जागेत कातळशिल्प आढळून आली आहेत. हे सर्व ठेवा पाषाणयुगातील असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यात लाल कातळावर एकशिंगी गेंडा, गाढव, वानर, हरिण अशा प्राण्यांच्या पावलांचे ठसे रेखाटण्यात आले आहेत. या कातळशिल्प परिसरातील ३१० चौरस मीटर क्षेत्रफळ जागा संरक्षित स्मारक म्हणून राज्य सरकारनं घोषित केली आहे.
रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात कातळशिल्प आढळून आली आहेत. या कातळशिल्पांची जोपासना व्हावी यासाठी राजसरकारनं पुढाकार घेतला आहे. या कातळशिल्पांमध्ये १,५०० अधिक कलाकृती आहेत. त्यातील सात कलाकृतींना युनेस्कोने संरक्षित स्मारक म्हणून मान्यता दिली आहे. देउड येथील हा सर्व कातळशिल्पांचा म्हणजेच पेट्रोग्लिफ्सचा समूह २०,०००-१०,००० वर्षापूर्वीच्या मेसोलिथिक कालखंडातील असल्याची माहिती आहे. जिओग्लिफ्स आणि पेट्रोग्लिफ्स हे प्राचीन कलेचे विविध प्रकार आहेत, दोन्हीमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा खडकाच्या पृष्ठभागावर प्रतिमा किंवा कलाकृती आखण्यात येतात. ट्रोग्लिफमध्ये गेंडा, हरण, माकड, गाढव आणि पायाचे ठसे दाखवण्यात येतात. अशीच कातळशिल्प दापोली तालुक्यातील उंबर्ले येथेही आढळली आहेत. त्यांची लांबी १७ फूट आहे. (The story of carvings)
ऐतिहासिक कालखंडातील सांस्कृतिक ठेवा म्हणून कातळ शिल्पांना महत्त्व आहे. सोबत त्या काळातील सजीवांची माहिती देणारे ते एक साधनही आहेत. या कातळशिल्पांमध्ये अनेक प्राण्यांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. २० हजार वर्षापूर्वी हे प्राणी कसे दिसत असतील याचा अंदाज त्यावरुन काढता येऊ शकतो. त्यामुळे जैव अभ्यासकांसाठीही या कातळशिल्पांचे महत्त्व मोठे आहे. प्राचीन मानवाच्या उत्क्रांतीचा पुरावा म्हणूनही या कातळशिल्पांकडे बघितले जाते. महाराष्ट्रातील कोकण विभागात या कातळशिल्पांची संख्या मोठी असल्यामुळे पाषाणयुगातील कोकण कसा असेल याचाही अभ्यास यावरुन करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर आणि देवगड आणि सिंधुदुर्ग तालुक्यांतील ५० गावांमध्ये अशा कलाकुसर आढळून आल्या आहेत. कोकण चि-यांचा दगड मोठ्या प्रमाणात आढळून येतो. याच चि-यांच्या कातळावर असलेली कातळचित्रे गेल्या अनेक वर्षापासून संशोधकांच्या उत्सुकतेची आहेत. मात्र या कातळशिल्पांची योग्य प्रकारे काळजी घेतली नाही तर ती विकासाच्या नावाखाली नष्ट होतील, अशीही भीती होती. त्यामुळेच राज्य सरकारनं या कातळशिल्पांना संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. (The story of carvings)
२००१ मध्ये, पुरातत्व अभ्यासक सतीश ललित यांनी या कातळशिल्पांचा शोध लावला. त्यानंतर काही कातळ शिल्पांचा समावेश युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला. तेव्हापासून ही कातळशिल्प चर्चेत आली. मग एकापाठोपाठ एक अशी कातळशिल्प मिळू लागली. त्यात रत्नागिरीमधील जयगड, चावे, रामरोड, करबुडे, मासेबाव, निवळी, गोळप, निवळी गावडेवाडी, कापडगाव, उमरे, कुरतडे, कोळंबे, गणेशगुळे, मेरवी, गावखडी, डोरले या गावात कातळशिल्प आढळून आली आहेत. तर राजापूर तालुक्यात देवाचे गोठणे, सोगमवाडी, गोवळ, उपळे, साखरे कोंब, विखारे गोठणे, बारसू, पन्हाळे, शेडे, कोतापूर, देवीहसोळ येथे कातळशिल्प मिळाली आहेत. यासह देवगड आणि मालवण तालुक्यातही कातळशिल्प आढळली आहेत. आता अशीच कातळशिल्प अन्य भागातही मिळतील म्हणून शोध चालू आहेत. (The story of carvings)
====================
हे देखील वाचा : श्रावणी शुक्रवारचे महत्व, पूजाविधी आणि कथा
===================
रत्नागिरी, राजापूर, लांजा या भागात पूर्वेकडे २५ किलोमीटर आणि ईशान्येकडे सुमारे दीडशे किलोमीटर अंतरापर्यंत ३७०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या गावांमध्ये शिल्पे खोदण्याचे आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे. ही सर्व कातळशिल्प पाषाणयुग काळातील आहेत. यातील बहुतांश ठिकाणी कासव आणि अन्य प्राण्यांच्या पायांच्या खुणा आहेत. काही ठिकाणी प्रवाळ खडकांमध्ये समुद्री कासव, मगरी आणि विविध प्रकारची माशांची शिल्पे पाहायला मिळतात. या कलेला रॉक आर्ट म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राशिवाय मध्य प्रदेशातील प्रसिद्ध भीमबेटका साइटवर अशीच गुहा चित्रे आहेत. या सर्व कातळशिल्पांचा अधिक व्यापक दृष्टीनं अभ्यास व्हावा अशी स्थानिकांची मागणी आहे. तसेच परदेशात ज्या ठिकाणी असे रॉक आर्ट आहे, तिथे मोठ्या प्रमाणात पर्यटनाचा विकास करण्यात आला आहे. तसाच या कातळशिल्पांचा प्रचार करुन पर्यटन वाढवावे अशी मागणी आहे. (The story of carvings)
सई बने.