Home » देशातील सर्वात कमी वेगानं धावणारी ट्रेन

देशातील सर्वात कमी वेगानं धावणारी ट्रेन

by Team Gajawaja
0 comment
Nilgiri Mountain Express
Share

वंदे भारत, बुलेट ट्रेन, अमृत भारत या भारतीय रेल्वेच्या आधुनिक रुपामळे भारतीय रेल्वेचे रुपडे बदलून गेले आहे. वंदे भारत ट्रेन तर संपूर्ण भारताची लाडकी झाली आहे. या गाडीचा सरासरी वेग ८४.२१ किलोमीटर प्रति तास आहे. हिमाचल प्रदेशसाठी धावणाऱ्या वंदे भारतला दिल्ली आणि अंब अंदौरा दरम्यानचे ४३७ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ५ तास १५ मिनिटे लागतात. अगदी काही क्षणात समोरुन जाणा-या या गाडीला वेगवान गाडी म्हटले जाते. मात्र या गाडीच्या अगदी विरुद्ध रेल्वेही भारतात आहे. आणि ती सुद्धा वंदे भारत सारखी लोकप्रिय आहे, हे सांगितल्यावर आश्चर्य वाटले.

एकीकडे वंदेभारत वेगाबरोबर स्पर्धा करीत आहे तर ही ट्रेन ४६ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तब्बल ५ तास घेते. पण या अतिशय धिम्या गतीच्या ट्रेनच्या तिकिटासाठीही तेवढीच गर्दी असते. या गाडीचा प्रवास म्हणजे, नितांत सुंदर निसर्गाच्या कुशीत गेल्याची भावना पर्यटकांना होते. ही ट्रेन आहे, निलगिरी माउंटन एक्स्प्रेस. तामिळनाडूमधील मेट्टुपालयम स्टेशन ते उटी येथील उधगमंडल स्थानकापर्यंत धावणारी ही भारतातील सर्वात धीम्या गतीची ट्रेन आहे. (Nilgiri Mountain Express)

निलगिरी माउंटन एक्स्प्रेस केलर, कुन्नूर, वेलिंग्टन, लव्हडेल आणि ओटाकमुंड स्टेशन यासारख्या निसर्गानं नटलेल्या स्थळांचा अधिक नव्यानं परिचय करुन देते. मेट्टुपालयम येथून सुरू होणा-या या निलगिरी माउंटन एक्स्प्रेसमधून प्रवास करण्यासाठी देशभरातील पर्यटक गर्दी करतात. मुख्य म्हणजे, या निलगिरी माउंटन एक्स्प्रेसचे तिकिटही सर्वसामान्यांना परवडेल असेच आहे. प्रथम श्रेणीच्या प्रवासासाठी ५४५ रुपये खर्च करावे लागतात. तर द्वितीय श्रेणीसाठी २७० रुपयांचे तिकीट आहे.

भारतात बुलेट ट्रेन लवकरच सुरु होत आहे. २०२६ पासून बुलेट ट्रेन भारतीय रेल्वेमध्ये मानाचे स्थान घेईल, असे सांगितले जाते. एकीकडे रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्याचे काम सुरू असतांना निलगिरी माउंटन एक्स्प्रेस सारख्या ट्रेनची ओळख तिच्या धिम्या गतीच्या वेगामुळे झालेली आहे. देशातील या सर्वात धीम्या गतीच्या ट्रेनला ४६ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ५ तास लागतात. तरीही निलगिरी माउंटन रेल्वेचा ट्रॅक हा अभियांत्रिकीचा चमत्कार मानला जातो.

या पाच तासांच्या प्रवासात हा अभियांत्रिकीचा चमत्कार पहाता येतोच, शिवाय संपन्न अशा निसर्गाला भेट दिल्याचे समाधानही पर्यटकांना मिळते. निळ्या आणि सोनेरी रंगाच्या लाकडी डब्यांनी बनलेली आणि मोठ्या खिडक्या असलेली ही ट्रेन आपल्या ४६ किमीच्या प्रवासात १६ बोगदे आणि २५० हून अधिक पूल पार करते. (Nilgiri Mountain Express)

निलगिरी माउंटन एक्स्प्रेस ब्रिटिशांनी १८९९ मध्ये सुरु केली. वाफेच्या इंजिनावर चालणा-या या गाडीला २००५ मध्ये, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. निलगिरी माउंटन एक्स्प्रेस, मेट्टुपालयम स्टेशन ते उटी येथील उधगमंडल स्थानकापर्यंत धावते. ट्रेन पहिले ५ किमी सरळ मार्गावर धावते. पण त्यानंतर पुढच्या १२ किमी मध्ये ट्रेन वेगाने ४,३६३ फूट उंचीवर जाते. या सर्व प्रवासात प्रवाशांना घनदाट जंगल बघता येते. तसेच डोंगर उतारावरुन जाण्याचा अनुभव घेता येतो. थंडीच्या दिवसात हा संपूर्ण परिसर दाट धुक्यानं वेढलेला असतो. हा सर्व अनुभव घेतांना पर्यटक आनंदित होतात. या गाडीला आधुनिक रुप देण्याचा सरकारचा मानस होता.

==================

हे देखील वाचा: पीएम मोदी यांच्याकडून अमृत भारत स्टेशन योजना लॉन्च

==================

मात्र जागतिक वारसा स्थळांच्या यादीत निलगिरी माउंटन एक्स्प्रेस समावेश झाल्यावर आधुनिकीकरणाची योजना रद्द करण्यात आली. या गाडीला भारताची पर्वतीय रेल्वे म्हणूनही ओळखले जाते. शाहरुख खान अभिनीत ‘दिल से’ या हिंदी चित्रपटातील छैय्या छैया हे प्रसिद्ध हिंदी गाणे याच रेल्वे ट्रेनच्या छतावर चित्रित करण्यात आले आहे. नीलगिरी पर्वताच्या टेकड्यांवर ही गाडी हळूवारपणे चढते. तसेच बोगदे आणि वळवळांचे हे अंतर पार करतांना पर्यंटकांची उत्सुकता शिगेला जाते. (Nilgiri Mountain Express)

त्यामुळे ही निलगिरी माउंटन एक्स्प्रेस कितीही जुनी असली तरी तिच्या तिकीटांसाठी गर्दी मात्र कमी होत नाही. या ट्रेनचे सौदर्यही अनोखे आहे. लाकडी डबे ही या गाडीची ओळख आहे. जातांना ५ तास लागत असले तरी हेच अंतर डाउनस्ट्रीमसाठी केवळ ३ तास ३० मिनिटात गाडीपार करते. त्यामुळेच ही पर्यटकांसाठी दिवसभराची ट्रीप आनंददायी ठरते. भारतीय रेल्वेच्या www.irctc.co.in वेबसाइटवरून या ट्रेनचे तिकीट बुक करता येते.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.