Home » चीनमध्ये मुस्लिम धर्मियांची स्थिती बिकट

चीनमध्ये मुस्लिम धर्मियांची स्थिती बिकट

by Team Gajawaja
0 comment
China
Share

भारतात मुस्लिमांवर अन्याय होत असल्याची तक्रार करत जगभर फिरणा-या पाकिस्तानला चीनमध्ये (China) होणारे अत्याचार मात्र दिसत नाहीत. चीनमध्ये उईगर  मुस्लिम धर्मियांची अवस्था अतिशय बिकट आहे. मध्यंतरी रमजानच्या महिन्यातही चीननं मुस्लिम धर्मियांवर अनेक बंधने टाकल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता चीन (China) प्रशासनानं कुराण ठेवल्याबद्दल मुस्लिमांना अतिरेकी म्हणून शिक्काच मारला आहे. याशिवाय  त्यांचे फोनही टॅप केले जात आहेत. चीनमध्ये राहत असलेले मुस्लिम धर्मिय गाणीही लावू शकत नाहीत, एवढा वचक त्यांच्यावर चिनी प्रशासनाचा आहे.   

चीनच्या (China) शिनजियांग प्रांतात एक कोटी मुस्लिम राहतात, ज्यात बहुसंख्य मुस्लिम उईगर अल्पसंख्याक आहेत. उईगर मुस्लिम स्वतःला चीनचे रहिवासी मानत नाहीत. या प्रदेशात तुर्किक वंशाच्या उईगर मुस्लिमांची लोकसंख्या एक कोटीच्या वर आहे. उईगर मुस्लिम तुर्की भाषा बोलतात. चीनमध्ये (China) कुठेही काही हल्ला झाल्यास चीन थेट उईगर मुस्लिमांवर आरोप करुन त्यांना तुरुंगावासाची शिक्षा देत आहे. याच कारणावरुन शिनजियांग भागात उईगर आणि चिनी सुरक्षा दलांमध्ये वारंवार हिंसक चकमकी होत असतात.

चीनमधील (China) उईगर मुस्लिमांची स्थिती बिकट होत चालली आहे. मानवी हक्क संरक्षण संस्थेच्या एका नवीन अहवालानुसार, चीनच्या शिनजियांग प्रांतातील मुस्लिमांना कुराण किंवा धार्मिक फोटो जवळ बाळगल्यास अतिरेकी म्हणून संबोधण्यात येत आहे. याशिवाय मोबाईलमध्ये कुठलाही धार्मिक व्हिडीओ आढळल्यास त्यांच्यावर ‘हिंसक अतिरेकी’ म्हणून लेबल लावले जात आहे. याशिवाय चिनी अधिकाऱ्यांनी मुस्लिम धर्मियांचे फोनही टॅप केल्याची माहिती मानवी हक्क संरक्षण संस्थेच्या अहवालात देण्यात आली आहे.  

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिनजियांगमध्ये मुस्लिम धर्मियांना ओलिस बनवून छळ होत आहे. कुराण बाळगल्यास किंवा धार्मिक व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये आढळल्यास त्यांना थेट कोठडीत ठेवण्यात येते.  अशांच्या सुटकेची कोणतीही शक्यता नसते. ब-याचवेळा अशापद्धतीनं आपल्या नातेवाईकांना अटक झाल्याची बातमी कुटुंबियांना नसते.  शोधाशोध केल्यावर यासंदर्भात माहिती मिळते. मात्र या तुरुंगातून सुटका करण्याचा मार्ग मात्र अत्यंत खडतर आणि खर्चिक आहे. याशिवाय अधिक गंभीर गोष्ट म्हणजे यापैकी अनेकांच्या शरीरातील अवयव काढून त्याची विक्री होत असल्याची माहिती आहे. या कैद्यांवर लैगिक अत्याचार होत असल्याची माहितीही या अहवालात आहे. या अहवालानुसार चीनच्या शिनजियांग प्रदेशात 1.5 दशलक्षाहून अधिक धार्मिक अल्पसंख्याकांना ओलीस ठेवण्यात आले आहे.

चिनी (China) सरकारी अधिकारी अल्पसंख्याकांना नजरकैदेत ठेवतात, येथे त्यांना जबरदस्तीने औषधे दिली जातात. त्यांची नसबंदीही करण्यात येते.  याशिवाय चिनी तरुणांचे लग्न मुस्लिम तरुणींबरोबर लावण्यात येत आहे. चीनमधील हान समुदायातील तरुणांना लग्नासाठी विशेष भत्ता दिला जात आहे. मानवाधिकार आयोगाच्या अहवालानुसार जर एखाद्या मुस्लिम मुलीने लग्नाला विरोध केला तर तिच्या पालकांना तुरुंगात टाकले जाते.  या आंतरजातीय विवाहासाठी जोडप्यांना मोफत निवास, वैद्यकीय सुविधा आणि इतर प्रकारचे विशेष भत्ते देखील दिले जातात. अर्थात या सर्व सुविधा हान मुलांच्या नावाने दिल्या जातात. चीनमध्ये दोन कोटींहून अधिक मुस्लिम आहेत. येथे 30 हजारांहून अधिक मशिदी आणि 10 मुस्लिम वांशिक गट आहेत. यापैकीच एक ‘उईगर’ समुदाय आहे. हे उईगर मुस्लिम चीन सरकारच्या विरोधात अनेकवेळा आंदोलन करत असून या आंदोलनाला चीन (China) विरोधातील आंदोलन म्हणून चिनी सरकार उल्लेख करीत आहे.  

======

हे देखील वाचा : कर्नाटकमधील निवडणूक प्रचारात हनुमानाची एन्ट्री

======

1990 मध्ये सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर शिनजियांग येथील लोकांनी या प्रदेशाच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलने केली. या आंदोलनाला मध्य आशियातील अनेक मुस्लिम देशांचा पाठिंबाही होता. मात्र चीनच्या (China) दबावापुढे कोणत्याही देशानं प्रत्यक्ष या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही.  गेल्या काही वर्षांत या भागात हान चिनी लोकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. त्यासाठीच हान चिनी तरुणांचे लग्न उईगर मुस्लिम तरुणीबरोबर लावून देण्यात येत आहे. या भागातील मुस्लिम तरुणांना नमाज करता येत नाही.  तसेच दाढीही ठेवता येत नाही. उईगर मुस्लिम महिलांना बुरखा घालण्यासही मनाई आहे. आता या उईगर मुस्लिमांचा फोनही टॅप करण्यात येत असून त्यामागे वाढत्या अतिरेकी कारवाया हे कारण चिनने पुढे केले आहे.  

सई बने  


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.