७० मॅचेस, १० टीम्स आणि जवळपास दीड महिन्यांहून अधिक कालावधीनंतर आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवणाऱ्या चार टीम्स कुठल्या याचं उत्तर आपल्याला अखेर मिळालं आहे. उत्कंठा शिगेला पोहोचवणाऱ्या साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यापर्यंत चार टीम्स कुठल्या याचं उत्तर मिळालेलं नव्हतं. गुजरातने बंगळूरूला पाणी पाजलं आणि आपल्याला आयपीएलच्या या पर्वातील जेतेपदाच्या मार्गातील पहिला अडथळा पार करणाऱ्या चार टीम्स कुठल्या आहेत याचं उत्तर मिळालं. (Playoff)
आयपीएलच्या प्लेऑफसाठी पात्र होणारी पहिली टीम होती गुजरात टायट्न्स. भेदक गोलंदाजी करणार गोलंदाजी युनिट, सलामीवीरापासून फिनिशरपर्यंत प्रत्येक फलंदाजांनी जबादारीने केलेली फलंदाजी आणि हार्दिक पांड्याच्या कुशल नेतृत्वात गुजरातने साखळी सामन्यात १४ पैकी तब्बल १० सामन्यांमध्ये विजय मिळवला. संपूर्ण साखळी फेरीत वर्चस्व गाजवत गुजरातच्या संघाने आरामात प्लेऑफचे तिकीट मिळवले. १४ सामन्यातील २० गुणांसह गुजरातने गुणतालिकेत पहिले स्थान काबीज केले.(Playoff)
धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स आयपीएल प्लेऑफसाठी पात्र होणारा दुसरा संघ ठरला. युवा खेळाडूंची चमकदार कामगिरी, अनुभवी खेळाडूंची त्यांना लाभलेली साथ आणि महेंद्र सिंग धोनीचे जादुई नेतृत्व यामुळे चेन्नईला प्लेऑफ पर्यंत धडक मारता आली. अडखळत सुरुवात झाल्यानंतर चेन्नईच्या संघाने चांगलाच सूर पकडत १४ सामन्यापैकी ८ सामन्यात विजय नोंदवत १७ गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले.(Playoff)
लखनऊ सुपर जायनट्सने यावर्षी देखील प्लेऑफमध्ये धडक मारत आपली घौडदौड कायम ठेवली. कर्णधार के एल राहुल जखमी झाल्यानंतरदेखील कृणाल पांड्याने संघाची धुरा सांभाळतांना त्याची कमी भासू दिली नाही. साखळी फेरीतील शेवटचे तीन सामने सलग जिंकत लखनऊने मुसंडी मारली. १४ सामन्यातील ८ विजयांसह त्यांनी १७ गुण आपल्या नावे करत गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले.
पाच वेळेचा विजेता राहिलेला मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या हंगामात चौथ्या स्थानावर राहिला. साखळी फेरीतील आपल्या शेवटच्या सामन्यात त्यांनी हैद्राबादवर विजय मिळवला असला तरीदेखील त्यांचे प्लेऑफ मधील स्थान अधांतरीच राहिले होते. गुजरात आणि बंगळूरूदरम्यान झालेल्या सामन्यात बंगळूरूने जर विजय नोंदवला असता तर बंगळूरू प्लेऑफसाठी पात्र झाली असती. परंतु तसे काही घडले नाही. बंगळूरूला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आणि मुंबईचे प्लेऑफचे तिकीट निश्चित झाले. १४ सामन्यातील ८ विजयांसह १६ गुण मिळवत मुंबईने चौथ्या स्थानावर आपला हक्क सांगितला.(Playoff)
साखळी फेरी संपली. आता नॉकआउटच्या लढती सुरु होतील. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर २३ मे रोजी खेळवल्या जाणाऱ्या क्वालीफायर १ मध्ये गुजरात आणि चेन्नई आमनेसामने असतील. या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघांचे फायनल तिकीट कन्फर्म होईल. हरणाऱ्या संघाचे आव्हान संपुष्टात न येता ते एलीमीनेटरच्या सामन्याकडे लक्ष ठेवून असतील.
२४ मे रोजी चेन्नईच्याच चेपॉक स्टेडीयमवर मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायनट्स यांच्यात लढत होईल. या सामन्यात पराभव पत्कराव्या लागणाऱ्या संघाचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येईल. एलीमीनेटरच्या लढतीत विजयी झालेला संघ क्वालीफायर १ मधील पराभूत संघाशी क्वालीफायर २ मध्ये दोन हात करेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालीफायर २ चा सामना रंगेल. यातील पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येईल तर विजयी संघाला फायनलचे तिकीट मिळेल.
=======
हे देखील वाचा : क्वालीफायर १ च्या लढतीत चेन्नई आणि गुजरात आमनेसामने.
=======
क्वालीफायर १ आणि क्वालीफायर २ मधील विजेत्यांमध्ये आयपीएलचा फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगेल. या सामन्यातील विजेता संघ आयपीएलच्या या हंगामाचे जेतेपद पटकावेल.