मध्यप्रदेशमधील उज्जैन नगरी ही भगवान शंकराची नगरी म्हणून ओळखली जाते. उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा करण्यासाठी जगभरातून श्री महाकालेश्वराचे भक्त या नगरीत गर्दी करतात. सध्या चालू असलेल्या श्रावण महिन्यात तर श्री महाकालेश्वर मंदिरात भक्तांचा पूर आलेला आहे. त्यातही सोमवारी भक्तांची विशेष गर्दी असते. पण यासोबत श्री महाकालेश्वर मंदिराच्या आवारात अजून असे एक मंदिर आहे, जे फक्त वर्षाच्या एकाच दिवसात उघडले जाते. 364 दिवस बंद असलेल्या या मंदिराचा दरवाजा चोवीस तासांसाठी उघडण्यात येतो. हे मंदिर सर्पमंदिर म्हणून ओळखले जाते. यावर्षी नागपंचमी सोमवारी आल्यामुळे या श्री नागचंद्रेश्वर मंदिरात अक्षरशः भक्तांचा महापूर आला. एक दिवस आधीच अनेक भक्तांती श्री नागचंद्रेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. हे मंदिर अतिशय पुरातन असून यामध्ये भगवान शंकरांचे सर्व कुटुंब विराजमान झालेले आहे. एरवी आपण भगवान विष्णुची शेषनागावर विराम करतांनाची प्रतिमा बघतो. मात्र श्री नागचंद्रेश्वरात भगवान शंकर फणा पसलेल्या नागाच्या आसनावर बसलेले दिसतात. हे मंदिर अतिशय जागृत असून येथील नागदेवाचे दर्शन घेतल्यानं सर्पदोष दूर होतात अशी भावना आहे. (Temple)
यावर्षी नागपंचमी ही भगवान शंकराचा वार असलेल्या सोमवारी आली. याच दिवशी उज्जैनच्या श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या शिखरावर असलेल्या श्री नागचंद्रेश्वर मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. मध्यरात्री भक्तांसाठी हे दरवाजे उघडल्यावर भक्तांचा महापूर नागदेवाचे आणि भगवान शंकाराचे एकत्र दर्शन घेण्यासाठी आलेला आहे. श्री नागचंद्रेश्वर मंदिराचे दरवाजे वर्षातून एकदाच नागपंचमीला उघडतात. सर्वप्रथम श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्याचे महंत विनीत गिरी महाराज हे त्रिकाल पूजन आणि अभिषेक करतात. त्यानंतर अखंड दिवस भक्तांचा ओघ या मंदिरात असतो. उज्जैन नगरीमध्ये प्रत्येक गल्लीबोळात भगवान शंकराची मंदिरे आहेत. अर्थात या सगळ्यात श्री महाकालेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी असते. याच महाकालेश्वर मंदिराच्या वर असलेल्या श्री नागचंद्रेश्वर मंदिराबाबत भक्तांना कायम उत्सुकता असते. वर्षभर बंद रहाणारे हे मंदिर आतून कसे आहे. तसेच येथील भगवान शंकराची आणि त्याच्या वाहनाची प्रतिमा कशी आहे, हे जाणण्यासाठी भक्त उत्सुक असतात. त्यांची ही उत्सुकता नागपंचमीच्या दिवशी पूर्ण होते. (Temple)
या मंदिराची उभारणी झाल्यापासूनच ही प्रथा असल्याचे सांगण्यात येते. श्री नागचंद्रेश्वर भगवान यांची ही मूर्ती 11 व्या शतकातील आहे. या मूर्तीमध्ये देवी पार्वती भगवान शंकरासोबत फणा पसरवलेल्या नागाच्या आसनावर बसलेली आहे. शिवजी नागाच्या पलंगावर बसलेले आहेत, आणि त्यांच्या सोबत त्यांचे सर्व कुटुंब आहे, अशी ही जगातील एकवेम प्रतिमा असल्याचे सांगण्यात येते. श्री नागचंद्रेश्वर मंदिरात भगवान शंकर, माता पार्वती, श्री गणेश यांच्यासह सात मुखी नाग देवता आहेत. याशिवाय भगवान शंकर आणि माता पार्वतीचे वाहनही येथे पहायला मिळते. भगवान शंकराच्या गळ्यात आणि हातांभोवती साप देखील गुंडाळलेले आहेत. नागचंद्रेश्वर मंदिरातील ही भगवान शंकाराची मूर्ती अकराव्या शतकातील आहे. ही अप्रतिम मुर्ती नेपाळहून या मंदिरात आणल्याचे पुजारी सांगतात. उज्जैन वगळता जगात कुठेही अशी मूर्ती नाही. (Temple)
==========
हे देखील वाचा : राजस्थानच्या चित्तौडगड किल्ल्यातील गोमुख कुंडाचे रहस्य…
==========
श्री नागचंद्रेश्वर मंदिर (Temple) वर्षातून एकदाच उघडण्यात येते. त्यामागे सर्पराज तक्षकाची कथा आहे. सर्पराज तक्षकाने भगवान शंकराचे मन वळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. तक्षकाच्या तपश्चर्येवर भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी नागांचा राजा तक्षक नाग याला अमरत्वाचे वरदान दिले. तेव्हापासून राजा तक्षक भगवान शंकराच्या सोबत राहू लागला. मात्र महाकाल शंकराला त्रास होऊ नये म्हणून नागपंचमीच्या दिवशीच तक्षकानं आपले अस्तित्व दाखवले होते. त्यामुळेच नागपंचमीच्या दिवशीच हे श्री नागचंद्रेश्वर मंदिरही खुले करण्यात येते. या मंदिरात गेल्यावर भक्त सर्पदोषापासून मुक्त होतात, अशी धरणा आहे. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी उघडणाऱ्या या मंदिराबाहेर भाविकांची मोठी रांग असते. श्री नागचंद्रेश्वर मंदिर खूप प्राचीन आहे. परमार राजा भोजने हे मंदिर (Temple) 1050 च्या सुमारास बांधल्याचे सांगण्यात येते. यानंतर सिंधिया घराण्यातील महाराज राणोजी सिंधिया यांनी 1732 मध्ये महाकाल मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यावेळी या श्री नागचंद्रेश्वर मंदिराचाही जीर्णोद्धार झाला. नागपंचमीला हे मंदिर उघडल्यावर श्री नागचंद्रेश्वराची त्रिकाल पूजा करण्यात येते. पहिली पूजा मध्यरात्री, दुसरी पूजा नागपंचमीच्या दुपारी प्रशासनातर्फे होते आणि तिसरी पूजा संध्याकाळी महाकालाची पूजा केल्यानंतर मंदिर समितीतर्फे करण्यात येते. यानंतर रात्री 12 वाजता पुन्हा एक वर्षासाठी दरवाजे बंद केले जातात.
सई बने