भारतातील सूर्यमंदिर कुठले, हा प्रश्न विचारल्यावर एकच उत्तर येतं ते म्हणजे, कोणार्क. कोणार्क येथील सूर्यमंदिराची महती आणि माहिती सर्वांना माहिती आहे. मात्र कोणार्कपेक्षाही जुने असे सूर्यमंदिर भारतात आहे, याची फारशी माहिती कोणाला नाही. देवभूमी म्हणून गौरव केलेल्या उत्तराखंडामध्ये असेच एक पुरातन सूर्यमंदिर आहे. अल्मोडा येथील हे सूर्यमंदिर कोणार्कच्या सूर्य मंदिरापेक्षा 200 वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. राक्षसांपासून बचाव करण्यासाठी या मंदिराची उभारणी करण्यात आली. स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुना असलेल्या या मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. मात्र आताही या मंदिरात स्थानिक भाविकांची गर्दी होत आहे, उत्तराखंडमध्ये सध्या तुफान पाऊस पडत आहे. या पावसानं होत्याचे नव्हते केले आहेत. अनेक रस्ते खचले आहेत, तर घरांचे नुकसान झाले आहे. हा सर्व निसर्गाचा कोप थांबावा म्हणून आता स्थानिक या सूर्यमंदिरात प्रार्थना करीत आहेत.
भारतातील सर्वात जुने सूर्यमंदिर उत्तराखंड येथील अल्मोडा भागात आहे. कटरमल सूर्यमंदिर म्हणून त्याची ओळख आहे. सूर्याची किरणे वर्षातून दोनवेळा येथील मुर्तीवर पडतात. मुख्य म्हणजे कोणार्क येथील सूर्यमंदिरापेक्षा हे कटरमल सूर्यमंदिर 200 वर्ष जुने असल्याचे सांगण्यात येते. तसा उल्लेख मंदिर परिसरात असलेल्या शिलालेखांवर आहे.
देवभूमी म्हणून गौरविलेल्या उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील अधेली सुनार गावात भगवान सूर्याचे कटरमल सूर्य मंदिर आहे. हे मंदिर अल्मोडा शहरापासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर समुद्रसपाटीपासून 2116 मीटर उंचीवर आहे. या मंदिराच्या स्थापनेची कथा थेट सतयुगातील आहे. सतयुगात अनेक ऋषी मुनी उत्तराखंडातील गुहांमध्ये तपश्चर्या करीत असत. त्या ऋषी-मुनींना एक राक्षस त्रास देत होता. त्यावेळी द्रोणागिरी कश्यपर्वत आणि कंजर पर्वताच्या ऋषींनी सूर्याची स्तुती करत त्याला या राक्षसापासून आपले रक्षण करण्यासाठी आवाहन केले. कौशिकी म्हणजे, आता जिचा कोसी नदी असा उल्लेख केला जातो, त्या कोसी नदीच्या काठावर ऋषींनी सूर्याला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली. ऋषीमुनींच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवान सूर्यांनं वटशिलेत आपले दिव्य तेज प्रस्थापित केले. या वटशिलांवर कत्युरी वंशाचा शासक कटरमल याने हे सूर्यमंदिर बांधल्याची माहिती आहे. हे सूर्यमंदिर बारादित्य नावाचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले गेले. त्याला आता कातरमल सूर्य मंदिर ओळखले जाते. या मंदिराच्या उभारणीबाबतही कथा आहे. कटरमल सूर्य मंदिर 6 व्या आणि 9 व्या शतकादरम्यान राजा कटरमल याने बांधले. कटरमल राजाने हे मंदिर एका रात्रीत बांधले असे मानले जाते. मंदिर उत्तराखंड शैलीत बांधले आहे. सकाळी सूर्याची पहिली किरण कातरमल सूर्य मंदिरावर पडली की, त्याची किरणे थेट सूर्याच्या मूर्तीवर पडतात. या मंदिराच्या परिसरात अन्य 50 मंदिरेही आहेत.
देवदार आणि पाइन वृक्षांनी वेढलेले अल्मोराच्या डोंगरात वसलेले हे सूर्यमंदिर हे वास्तुकलेचा अनोखा नमुना आहे. उत्कृष्ट नक्षीकाम केलेले दगड आणि धातूकाम आणि सुंदर नक्षीकाम केलेले खांब आणि लाकडी दरवाजे यासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्ष या मंदिराच्या परिसरात अनेक मुर्ती होत्या. मात्र त्या मुर्तींची चोरी होत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. याची दखल घेऊन मग येथील मुर्ती आणि मुख्य मंदिराला असलेला चंदनाचा दरवाजा दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.
=======
हे देखील वाचा : Intermittent Fasting: इंटरमिटेंट फास्टिंगने खरंच वजन कमी होते का? जाणून घ्या या बद्दल अधिक
=======
या मंदिरात शिव-पार्वती आणि लक्ष्मी-नारायण भगवानच्या मुर्तीही आहेत. येथील भगवान सूर्यदेवाची मुर्ती पद्मासन मुद्रेतील आहे. ही मुर्ती लाकडाची आहे. येथे भक्तीभावाने मागितलेली प्रत्येक इच्छा येथे पूर्ण होते असे म्हणतात. असे म्हणतात की, येथे देवदेवता सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी येतात. या मंदिरात वर्षातून दोनदा सूर्याची किरणे देवाच्या मूर्तीवर पडतात. 22 ऑक्टोबर आणि 22 फेब्रुवारी रोजी सकाळी हा सूर्यकिरण सोहळा होतो. 22 ऑक्टोबरला जेव्हा सूर्य उत्तरायणातून दक्षिणायनाला जातो तेव्हा सूर्याची किरणे मूर्तीवर पडतात आणि जेव्हा सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे सरकतो तेव्हा 22 फेब्रुवारीला सूर्याची किरणे देवाच्या मूर्तीवर पडतात. या सोहळ्यासाठी हजारो भाविक मंदिरात उपस्थित असतात.
या मंदिरातील शिलालेखांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासूंची गर्दी असते. आता या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. या पावसानं अधिक नुकसान होऊ नये, म्हणून स्थानिक भगवान सूर्यदेवाची आराधना करण्यासाठी गर्दी करीत आहेत.
सई बने