सध्याचे युग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे युग आहे. माणसापेक्षा इथे रोबोटला जास्त महत्त्व असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच अनेक देशांमध्ये माणसांऐवजी रोबोट नेमून त्याच्याकडून काम करुन घेण्यात येत आहे. रोबोटनं केलेल्या कामात अधिक अचूकता असते, हे कारण त्यामागे सांगण्यात येते.अशाच रोबोटीक क्रांती झालेल्या देशांमध्ये जपानच्या मागोमाग ज्या देशाचा नंबर आहे, तो देश म्हणजे, दक्षिण कोरिया.
दक्षिण कोरियाच्या अनेक कार्यालयांमध्ये रोबोट काम करत आहेत. येथे औद्योगिक क्रांतीचा अविभाज्य भाग म्हणून, रोबोट उद्योग हा अनेक क्षेत्रांच्या भविष्यासाठी केंद्रबिंदू बनला आहे. त्यामुळेच दक्षिण कोरियाच्या हॉटेलपासून ते मोठ्या उद्योगसमुहापर्यंत रोबोटची नियुक्ती केली आहे. मात्र याच दक्षिण कोरियाला आता या रोबोटच्या युगाचा विचार करायला लागणार आहे. कारण येथील एका रोबोटनं रोजच्या कामाला कंटाळून चक्क आत्महत्या केली आहे. (Robot Suicide)
आतापर्यंत निराशेनं एका व्यक्तिनं आत्महत्या केली, अशा बातम्या ऐकायला येत होत्या. पण रोबोटनं आत्महत्या केली, हे वाचून धक्काच बसतो. कारण रोबोटची निर्मितीच मानवी भावभावनांना वगळून करण्यात आली आहे. पण कामाचा ताण हा माणसाला जसा येऊ शकतो, तसा तो रोबोटला येऊ शकतो, हे सिद्ध करत दक्षिण कोरियाच्या रोबोटनं आत्महत्या केली. या घटनेनं तंत्रज्ञान युगाचा पुरस्कार करणा-यांना धक्का बसला आहे. या घटनेचा तपास व्यापक अर्थानं होणार असून रोबोटनं केलेल्या आत्महत्येनं दक्षिण कोरियाच्या रोबोट युगालाही धक्का बसला आहे.
दक्षिण कोरिया गुमी सिटी कौन्सिलमधून एक धक्कादायक बातमी आली आहे. इथून जगात पहिल्यांदाच एका रोबोटने आत्महत्या केल्याची बातमी पुढे आली. हा रोबोट दक्षिण कोरियाच्या सिटी कौन्सिल कार्यालयात सरकारी कर्मचारी म्हणून तैनात करण्यात आला होता. त्याच्या नियुक्तीला वर्ष पूर्ण होत आलं होतं. सिटी कौन्सिल कार्यालयात कागदपत्रे पोहोचवणे आणि स्थानिक रहिवाशांना माहिती देणे हे या रोबोटचे नेहमीचे काम होते. या इमारतीच्या सर्व मजल्यावर त्याचा मुक्तपणे वावर होता. असेच काम करत असतांना हा रोबोट अचानक एका ठिकाणी थांबला. (Robot Suicide)
त्यानंतर तो वरच्या पाय-या चढला. तिथे त्यानं स्वतःभोवती एक फेरी मारली आणि काहीही कळायच्या आत या रोबोटनं खाली उडी मारली. त्याची ही कृती त्या कार्यालयात असलेले सर्व कर्मचारी आणि नागरिक बघत होते. रोबोटच्या या उडीनंतर सर्वत्र गोंधळ उडाला. कारण त्याच्या या गूढ उडीनंतर रोबोटच्या शरीराचे अवयव म्हणजेच त्याचे सर्व पार्ट विखुरले गेले. त्याचे काम पूर्णपणे थांबले. हा रोबोट सकाळी नऊ ते संध्याकाळी चारपर्यंत या कार्यालयात काम करत असे. सतत एकच काम केल्यामुळे त्याला थकवा आला असवा, अशी चर्चा आता दक्षिण कोरियामध्ये सुरु झाली आहे.
सिटी कौन्सिलने रोबोटने अचानक उडी का मारली, या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. त्यासाठी बीअर रोबोटिक्स या अमेरिकन कंपनीचीही मदत घेण्यात आली आहे. या रोबोटनं आत्महत्या केल्यानं दक्षिण कोरियामध्ये अनेक मिम्स व्हयरल होत आहेत. क्रशर बैलाप्रमाणे रोबोटचा वापर केल्यामुळे त्याला कामाच असह्य भार झाला, त्यातूनच त्यानं आत्महत्या केली असा त्यातील सूर आहे. (Robot Suicide)
=============
हे देखील वाचा : अमेरिकेसाठी डोकेदुखीचा विषय
=============
काहींनी तर रोबोटची युनियन व्हायला हवी, असेही सुचवले आहे. यातील मजेचा भाग सोडला, तर मानवी भावभावना रोबोटमध्येही आहेत का, यावर संशोधन सुरु झाले आहे. काही महिन्यापूर्वी दक्षिण कोरियामध्येच एका माणसाला रोबोटनं ठेचून ठार मारले होते. शेतीसंबंधी असलेल्या या कंपनीत एक कर्मचारी रोबोटची तपासणी करत असतांना त्यात काहीतरी गडबड झाली, यानंतर त्या रोबोटनं या माणसाला मारले होते. अशा घटनांमुळे दक्षिण कोरियामधील रोबोट क्रांतीवर प्रश्नचिन्ह विचारण्यात आले होते. (Robot Suicide)
त्यातच आता रोबोटनंच आत्महत्या केल्यान पुन्हा दक्षिण कोरियातील रोबोट चर्चेत आले आहेत. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रोबोटिक्सच्या माहितीनुसार, दक्षिण कोरियामध्ये जगातील सर्वात जास्त रोबोट आहेत. या देशात १००० कामगारांमागे ९३ रोबोट आहेत. तर प्रगत समजल्या जाणा-या अमेरिकेमध्ये आणि युरोपमधील अनेक देशात हे प्रमाण १००० कामगारांमागे ३० रोबोट असे आहे. दक्षिण कोरियामधील बहुतांश रेस्टोरॉंटमध्ये रोबोटचा वापर करण्यात येत आहे. येथील सरकारानं २००८ पासून रोबोटिक्स संशोधन आणि विकासामध्ये $४३० दशलक्ष गुंतवणूक केली आहे. अशा देशातून रोबोटच्या आत्महत्येची बातमी येणं ही चिंतेची गोष्ट आहे.
सई बने