‘माझे राज्य जळत आहे…’, अशा आशयाचे ट्विट करत बॉक्सर मेरी कोमनं मणिपूरची छायाचित्र सोशल मिडीयावर शेअर केली. त्यासोबत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे मदतीची मागणी केली. मेरी कोमच्या या फोटोनंतर भारताच्या ईशान्येकडील राज्यातील हिंसाचाराची माहिती सर्वदूर झाली. भारताच्या ईशान्येकडील राज्य असलेल्या मणिपूरमध्ये (Manipur) अचानक हिंसाचार उसळला आहे. राज्यातील 8 जिल्हे हिंसाचाराच्या तडाख्यात आले असून येथे कलम 144 लागू करण्यात आले. सोबत 5 दिवस राज्यात इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. मात्र त्यानंतरही मणिपूरमधील (Manipur) हिंसाचार आटोक्यात न आल्यानं हल्लेखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मणिपूर सरकारने आदिवासी आणि मेईतेई समुदायामधील वाढता हिंसाचार रोखण्यासाठी हल्लेखोरांना गोळ्या आदेश काढले आहेत. त्यामुळे नेमक मणिपूरमध्ये (Manipur) काय घडलं? आदिवासी आणि मेईतेई समुदायामधील वादानं इतकं मोठं टोक का गाढलं हे जाणणं गरजेचं आहे.
दिग्गज बॉक्सर एमसी मेरी कोमने गुरुवारी मणिपूरमध्ये उसळलेला हिंसाचार रोखण्यासाठी केंद्राकडे मदत मागितली. त्यानंतर मणिपूरमध्ये अचानक हिंसाचार कसा उफाळून आला, याची चर्चा सुरु झाली. मणिपूरच्या (Manipur) चुराचंदपूर जिल्ह्यातील तोरबांग भागात ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन मणिपूर (एटीएसयूएम) ने काढलेल्या ‘आदिवासी एकता रॅली’ दरम्यान हा हिंसाचार झाला. हजारो आंदोलक रॅलीत सहभागी झाले होते. रॅली दरम्यान आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये मारामारी झाली आणि बघताबघता या हिंसाचाराचे लोण भारतभर पसरले. हा हिंसाचार थांबवण्यासाठी थेट लष्कराला बोलवण्यात आले, इतके त्याचे स्वरुप व्यापक होते. केंद्रसरकानं राज्य पोलिसांसह लष्कर आणि आसाम रायफल्सच्या तुकड्या रातोरात हिंसाचारग्रस्त जिल्ह्यात रवाना केल्या.

मणिपूरमध्ये (Manipur) आदिवासी आंदोलनानंतर झालेल्या हिंसाचारामुळे आता तेथे संचारबंदी लागू आहे. इम्फाळ, चुराचंदपूर आणि कांगपोकपी सह आठ जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सशस्त्र दलाने आणि हिंसाचारग्रस्त भागात लष्कराने फ्लॅग मार्चही काढला. लष्करानं 7,500 हून अधिक नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रात्रभर मोठ्या प्रमाणात बचाव कार्य केले.
या सर्वांमागचा वाद काय आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन मणिपूर (एटीएसयूएम) या संघटनेने चुराचंदपूर जिल्ह्यातील तोरबांग भागात ‘आदिवासी एकता मार्च’ काढला होता. बिगर आदिवासी मेईतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा ही मागणी करण्यात येते. या मागणीच्या निषेधार्थ एटीएसयूएमतर्फे मोर्चा काढण्यात आला होता. मणिपूरच्या (Manipur) एकूण क्षेत्रापैकी 89% भाग डोंगराळ आहे. मेईतेई, नागा आणि कुकी या तीन समुदायांचे लोक येथे राहतात. यामध्ये नागा आणि कुकी यांना आदिवासी समाजाचा दर्जा मिळाला आहे तर मेईतेई यांना बिगर आदिवासी समाजाचा दर्जा मिळाला आहे. मेईतेई हे हिंदू धर्माचे आहेत, तर बहुतेक नाग आणि कुकी हे ख्रिश्चन धर्माचे आहेत. वादाचे कारण म्हणजे मणिपूरच्या कायद्यानुसार डोंगराळ भागात फक्त आदिवासी समुदायाचे (अनुसूचित जमाती) लोकच स्थायिक होऊ शकतात. म्हणजे तुम्ही स्वतःचे घर बांधून तुमचा उदरनिर्वाह करू शकता. राज्याचा ९० टक्के भाग डोंगराळ आहे. जिथे मेईतेई समाजातील लोकांना अनुसूचित जातीचा दर्जा आहे तिथे ही जमात या डोंगराळ भागात आपले घर बनवून स्थायिक होऊ शकत नाही. आणि हेच वादाचे मूळ कारण आहे. मेईतेई समाज गेल्या अनेक वर्षापासून आपल्या हक्कांसाठी झगडत आहे.
राज्यात मेईतेई समाजाच्या लोकांची संख्या 53% आहे तर 40% नागा आणि कुकी लोक आहेत. मायांग सारख्या इतर समुदायाचे 7 टक्के नागरिक आहेत. यातील बरेच जण देशाच्या इतर भागातून येऊन या भागात स्थायिक झाले आहेत. मायांग समाजाचे लोक मुस्लिम धर्माचे आहेत. मेईतेई समाजातील लोकही डोंगराळ भागात स्थायिक होण्याची मागणी करत आहेत. कारण, राज्याच्या कायद्यानुसार, केवळ अनुसूचित जमाती (एसटी) समुदायातील लोक डोंगराळ भागात स्थायिक होऊ शकतात. म्हणूनच वर्षानुवर्षे मेईतेई समाजातील लोक त्यांचा दर्जा अनुसूचित जाती (SC) वरून अनुसूचित जमाती (ST) मध्ये बदलण्याची मागणी करत आहेत, जेणेकरून ते देखील डोंगराळ भागात जाऊन स्थायिक होऊ शकतील.
========
हे देखील वाचा : पाकिस्तानात शिवलिंगावर दूध अर्पण करणारी फातिमा भुट्टो कोण?
========
गेली अनेक वर्ष हा वादाचा विषय चालू आहे. मात्र अचानक तो एवढ्या टोकाला का गेला हेही जाणून घेण्यासारखे आहे. मणिपूरमध्ये उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला मेईतेई समुदायाला एसटी (अनुसूचित जमाती) दर्जा देण्याबाबत विचार करण्यास सांगितले. या मागणीच्या निषेधार्थ, ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन ऑफ मणिपूर (एटीएसयूएम) ने ‘आदिवासी एकता मार्च’ काढला. त्यातूनच हिंसाचार उफाळला. मेईतेई समाजाला एसटी दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या समाजाने हा प्रश्न त्यांच्या वडिलोपार्जित जमीन, संस्कृती आणि अस्मितेशी संबंधित असल्याचे सांगून हा लढा चालू ठेवणार असल्याचे सांगितले.
या मोर्चानंतर परिस्थिती एवढी बिघडली की, बिगर आदिवासीबहुल इम्फाळ पश्चिम, ककचिंग, थौबल, जिरीबाम आणि बिष्णुपूर जिल्ह्यांत आणि आदिवासीबहुल चुराचंदपूर, कांगपोकपी आणि टेंगनौपाल जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दंगल रोखण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सही तैनात करण्यात आल्या आहेत. आणि दंगेखोरांना गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एरवी शांत असलेल्या या ईशान्य भागातील राज्यात अचानक वाद उफाळून आला आहे. गेल्या अनेक वर्षात चालू असलेल्या आंदोलनामागची धग या मागे असल्याचे सांगण्यात येते.
सई बने