टोमॅटोचे महत्त्व किती आहे, हे सांगायला नकोच. या टोमॅटोचा भाव (Tomato Rate) पन्नाशीच्या पार गेला की, किती आरडाओरडा होतो. विचार करा हाच टोमॅटो 400 रुपये किलोला विकत घ्यावा लागला तर काय होईल? अर्थातच आपण याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. कारण भारतीय बाजारपेठेमध्ये टोमॅटो मोठ्याप्रमाणात उपलब्ध आहेत आणि त्यांचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. टोमॅटो 400 रुपये किलोनं (Tomato Rate) विकले जात आहेत, ते सायबांच्या देशात, अर्थात ब्रिटनमध्ये. ब्रिटनमध्ये टोमॅटोला मोठी मागणी आहे. येथे पिझ्झा आणि पास्तासारख्या पदार्थात टोमॅटोचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पण हाच टोमॅटो चक्क 400 रुपये किलोच्या पार गेला आहे, त्यामुळे पिझ्झा-पास्ता शौकीनांची मोठी अडचण झाली आहे. ब्रिटनच्या सुपरमाक्रेटमध्ये तर टोमॅटो देताना कुटुंबातील माणसांची संख्या जाणून घेण्यात येत आहे, आणि त्यानंतरच मोजकेच टोमॅटो देण्यात येत आहेत. या टोमॅटो तंगीमुळे ब्रिटनमध्ये नाराजी व्यक्त होत असताना ब्रिटनच्या अन्न पुरवठा मंत्री थेरेसे कॉफी यांनी लोकांना टोमॅटो मिळेपर्यंत सलगम खाण्याचे आवाहन केले आहे.
एकेकाळी ज्या देशाचा सूर्य कधीही मावळत नाही अशी ख्याती होती, त्याच ब्रिटनमध्ये सध्या भाजीपाल्याची कमालीची कमतरता जाणवत आहे. परिणामी येथे जेवणात नेहमी लागणा-या भाजीचे दर आकाशाला पोहचले आहेत. ब्रिटनमध्ये टोमॅटो आणि सॅलेडमध्ये लागणा-या भाज्यांचे चक्क रेशनिंग करण्याची वेळ आली आहे. ब्रिटनमध्ये सध्या टोमॅटो, काकडी आणि मिरची यांसारख्या भाज्यांचा तुटवडा जाणवत आहे. अनेक भागात टोमॅटो अनेक दिवसांपासून भाजीच्या दुकानात पोहोचलेला नाही. परिणामी टोमॅटोचे भाव (Tomato Rate) खूप वाढले आहेत. ब्रिटनमध्ये ऑनलाइन भाजी ऑर्डर मोठ्या प्रमाणात देण्यात येते. या ऑनलाइन भाज्यांची ऑर्डर स्विकारणा-या वेबसाइट्सवर टोमॅटोचे दर प्रति किलो 400 रुपये पार गेले आहेत.
गेल्या आठवड्यात ब्रिटनमधील सर्व प्रमुख सुपरमार्केटमध्ये ग्राहक खरेदी करू शकतील अशा सॅलड्सच्या भाज्यांवर मर्यादा आणल्या आहेत. या निर्णयाची दखल ब्रिटनच्या संसदेतही घेण्यात आली आणि नागरिकांमध्ये वाढलेल्या नाराजीबाबत आवाज उठवण्यात आला. यावर ब्रिटनच्या अन्नपुरवठा मंत्री थेरेसे कॉफी यांनी लोकांना टोमॅटो मिळेपर्यंत सलगम खाण्याचे आवाहन केले आहे. अर्थात सलगमचे दरही टॉमेटो सारखेच चढे आहेत(Tomato Rate). ब्रिटनमध्ये समगमची शेती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे ते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र तिथे टोमॅटो आणि काकडी यांची मागणी मोठी असते. या दोघांचाही पिझ्झ्यामध्ये वापर होतो. ज्या देशांकडून ब्रिटन टोमॅटो आयात करतो, तिथेही उत्पादन कमी झाल्यमुळे या देशातील सर्वच सुपर माक्रेटमध्ये टोमॅटोचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. या सर्वात गेल्या काही दिवसांतच टोमॅटोचे दर (Tomato Rate) चौपटीने वाढले आहेत. यामुळे खाद्य कंपन्या आता टोमॅटोला पर्याय शोधू लागल्या आहेत.
ब्रिटनमधील इटालियन शेफच्या असोसिएशनचे अध्यक्ष एन्झो ऑलिव्हरी यांनी टोमॅटोचा तुटवडा जाणवत असल्यामुळे आता नवीन खाद्यप्रकार करावे लागणार असल्याचे सांगितले. तसेच या वाढत्या दरामुळे ग्राहक तुटण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. येथील अनेक मान्यवर हॉटेलमध्येही मेनूमधून टोमॅटो बाद करण्यात आले आहेत. मात्र ग्राहक टोमॅटोची मागणी करतात. अशावेळी ग्राहक आणि हॉटेल चालकांमध्ये वाद होण्याचा घटना वाढल्याचे सांगण्यात आले आहे. ब्रिटनमधील नॅशनल फार्मर्स युनियनने तर याबाबत सरकारलाच दोषी ठरवले आहे. फळभाज्या आणि भाजीपाली साठवणुकीचा अनेक पर्याय उपलब्ध हवेत आणि ते योग्य दर्जाचे हवेत असे या युनियनने स्पष्ट केले आहे.
=======
हे देखील वाचा : जापानच्या या बेटावर जाण्यास महिलांना बंदी तर पुरुषांच्या वस्राबद्दलही आहेत नियम
=======
यासर्वात ब्रिटनमधील सर्वसामान्य नागरिक मात्र हैराण झाले आहेत. ब्रिटनच्या काही सुपरमाक्रेटमध्ये फळे आणि भाज्यांचे चक्क रेशनिंग सुरू केले आहे. मॉरिसन्स आणि असदा या सुपरमार्केटनी हा निर्णय घेतल्यावर एकच खळबळ उडाली आहे. याअंतर्गत टोमॅटो, बटाटा, काकडी, मिरची, लेट्यूस आणि ब्रोकोली या नाशवंत वस्तूंच्या खरेदीवर बंदी घालण्यात आली आहे. प्रत्येक ग्राहक यापैकी फक्त दोन किंवा तीनच वस्तू खरेदी करू शकणार आहे. ब्रिटनमधील तिसरे सर्वात मोठे सुपर मार्केट म्हणून असदाचा उल्लेख होतो. पूर्व लंडन, लिव्हरपूल आणि यूकेच्या इतर भागांमध्ये भाज्यांची तीव्र टंचाई आहे. ब्रिटनमध्ये दरवर्षी काकडी आणि टोमॅटो यांसारख्या हिवाळी पिकांपैकी 90 टक्के आयात करण्यात येते. खराब हवामानामुळे दक्षिण युरोप आणि उत्तर आफ्रिकेतील अनेक भागात पिकांची कापणीच करता आली नाही. परिणामी हा भाजीपाला योग्यपद्धतीनं साठवता आला नाही. मोरोक्कोमधूनही ब्रिटनला मोठ्या प्रमाणात भाजीपाला पुरवठा करण्यात येतो. मात्र तेथे हवामानाचा फटका पिकांना बसला आहे. परिणामी टोमॅटोची विक्री (Tomato Rate) गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत 22 टक्क्यांनी कमी झाली आहे. ब्रिटनमधली ही भाजीपाल्याची समस्या येत्या काही दिवसात अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सरकारतर्फे नागरिकांना साठवणूक करु नका…आवश्यक तेवढाच भाजीपाला खरेदी करा असे आवाहन करण्यात येत आहे. एकूण काय सायबाच्या देशात टोमॅटो आणि काकडीसाठी संघर्ष सुरु आहे.
सई बने