महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू राजकारणी म्हणून ओळखले जातात. अगदी राजकारणाच्या धबडग्यातून वेळ काढून त्यांनी ‘अर्थसंकल्प म्हणजे नेमके काय? नावाचे पुस्तक लिहिले होते. सरकारी अर्थसंकल्पाचा अर्थ सामान्य लोकांनी कसा लावावा, याचे मार्गदर्शन त्यात करण्यात आले होते. आता त्यांनी अर्थसंकल्पावर लिहिले म्हणजे गुंतवणुकीची माहिती त्यांना असणारच. गुंतवणुकीच्या जगातील वायदे बाजार नावाची संकल्पना ही त्यांना माहीत असणारच.
वायदा बाजारालाच इंग्रजीत फ्यूचर्स मार्केट म्हणतात. हे एक आर्थिक साधन आहे. त्यात गुंतवणूकदार भविष्यातील ठराविक किंमतींवर माल किंवा वित्तीय साधनांची खरेदी किंवा विक्री करण्याचा करार करतात. आर्थिक जोखीम व्यवस्थापनाचे एक साधन म्हणून या बाजाराची ओळख आहे. व्यापारी, गुंतवणूकदार, आणि उत्पादकांना भविष्यातील किमतींमधील जोखीम टाळण्यास त्यामुळे मदत होते. या वायदा बाजाराची गंमत अशी, की त्याचा योग्य वापर केला तर त्यातून मोठे घबाड हाती लागू शकते, मात्र त्यात जोखीमही मोठ्या प्रमाणात असते. जर (भविष्यातील) किंमतींचे अंदाज चुकीचे ठरले तर व्यापाऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. (Ajit Dada)
वायदा बाजारातील किमतीसुद्धा अत्यंत अस्थिर असतात, त्यामुळे त्यांचा अंदाज लावणे कठीण असते. गुंतवणुकीचे एवढे पुराण सांगायचे कारण म्हणजे सुमारे एक वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी अशीच एक गुंतवणूक केली होती. स्वतः मुख्यमंत्रीपदावरून अवनती स्वीकारून उपमुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांनी अजितदादांनाही सोबत घेतले आणि दुसरे उपमुख्यमंत्री केले. एक मोठी जोखीम घेऊन फडणवीसांनी ते पाऊल उचलले होते. त्यावेळी त्यांचे पहिले लक्ष्य नक्कीच लोकसभा निवडणुकीचे असणार. मात्र अजितदादांच्या किमतीबद्दलचे आपले अंदाज चुकीचे ठरले आहेत, हे निवडणुकीचे निकाल आल्यावर फडणवीसांना जाणवले असेल.
त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. आज विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर पुन्हा ते नक्कीच या गुंतवणुकीचा विचार करत असणार. अजितदादांनी अर्थसंकल्पात केलेल्या अनेक वायद्यांमुळे तरी ही गुंतवणूक फळेल का, हा प्रश्न त्यांच्याप्रमाणेच लोकांनाही पडला आहे. खुद्द अजितदादांनाही तो पडला असावा, म्हणूनच आतापर्यंत कधीही न स्वीकारलेल्या मार्गाने त्यांनी लोकांशी व्हिडिओ संदेश साधला आहे. मुरब्बी राजकारणी असलेल्या आपले काका शरद पवार यांच्या पक्षातून बाहेर पडून जुलै 2023 मध्ये अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. (Ajit Dada)
तेव्हापासून त्यांनी शरद पवार यांच्या विरोधात आघाडी उघडून मागील काळातील त्यांच्या सर्व राजकारणाची रहस्ये बाहेर काढण्यास सुरूवात केली. शरद पवारांनी नाना डाव खेळून आपल्याच पुतण्याला तोंडघशी पाडले आणि त्यातून निरुपाय होऊन त्यांना बाहेर पडावे लागले, ही प्रतिमा निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यातून आपल्याबद्दल सहानुभूती निर्माण होईल, अशी कदाचित त्यांची अपेक्षा असावी. त्यांच्या या धडाक्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळींतून प्रतिसादही मिळत गेला. बघता-बघता 39 आमदार शरद पवारांची साथ सोडून त्यांच्या सोबत आले. बाकी कार्यकर्तेही त्यांच्या गटाला येऊन मिळत गेले.
मात्र त्यांची ही रणनीती किमान लोकसभा निवडणुकीत तरी फळाला आलेली नाही, हे सिद्ध झाल्यामुळे त्यांच्यासमोर अनिश्चित भविष्य उभे राहिले आहे. अगदी आता ते आपला सवता-सुभा आटोपता घेऊन पुन्हा काकांकडे परत जातील, असेही बोलले जात आहे. या निवडणुकीच्या रिंगणात सहा पक्ष उभे होते. त्याला काँग्रेस व भाजप हे दोन मुख्य पक्ष, शिवसेनेचे दोन तट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तट असे स्वरूप होते. निवडणुकीच्या निकालांवर नुसती नजर टाकली तरी एक लक्षात येते, की सर्व पक्षांमध्ये सर्वाधिक नुकसान अजितदादांच्या गटाचेच झालेले आहे. (Ajit Dada)
भाजपच्या जागा कमी झाल्या तरी लढवलेल्या जागा आणि जिंकलेल्या जागा यांचे प्रमाण पाहता अजितदादांच्या पक्षाची कामगिरी सर्वात वाईट आहे. आपल्या आमदारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस आहे, हे निवडणूक आयोगासमोर त्यांनी सिद्ध केले. पक्षाचे घड्याळ हे चिन्हही मिळविले. त्यामुळे त्यांच्या काकांना, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, त्या शरद पवार यांनाच वेगळा गट तयार करावा लागला. अन् तरीही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लढविलेल्या चार जागांपैकी फक्त एक जागा जिंकता आली. या तुलनेत त्यांच्या काकांनी 10 जागा लढवून आठ जागा जिंकल्या.
अजितदादा पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघ जिंकण्यात त्यांना अपयश आले. पण त्यांची सर्वाधिक गोची झाली ती पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीच्या जागेवर. अजितदादांनी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची बनविली होती. तिथे त्यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना आपली चुलत बहिण तसेच शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे केले होते. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी कुठलीही कसर बाकी ठेवली नाही. एवढं करूनही सुप्रिया सुळे यांनी 1,50,000 पेक्षा जास्त मतांनी चौथ्यांदा विजय मिळवला. (Ajit Dada)
हा निकाल नुसता अजितदादांच्या जिव्हारी लागणारा नव्हता, तर त्यांना राजकीय नामुष्की आणणाराही होता. त्यांच्या एकूणच राजकीय क्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला. अन् तिथूनच त्यांच्या गोटात चुळबूळ सुरू झाली. सुरूवातीला मंत्री छगन भुजबळ आणि विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी विसंगत सूर लावला. त्यानंतर अमोल मिटकरी यांनीही महायुतीबाबत नाराजीचा सूर लावला. आता तर त्यांच्या गटातील आमदार आणि महायुतीतील अन्य पक्षांचे नेते यांच्या खडाखडीच्या बातम्या दररोजच येत आहेत.
इतकेच नाही तर त्यांच्या गटातील काही आमदार परत काका शरद पवार यांच्याकडे जाण्याच्या बातम्याही आहेत. या आमदारांचा आकडा कधी पाच तर कधी पंधरा एवढा बदलतोय. तपशील वेगळे असतील, पण कथा एकच आहे. अजितदादा आपल्यासोबत आल्यामुळे एकनाथ शिंदेंसहीत त्यांची शिवसेना तसेच फडणवीस वगळता भाजप नेते कधीही खूष नव्हतेच. त्यामुळे एकीकडे महायुतीच्या आपल्या मित्रपक्षांना सांभाळायचे आणि दुसरीकडे आपल्या आमदारांना जवळ बाळगायचे, अशी दुहेरी कसरत अजितदादांना करावी लागतेय.
राष्ट्रवादी काँग्रेस हा मुळातच निवडून येण्याची सर्वाधिक क्षमता असणाऱ्या स्थानिक नेत्यांचे एक जमावस्थान आहे. (Ajit Dada)
सत्ता किंवा तत्सम संधी मिळतील, तिकडे जाण्याची त्यांची प्रवृत्ती असते. घर फिरले की घराचे वासे फिरविण्यात या मंडळींचा हातखंडा असतो. म्हणूनच 2019च्या निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता तीच स्थिती अजित पवारांच्या बाबतीत होत आहे. आपल्याला अधिक चांगल्या संधी आणि मुख्य म्हणजे सत्ता मिळेल, या विश्वासाने या नेत्यांनी शरद पवारांना सोडून अजित पवारांना पसंती दिली होती. परंतु आपला हा जुगार चालत नाही, हे त्यांना जाणवले तेव्हा ते त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करतील आणि काही जण टोपी फिरवू शकतात.
==================
हे देखील वाचा: एका ठाकरेंकडून दुसऱ्या ठाकरेंसोबत व्हाया वंचित आघाडी..
==================
या सर्व पार्श्वभूमीवर ‘एकच वादा अजितदादा’ हा हॅशटॅग देऊन अजितदादांनी आपली सफाई पेश केली आहे. अजित पवारांकडे प्रशासकीय हातोटी आणि राजकीय समज आहे, परंतु संघर्ष करण्याचा त्यांचा स्वभाव नाही असे आजपर्यंत बोलले जात होते. ऑक्टोबर 2019 मध्ये फडणवीस यांच्यासह शपथविधी करण्याच्या प्रसंगापासून त्यांनी संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. त्याची परिणती 2023 मध्ये त्यांच्या स्वतंत्र घरोबा करण्यात आली. (Ajit Dada)
या संघर्षाची फळे लोकसभा निवडणुकीत तरी मनाजोगती आली नाहीत. मात्र पीक जोमदार यायचे असेल तर शेतीची आधी नीट मशागत करावी लागते, हे भूमिपुत्र असलेल्या अजितदादांना माहीत आहेच. ती मशागत करायचे त्यांनी मनावर घेतले आहे, याचे संकेत त्यांच्या व्हिडिओ संदेशातून मिळाले आहेत. आता अजितदादांचे राजकीय पीक तरारून आलेच तर ‘वायदे’ बाजारात त्यांच्यावर गुंतवणूक केलेल्या देवेंद्र फडणवीस यांना कितपत फायदा होणार, हा खरा प्रश्न आहे.