जगात सात खंड आहेत. पण पूर्वी फक्त हे सात खंड नव्हते. असं बोललं जातं की आफ्रिकेतील मॅडागास्करपासून ऑस्ट्रेलिया आणि आशिया या खंडांच्या मध्ये एक मोठा खंड होता, जो नंतर समुद्राच्या पाण्याखाली गेला आणि त्याच्यासोबत एक प्रगत संस्कृतीही हरवली. या पाण्याखाली हरवलेल्या खंडाबद्दलच जाणून घेऊ. (Kumari Kandam)
तमिळ साहित्यातील महाकाव्य सिलप्पतिकारम, जे तमिळमधल्या पाच महाकाव्यांपैकी एक आहे, त्यात एका हरवलेल्या खंडाचा उल्लेख आहे. दुसऱ्या शतकात लिहिलेल्या या पुस्तकात सांगितलंय की पांड्य राजांचं हे राज्य समुद्रात बुडालं होतं. यात पहिरुली आणि कुमारी नावाच्या दोन नद्यांचाही उल्लेख आहे, ज्या कदाचित या पाण्यात हरवलेल्या खंडात वाहत असाव्यात. प्राचीन तमिळ कवी आणि विद्वान अडियार्क्कु नल्लार सांगतात की आजच्या कन्याकुमारीच्या दक्षिणेला एक खंड होता, ज्याची लांबी जवळपास 7041 किलोमीटर इतकी होती.
या खंडाचं नाव कुमारी कंदम असं होतं. हे नाव पहिल्यांदा 15व्या शतकातल्या कंद पुराणम या पुस्तकातून आलं, जे संस्कृतमधील स्कंद पुराणाचं तमिळ स्वरूप आहे. असं म्हणतात की इथे प्रात नावाचा एक राजा होता, ज्याच्या मुलीचं नाव कुमारी होतं. तिच्या नावावरूनच हे ‘कुमारी कंदम’ असं नाव पडलं. शिवाय इथे कुमारी नावाची नदीही वाहायची, ज्यामुळे हे नाव पडलं असावं. या खंडाचा उल्लेख फक्त तमिळ पुरातन साहित्यातच नाही, तर एका ब्रिटिश प्राणीशास्त्रज्ञाने सुद्धा केला होता. (Kumari Kandam)
१८६४ मध्ये, इंग्लंडचा प्राणीशास्त्रज्ञ फिलिप स्क्लेटर याने एक पुस्तक प्रकाशित केलं मॅमल्स ऑफ मॅडागास्कर. हे पुस्तक लिहिण्यासाठी केलेल्या संशोधनात त्याला लक्षात आलं की मॅडागास्कर आणि भारतातल्या अनेक प्राणी प्रजातींमध्ये संबंध आहे. पण मॅडागास्करच्या शेजारी असलेल्या आफ्रिकन देशांमध्ये याचा संबंध फारसा दिसत नाही. मॅडागास्करच्या या प्राणी प्रजातींचा संबंध फक्त भारताशी नाही, तर ऑस्ट्रेलियाशीही आहे, जिथे 100 पेक्षा जास्त प्राणी प्रजाती समान आढळतात.
आता ऑस्ट्रेलिया तर मॅडागास्करपासून खूप दूरचं बेट आहे. मग भारत, ऑस्ट्रेलिया आणि मॅडागास्करला जोडणारं तेव्हा काही तरी असावं? म्हणून त्याने हिंद महासागरात एक विशाल खंड होता, जो कन्याकुमारीपासून मॅडागास्कर आणि ऑस्ट्रेलियापर्यंत पसरलेला होता. अशा खंडाची कल्पना मांडली, त्याचं नाव ठेवलं लेमुरिया. श्रीलंकाही कदाचित लेमुरिया याचाच भाग असावा. जेव्हा ब्रिटिश संशोधक लेमुरियावर संशोधन करत तमिळनाडूत पोहचले, तेव्हा तिथल्या आदिवासी लोकगीतांत त्यांना एका हरवलेल्या खंडाचा उल्लेख सापडला. (Kumari Kandam)
===============
हे देखील वाचा : Donald Trump : ट्रम्प तात्यांच्या टॅरिफ पे टॅरिफमुळे मार्केट आपटलं !
===============
यानंतर अनेक तमिळ इतिहासकारांनी लेमुरिया आणि कुमारी कंदम यांच्यातलं कनेक्शन जोडायला सुरुवात केली. कुमारी कंदम या खंडाचा उल्लेख भगवत पुराण, स्कंद पुराण, मत्स्य पुराण आणि गरुड पुराणातही आहे. फक्त भारतातच नाही, तर चिनी साहित्यातही याबद्दल माहिती मिळते. चिनी इतिहासात सांगितलंय की या खंडावर मेरु नावाचा पर्वत होता, जिथून कुमारी, पेरु आणि पहिरुली नद्या वाहायच्या, इथे प्रचंड सोन्याच्या खाणी होत्या. पांड्य राजे या खाणींवर काम करण्यासाठी चीनमधून मजूर आणायचे. पण आता प्रश्न असा आहे की या खंडाबद्दल जास्त बोललं का जात नाही? (Kumari Kandam)
कारण आधुनिक विज्ञानात ‘प्लेट टेक्टॉनिक्स’च्या सिद्धांतानुसार लेमुरिया या खंडाची कल्पना नाकारली जाते, त्यामुळे कुमारी कंदम खरोखर होता की नाही, यावर मतभेद आणि वाद आहेत. तमिळ साहित्यात कुमारी कंदमला एक प्रगत संस्कृती म्हणून दाखवलं आहे. असं सांगितलं जातं की इथे तमिळ भाषा आणि साहित्याचा विकास झाला. पण याचे ठोस पुरातत्त्वीय पुरावे अजून सापडलेले नाहीत. काही संशोधकांचं म्हणणं आहे की कुमारी कंदम ही फक्त एक किनाऱ्यालगतची जमीन असावी, जी पाण्याखाली गेली आणि त्यावरून कथा तयार झाल्या. आजही कन्याकुमारीपासून दक्षिणेला समुद्रात काही अवशेष असतील का, यावर संशोधन सुरू आहे. त्यामुळे या हरवलेल्या खंडाचं रहस्य आजही गूढचं आहे. कदाचित भविष्यातील संशोधन या गूढाचा उलगडा करेल.