गाढव असं कोणाला म्हटलं तर किती राग येईल. कारण हा प्राणी म्हणजे कमी बुद्धीचा असल्याचे मानण्यात येते. पण याच गाढवीणीच्या दुधाचा महिमा खूप मोठा आहे. जिथे गाय किंवा म्हशीच्या दुधाची (Milk) किंमत लिटरला 40 ते 80 रुपयांपर्यंत असते, तिथे गाढवीणीच्या दुधाची किंमत प्रती लिटर 6 हजार किंवा त्यापेक्षा अधिक असते. गाढवीणीचे दूध हे लिक्विड गोल्ड म्हणून ओळखले जाते. या दुधाचे अनेक फायदे आहेत. पण हे दुध साठवण्यासाठी खास तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागतो.
गाढवीणीच्या दुधामध्ये (Milk) व्हिटॅमिन ई, एमिनो अॅसिड्स, व्हिटॅमिन ए, बी1, बी6, सी, ई, ओमेगा 3 आणि 6 असतात. यामुळे त्वचा तजेलदार राहते. गाढवीणीच्या दुधाचा वापर क्लिन्झर म्हणून होतो. याशिवायही गाढवीणीच्या दुधाचे अनेक फायदे हेत. त्यामुळे आता गाढवीणीच्या दुधाचा व्यवसाय करुन अनेकांनी आर्थिक उन्नतीचा मार्ग काढला आहे. तामिळनाडूमधील बाबू उलगनाथन हे तमिळनाडूतील वन्नारपेटचे यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जात आहेत. त्यांनी 2022 मध्ये भारतातील सर्वात मोठे गाढवाचे फार्म, The Donkey Palace देखील स्थापन केले आहे. बाबू उलगनाथन हे अनेक कॉस्मेटिक कंपन्यांनाही गाढवीणीचे दूध (Milk) पुरवत आहेत. एक लिटर गाढवीणीचे दूध 6 हजार रुपयांपर्यंत विकले जाते. गाढवीणीच्या दुधाशिवाय गाढवीणीच्या दुधाची पावडर, गाढवीणीच्या दुधाचे तूपही बनवले जाते आणि बाबू उलगनाथन यांच्या या उत्पादनांनाही मोठी मागणी आहे.
बाबू उलगनाथन यांनी नॅशनल रिसर्च सेंटर ऑन हॉर्स येथे उद्योजकता विकास कार्यक्रमात भाग घेतला. तिथून त्यांनी गाढवांचे फार्मींग कसे करावे याची माहिती घेतली. तसेच गाढवीणीच्या दुधाची साठवणूक करण्यासाठी तंत्रज्ञान शिकून घेतले. हे करताना त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. बाबू उलगनाथन यांच्या शेतात 5000 गाढवे आहेत. या गाढवांच्या पालनपोषणाची माहिती घेण्यासाठी ते नेहमी अनेकांकडून माहिती घेतात. याशिवाय त्यांनी गाढव पालनासंदर्भात एक जागरूकता केंद्र देखील स्थापन केले आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा व्यवसाय अमेरिका, युरोप, चीनसह इतर देशांशी जोडला गेला आहे. परदेशातील सौदर्यउत्पादन कंपन्यांमध्ये या दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र गाढवीणीचे दुध लवकर खराब होते. त्यामुळे ते परदेशात पाठवताना त्यावर विशेष प्रक्रिया करावी लागते. यामुळे त्याचा खर्च वाढतो.
गाढवीणीच्या दुधामध्ये (Milk) त्वचेतील पेशींना दुरुस्त करण्याची क्षमता असते. तसेच या दुधामध्ये (Milk) रोगप्रतिकारक शक्तीही अधिक असते. सौदर्यासाठी प्रसिद्ध असलेली प्राचीन ग्रीकची पहिली महिला साम्राज्ञी गाढवीणीच्या दुधाने आंघोळ करायची अशी आख्यायिका सांगण्यात येते.
==========
हे देखील वाचा : शेवग्याच्या शेंगाचे सेवन केल्यास होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे
==========
गाढवीणीच्या दुधावर भारतात मर्यादित स्वरुपात संशोधन झाले आहे. मात्र परदेशात या दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परदेशात नवजात बालकांसाठी गाढविणीच्या पाश्चरयुक्त दूधाचा वापर केला जातो. अमेरिकेनंही याला परवानगी दिली आहे. गाढविणीच्या दूधापासून बनलेलं साबण, क्रीम आणि मॉइश्चरायझरला बाजारात मागणी असते. आज भारतातही अनेक महिला गाढविणीच्या दूधापासून बनलेल्या वस्तूंचा वापर करत आहेत. भारतात गुजरातमधील जामनगर आणि द्वारकामध्ये आढळणाऱ्या हराली प्रजातीची गाढवे पाळीव म्हणून वापरण्यात येतात. ही गाढव सामान्य गाढवांपेक्षा अधिक उंच आणि घोड्यांपेक्षा थोडी छोटी असतात. त्यांचा रंग पांढरा असतो. एक गाढवीण दिवसभरात जास्तीत जास्त अर्धा लीटर इतकं दूध देते. तामिळनाडू, केरळ आणि गुजरातमधील काही भागात या गाढवांचे पालन आता मोठ्या फार्ममध्ये करण्यात येत असून त्यांच्या दुधापासून येते मोठे उद्योग उभारण्यात आले आहेत. गाढविणीच्या दूधापासून बनलेलं साबण, मॉइश्चरायझर आणि क्रीम यासारखी उत्पादनं ऑमलाईन प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आहेत. या उत्पादनाची किंमतीही तेवढीच आहे. 100 ग्रॅम साबणाची किंमत 500 रुपये आहे. एवढी किंमत असली तरी या उत्पादनांना मोठी मागणी आहे. ज्या गाढवांना प्राण्यांमध्ये सर्वात खालच्या क्रमांकावर स्थान देण्यात येतं त्याच गाढवीणीचं दुध (Milk) हे सर्वाधिक किंमतीमध्ये विकले जाते आहे. शिवाय त्यापासून बनवलेल्या उत्पादनांनाही मोठी मागणी आहे.
सई बने