Home » Prayagraj : माघमेळ्यासाठी प्रयागराज सज्ज !

Prayagraj : माघमेळ्यासाठी प्रयागराज सज्ज !

by Team Gajawaja
0 comment
Prayagraj
Share

पुढच्या एका महिन्यात नवे वर्ष सुरु होत आहे. या नव्या वर्षाची सुरुवात प्रयागराज येथील पवित्र माघमेळ्यांनी होत आहे. २०२६ या नव्या वर्षात अधिक महिनाही येत असल्यामुळे या माघमेळ्याला अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेश प्रयागराजमधील संगम येथे हा पवित्र माघ मेळा भरतो. या काळात, होणारे शाही स्नानही महत्त्वाचे असते. जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्तता मिळविण्यासाठी याच संगमावर कल्पवास केला जातो. यासाठी देशविदेशातील हजारो भाविक संगमावर केलेल्या तंबूंमध्ये रहातात, आणि कठीण व्रत वैकल्य करतात. नव्यावर्षी होत असलेल्या या माघमेळ्यासाठी आणि त्यातील कल्पवासासाठी आत्तापासून प्रयागराज प्रशासन तयारीला लागले असून संगमतीरावर त्यासाठी कामही सुरु झाले आहे. (Prayagraj)

हिंदू धर्मात माघ मेळ्याला खूप महत्त्व आहे. माघ मेळा दरवर्षी पौष पौर्णिमेला सुरू होतो आणि महाशिवरात्रीपर्यंत चालतो. यासाठी देशभरातून भाविक येतातच, पण विदेशातून येणा-या भाविकांची संख्याही मोठी आहे. माघ मेळ्यादरम्यान संगममध्ये स्नान करणे खूप पवित्र मानले जाते. यामुळे सर्व नकारात्मक विचार निघून जातात, अशी भावना आहे. त्यामुळेच येथे माघमेळ्यासाठी सामान्य भाविकांसह मोठ्या संख्येनं ऋषी, भिक्षू आणि कल्पवासी सामिल होतात. या काळात संमगतीरावर तपश्चर्या केल्यानं जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्तता मिळते, अशीही आख्यायिका आहे. यासाठी संगमतीरावर मोठे यज्ञही आयोजित केले जातात. या सर्वात सूर्याची पूजा करणे पवित्र असते. प्रयागराज संगम तीरावर जमलेले हजारो भाविक भल्या पहाटे उठून सूर्याची पूजा करतात आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य देतात. विशेषतः मकर संक्रांती आणि मौनी अमावस्या या दिवशी या माघमेळ्यात सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी मोठी गर्दी होते. यावेळी मोठ्या संख्येने भाविक पवित्र स्नानासाठी येतात. (Social News)

या वर्षी पौष पौर्णिमा ३ जानेवारी २०२६ रोजी आहे आणि महाशिवरात्री १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आहे. या काळात होणा-या माघमेळ्यासाठी सहा शाही स्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. माघ मेळ्यातील पहिले शाही स्नान ३ जानेवारी २०२६, शनिवार, रोजी पौष पौर्णिमेला होईल. माघ मेळ्यातील दुसरे शाही स्नान १५ जानेवारी २०२६, गुरुवार, रोजी मकर संक्रांतीला होईल. यावेळी देशभरातून लाखो भाविक प्रयागराजला येण्याची शक्यता आहे. माघ मेळ्यातील तिसरे शाही स्नान १८ जानेवारी २०२६, रविवार, रोजी मौनी अमावस्येला होईल. यावेळेही माघमेळ्यामध्ये भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. (Prayagraj)

शिवाय या दिवशी माघमेळ्यामध्ये पवित्र स्नानासाठी आणि होम, यज्ञ या पवित्र धार्मिक विधींसाठी साधू-संतही मोठ्या प्रमाणात येतात. या साधू संतांसाठी वेगळी निवासयोजना करण्यात येत आहे. माघ मेळ्यातील चौथे शाही स्नान २३ जानेवारी २०२६, शुक्रवार, रोजी वसंत पंचमीला होणार आहे. वसंत पंचमीला होणारे हे शाही स्नानही महत्त्वाचे असते. माघ मेळ्यातील पाचवे शाही स्नान १ फेब्रुवारी २०२६, रविवार, रोजी माघ पौर्णिमेला होईल. तर माघमेळ्यातील आणखी एक महत्त्वाचे म्हणजे, सहावे शाही स्नान १५ फेब्रुवारी २०२६, रविवार, रोजी महाशिवरात्रीला होईल. महाशिवरात्रीला होणा-या स्नानासाठीही येथे साधू-संत मोठ्या प्रमाणात येतात. या साधू संतांच्या निवासासाठी आणि स्नानासाठी संगमतीरावर वेगळी व्यवस्था कऱण्यात येत आहे. (Social News)

माघ मेळा दरम्यान केलेली तपस्या आणि तपस्या अत्यंत पवित्र मानली जाते. माघ मेळ्या दरम्यान, मकर संक्रांतीच्या दिवशी, सूर्य देव दक्षिणायनातून उत्तरायणात जातो. हिंदू धर्मग्रंथानुसार उत्तरायण काळात मृत्युमुखी पडणाऱ्यांना स्वर्ग मिळतो. म्हणूनच, महाभारत काळात, भीष्म पितामह सहा महिने बाणांच्या शय्येवर झोपून सूर्य उत्तरेकडे जाण्याची वाट पाहत होते. (Prayagraj)

=========

Margashirsha : जाणून घ्या मार्गशीर्ष गुरुवारांचे महत्त्व

=========

याच माघमेळा दरम्यान, एक महिना चालणारा कल्पवास साजरा केला जातो. कल्पवास ही हिंदू धर्मातील एक आध्यात्मिक तपस्या आहे. कल्पवास हा पवित्र नदीच्या काठावर केला जातो. त्यात प्रयागराजमधील गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वतीच्या संगमावर होणा-या कल्पवासाची परंपरा पौराणिक काळापासून आहे. आजही तेवढ्याच भक्ती आणि श्रद्धेनं भाविक हा कल्पवास करतात. एक महिना सांसारिक जीवनापासून अलिप्त करून आत्मशुद्धीसाठी तीव्र आध्यात्मिक साधना करतात. पौष पौर्णिमेला कल्पवास सुरू होतो आणि माघी पौर्णिमेपर्यंत चालतो. या वर्षी, एका तिथीची कमतरता असल्याने, कल्पवास ३० ऐवजी २९ दिवसांचा असणार आहे. या कल्पवासासाठी आवश्यक तंबूंची बांधणी सुरु झाली असून त्यांचे बुकींगही सुरु झाले आहे. (Social News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.