‘पंजाबचा सिंह, भारताचा मुलगा, कॅनडाचा प्रेमी, सत्य सांगणारा, न्यायासाठी लढणारा, दलितांचा आवाज, तारिक फतेह आता आमच्यात नाहीत. त्यांचे कार्य आणि त्यांची क्रांती. त्यांना ओळखणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्या सर्वांसोबत राहतील. हा संदेश आहे, नताशा तारिक फतेह (Tariq Fateh) यांचा. पाकिस्तानी वंशाचे प्रसिद्ध लेखक तारिक फतेह (Tariq Fateh) यांची मुलगी नताशानं आपल्या वडिलांच्या निधनानंतर अगदी त्यांच्याच शब्दात त्यांना श्रद्धांजली वाहिली. दहशतवाद आणि पाकिस्तान यांचे नाते स्पष्टपणे सागून अनेकवेळा स्वतःचा जीव धोक्यात घालणारे, तारिक फतेह यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. गेल्या अनेक वर्षापासून तारिक हे कर्करोगानं आजारी होते. पण कायम भारतमातेला प्रथम मानणा-या तारेक यांनी शेवटच्या श्वासापर्यंत भारताचे गुणगौरव करत होते तर पाकिस्तानला स्पष्ट विचारांनी आरसा दाखवत होते.

प्रसिद्ध लेखक तारिक फतेह (Tariq Fateh) हे स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध होते. दहशतवाद आणि पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे ते अनेकदा चर्चेत आले. फतेह कुटुंबीय मुळ मुंबईमधील रहिवासी. 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यावर त्यांचे कुटुंब पाकिस्तानातील कराची येथे स्थायिक झाले. तारिक फतेह यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1949 रोजी पाकिस्तानातील कराची शहरात झाला. असे असले तरी तारिक यांच्या मनात कामय भारतला प्रथम स्थान राहिले. त्यांनी कराची विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीचे शिक्षण घेतले. त्यानंतर पत्रकार म्हणून ते काम करु लागले. या पत्रकारितेच्यामुळे त्यांना दोनवेळा पाकिस्तानच्या जेलमध्येही जावे लागले. 1970 मध्ये तारिक यांनी कराची सन या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून काम सुरु केले. त्यांना शोध पत्रकारितेची आवड होती. पण या शोध पत्रकारितेमुळे ते अनेकदा तुरुंगातही गेले. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानी टीव्ही चॅनलमध्ये काम सुरु केले. मात्र तारिक यांचा स्वभाव अत्यंत रोखठोक. अनेकवेळा पाकिस्तानी सरकारच्या चुका ते सर्वासमोर मांडू लागले. त्यामुळे त्यांनी काम करतांना अनेकांची नाराजी ओठवून घेतली. सतत होणा-या त्रासामुळे तारिक यांनी पाकिस्तान सोडून सौदी अरेबियात स्थायिक होण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथेही त्यांचे सडतोड विचार मध्ये आले. अखेर 1987 मध्ये कॅनडामध्ये ते स्थायिक झाले. कॅनडामध्ये गेल्यानंतर तारिक यांनी पत्रकार म्हणून नव्यानं करिअरला सुरुवात केली. सोबत तारिक रेडिओ आणि टीव्हीवरही कार्यक्रम करत असत. येथे त्यांचा सोशल मीडियावरही फॉलोअर वाढला आणि तारिक फतेह प्रसिद्ध होऊ लागले. तारिक फतेह अनेक विषयांचे अभ्यासक होते. तारिक फतेह त्यांनी बलुचिस्तानमधील मानवाधिकारांच्या उल्लंघनावरही लेखन करुन जगाला बलुचिस्तानमध्ये काय चालले आहे, याची माहिती दिली. आझाद बलुचिस्तानचे समर्थक म्हणूनही ओळखले जात होते.
तारिक फतेह (Tariq Fateh) हे नेहमीच पाकिस्तानचे कट्टर टीकाकार राहिले. भारत आणि हिंदूंबद्दल त्यांचा दृष्टिकोन नेहमीच सकारात्मक होता. इस्लामच्या काही परंपरांबाबत त्यांची मतेही स्पष्ट होती, विरोधी होती आणि त्यामुळे ते वादात सापडले होते. तीन तलाक मुद्यावर भारत सरकारनं घेतलेल्या भूमिकेचे त्यांनी समर्थन केले. त्यांनी मोदी सरकारचे अनेकदा जाहीर कार्यक्रमात ते कौतुक करत असत. मोदींनी एकही गोळी न चालवता पाकिस्तानला उपासमारीच्या अवस्थेत आणले, या त्यांच्या वक्तव्याचा पाकिस्तानमधील अनेकांनी निषेध केला होता. मात्र तारिक यांनी यावर पुन्हा पाकिस्तानला फटकारले होते. भारताची फाळणीही चुकीची असल्याचे त्यांचे मत होते. फाळणीचा त्यांनी कायम विरोध केला. पाकिस्तान हा देखील भारतीय संस्कृतीचा एक भाग असल्याचे त्यांचे म्हणणे होते. आणि केव्हा न केव्हा पाकिस्तान पुन्हा भारताबरोबर जोडला जाईल, असा आशावादही त्यांना होता.
======
हे देखील वाचा : मृत्यूनंतर चोरला होता आइंस्टाइन यांचा मेंदू
======
तारिक फतेह (Tariq Fateh) धार्मिक कट्टरतेच्या विरोधात होते. त्यांनी भारतीय संस्कृतीला एकात्मतेचे सूत्र मानले. पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून त्यांच्यावर अनेकदा हल्ले झाले, पण या हल्ल्यांना न घाबरता तारिक यांनी अधिक तिव्रपणे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले केले. भारतातील एका टीव्ही चॅनलवर ‘फतह का फतवा’ नावाचा एक कार्यक्रम सुरू झाला होता, त्यावरही बरीच टिका झाली. पण तारिक यांनी या टिकाकारांना कधिच महत्त्व दिले नाही. तारिक फतेह (Tariq Fateh) हे मान्यवर लेखक होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांचे ‘चेजिंग अ मिराज: द ट्रॅजिक इल्युजन ऑफ अॅन इस्लामिक स्टेट’ हे पुस्तक खूप गाजले. हे पुस्तक बेस्ट सेलर ठरले. याशिवाय ‘द ज्यू इज नॉट माय शत्रू’ही खूप गाजले होते. तारिक यांनी समलिंगी लोकांच्या समान हक्क आणि हिताच्या बाजूनेही अनेकवेळा लिखाण केले आहे. यासोबतच त्यांनी बलुचिस्तानमधील मानवाधिकारांच्या उल्लंघनावरही बरेच लिखाण केले आहे.
तारिक (Tariq Fateh) यांना आपल्या भारतीयत्वावर अभिमान होता. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, मी एका राजपूत कुटुंबातून आलो आहे. या कुटुंबाला 1840 मध्ये इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले गेले. मी पाकिस्तानात जन्मलेला भारतीय मुलगा आहे. सलमान रश्दीच्या पुस्तकातील मिडनाइट्स चिल्ड्रनच्या अनेक मुलांपैकी मी एक आहे. एक गौरवशाली सभ्यता सोडून आम्हांला आयुष्यभर निर्वासित बनवण्यात आले. इस्लामवाद हा मानवी सभ्यतेला धोका आहे, असे ते म्हणायचे. इस्लामिक कट्टरता आणि पाकिस्तानच्या विरोधात बोलून पाकिस्तानला आरसा दाखवणा-या या प्रतिभावंत लेखकाची लेखणी आता शांत झाली आहे.
सई बने