गेल्या काही महिन्यांपासून इस्राइल आणि पॅलेस्टाईनचं युद्ध सुरूच आहे. त्यातच गाजामधली दहशतवादी संघटना हमासचा म्होरक्या इस्माईल हानियाची हत्या झाल्याची बातमी आहे. पॅलेस्टाईनसोबतच इराणच्या बाबतीतही इस्राइलचे संबंध काही चांगले राहिले नाहीत. मात्र इराणची राजधानी तेहरानमध्ये हानियाची हत्या केल्यामुळे इस्रायल सर्वांच्याच रडारवर आलं आहे. पण हा हानिया नेमका कोण होता आणि आता इस्राइलवर मोठं संकट ओढवणार का ? आता यापेक्षाही मोठं युद्ध घडेल का ? (Ismail Haniyeh)
हमासची स्थापना १९८७ ची! इस्लामिक रेजिस्टंस मूव्हमेंट या संघटनेच्या अरबी नावाच्या अक्षरांना जोडून ‘हमास’ हे नाव ठेवण्यात आलं आहे. एकंदरीत फ्री पॅलेस्टाईनसाठी लढणं हेच त्यांचं ध्येय आहे. २००५ नंतर इस्राईलने गाझातून आपलं सैन्य आणि वस्त्या मागे घेतल्या. तेव्हापासून हमासने पॅलेस्टाईनच्या राजकीय प्रक्रियेत सहभागी व्हायला सुरुवात केली. २००६ साली हमासने पॅलेस्टाईनच्या अंतर्गत येणाऱ्या भागात निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. पुढल्याच वर्षी त्यांनी गाझाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्या ‘फतह’ या प्रतिस्पर्धी गटाला बाजूला सारत तिथली सत्ता काबिज केली.
तेव्हापासून गाझाच्या या कट्टरवादी हमास संघटननेने इस्रायलसोबत तीन युद्ध केली आहेत. मात्र इस्राइलनेही याचा अनेकदा प्रतिकार केला आहे. त्यामुळे हमासला एकट पाडून त्यांच्यावर हल्ले बंद करण्याचा दबाव यावा, यासाठी इस्रायलने इजिप्तच्या मदतीने गाझापट्टीची नाकाबंदी केली आहे. हमासला इस्रायलसोबतच अमेरिका, युरोपीय महासंघ, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इजिप्त, जपान, ब्रिटन आणि इतर अनेक देशांनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. तर इराण, रशिया, टर्की, चीन, साऊथ आफ्रिका, आणि काही अरब राष्ट्र हमासला दहशतवादी संघटना मानत नाही, ते त्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणतात. (Ismail Haniyeh)
हमासचा इस्माईल हानिया हा जो म्होरक्या मारला गेला, हा २०१४ पासून हमासच्या प्रमुखपदी कार्यरत होता. त्याचा जन्म तसा रेफ्यूजी कॅम्पमधलाच, पण परिस्थितीनुसार तो सुद्धा पॅलेस्टाईनला स्वतंत्र करण्याच्या संघर्षात उतरला. ९०च्या दशकात तो हमाससोबत जोडला गेला. २००६ साली झालेल्या निवडणुकीत हमासचा विजय झाला आणि हानीयाला पॅलेस्टाईन ऑथॉरिटीचा पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आलं. पॅलेस्टाईनच्या राजकारणात त्यांचा चांगलाच दबदबा होता. २०१९ पासून तो कतारमध्ये राहत होता. त्यानंतर तो इराणला गेला. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासद्वारे इस्राइलवर जो हल्ला झाला, त्याचा मास्टरमाइड हानियाच होता, असं बोललं जातय. आणि हेच कारण होतं की तो इस्राइल आणि मोसादच्या रडारवर आला होता. काहीच दिवसांपूर्वी इस्रायलच्या हल्ल्यात त्याची मुलं आणि कुटुंबातील सदस्य मारली गेली होती.
==================
हे देखील वाचा : ट्रम्प यांच्या हल्यामागच्या चर्चा
================
त्यामुळे इस्राइलने तेहरानमधील हानियाच्या निवासस्थानाला लक्ष्य केलं. आणि निवासस्थानाबाहेर झालेल्या स्फोटात हानिया आणि त्याच्या एका रक्षकाचा मृत्यू झाल्याचं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने जाहीर केलं आहे. याचे आरोप तसे इस्राइलवरच लावण्यात येत असले, तरी इस्राइलने मात्र यावर अजूनही काही भाष्य केलेलं नाही. इस्राइलने यापूर्वीसुद्धा हमासचे आध्यात्मिक नेते शेख अहमद यासीन यांच्यावर हल्ला केला होता, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकीकडे हा वाद जितका पॅलेस्टाईन वि. इस्रायल आहे, तितकाच हमास वि. इस्रायल असाही आहे. (Ismail Haniyeh)
मात्र यामुळे आता इस्रायलवर मोठं संकट कोसळणार असल्याची चर्चा सुरू जागतिक स्तरावर सुरू झाली आहे. इस्राइलला याची किंमत मोजावी लागेल, असं हमासचे सैनिक म्हणत आहेत. हमासचे अधिकारी सामी अबू जुहरी यांनीही याचा बदला लवकरच घेतला जाईल, असं वक्तव्य केलं आहे. दरम्यान आता हा वाद नक्कीच अजून चिघळणार असल्याची चिन्ह आहेत. आतापर्यंतच्या या इस्राइल-पॅलेस्टाईन संघर्षाच्या इतिहासात जवळपास ५० हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. १० लाख लोकं बेघर झाली आहेत. त्यामुळे आता हमासचं पुढचं पाऊल काय असेल आणि इस्रायल स्वतला कसं डीफेंड करेल, हे येणारा काळच दाखवून देईल. (Ismail Haniyeh)