जगात अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक अशी ठिकाणं आहेत जी आपल्याला नेहमी आश्चर्यचकित करत असतात. आपल्या पृथ्वीवर पॅसिफिक महासागराच्या अफाट पसरलेल्या लाटांमध्ये मायक्रोनेशियाचा असाच एक छोटासा पण विलक्षण द्वीपसमूह आहे पिंगेलॅप अटॉल. समुद्र, नारळाची झाडं, आकाशाचा निळसर विस्तार या सगळ्यात हे बेट एकदम साधं-सुंदर दिसतं. पण या बेटाची कहाणी फार वेगळी आहे हे बेट जगप्रसिद्ध आहे एका खास कारणासाठी ते म्हणजे त्या बेटावरील बहुतांश लोकांना रंगांधळेपणाचा विकार आहे. म्हणजेच इथल्या अनेक लोकांना कुठलाही रंग दिसत नाही! म्हणूनच या बेटाला नाव पडलंय – “रंगांधांचं बेट”. पण यामागे नेमकं कारण काय ? आणि एकंदरीतच या बेटाबद्दल जाणून घेऊ. (Island of the Colorblind)
तर ही कहाणी सुरू होते १७७५ सालापासून. त्या काळी या बेटावर दैनंदिन जीवन साधेपणाने चालू होतं. मासेमारी, शेती, आणि समुद्र हे लोकांच्या जीवनाचे अविभाज्य भाग होते. पण अचानक एक प्रचंड चक्रीवादळ स्थानिक भाषेत ‘लेंगकीकी‘ या बेटावर आलं. या वादळाने इतका प्रचंड हाहाकार माजवला की संपूर्ण बेट उद्ध्वस्त झालं. नारळाची झाडं उपटली गेली, घरे नष्ट झाली आणि सर्वात भीषण म्हणजे बहुतेक लोक मृत्युमुखी पडले. थोडेसेच लोक वाचले आणि त्यात एक होता या बेटाचा राजा. पण त्या राजाला एक दुर्मिळ नेत्रविकार होता अक्रोमॅटोप्सिया. हा विकार पुढे त्याच्या वंशातून पसरत गेला आणि शेकडो वर्षांत बेटावर सुमारे १० टक्के लोक या आजाराने त्रस्त झाले. जगभरात जिथे ३० हजार लोकांपैकी केवळ एकालाच हा विकार असतो, तिथे पिंगेलॅपमध्ये मोठ्या संख्येवर तो लोकांना झालेला दिसतो. त्यामुळेच हे बेट विज्ञानाच्या दृष्टीनेही अभ्यासाचं एक मोठं केंद्र बनलं. (Top Stories)
आता प्रश्न पडतो अक्रोमॅटोप्सिया म्हणजे नक्की काय? आपल्या डोळ्यांमध्ये दोन प्रकारच्या विशेष पेशी असतात कोन सेल्स आणि रॉड सेल्स. कोन सेल्स रंग ओळखतात. त्यांचे तीन प्रकार असतात लाल, हिरवा आणि निळा. या तीन रंगांच्या संवेदनांवरून आपल्याला बाकी लाखो रंगांची संवेदना होते. पण अक्रोमॅटोप्सियामध्ये हे कोन सेल्स काम करेनासे होतात. त्यामुळे रंगांची संवेदना पूर्णपणे नाहीशी होते. लोकांना फक्त ब्लॅक अँड व्हाईट जग दिसतं. मात्र रॉड सेल्स नीट काम करतात, ज्यामुळे उजेड-अंधार, ग्रे शेड्स आणि वस्तूंचे आकार समजतात. पण यालाही मर्यादा आहेत. दिवसा सूर्यप्रकाश तीव्र असतो, त्यामुळे त्यांच्या डोळ्यांना फार त्रास होतो. प्रकाश डोळ्यात शिरला की डोळे लुकलुकतात, पाणी येतं, आणि डोळे उघडे ठेवणं अवघड होतं. म्हणून अनेकदा हे लोक डोक्यावर टोपी घालतात, काळ्या चष्म्यांचा वापर करतात किंवा झाडांच्या सावलीत बसतात. पण त्याचवेळी एक फायदा त्यांना मिळतो तो म्हणजे रात्री त्यांची दृष्टी अतिशय चांगली असते. अंधारात ते सहजपणे हालचाली ओळखू शकतात, समुद्राच्या लाटा, मासे यांचं निरीक्षण करू शकतात. त्यामुळे हे लोक बहुतांश वेळा रात्री मासेमारी करतात आणि आपल्या पोटापाण्याची सोय करतात.(Island of the Colorblind)
या बेटावर सुमारे दहा पैकी एक व्यक्ती पूर्ण रंगांधळा आहे, तर जवळपास तिघांपैकी एक व्यक्ती हा जीन वाहून नेणारा म्हणजेच कॅरिअर आहे. त्यामुळे पुढच्या पिढीतही हा विकार सहज पसरतो. इतर देशांमध्ये जिथे रंगांधळेपणाचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे लाल-हिरवा रंग दिसत नाही असं असतं, तिथे पिंगेलॅपमध्ये मात्र पूर्ण जगच ब्लॅक अँड व्हाईट आहे. जगाला या बेटाची ओळख झाली ती १९९६ साली, जेव्हा प्रख्यात न्युरोलॉजिस्ट ऑलिव्हर सॅक्स यांनी “द आयलंड ऑफ द कलरब्लाइंड” नावाचं पुस्तक लिहिलं. (Top Stories)
================
हे देखील वाचा : Navratri 2025 : कर्नाटकातील 1000 वर्ष जुने चामुंडेश्वरी देवीचे मंदिर, वाचा पौराणिक कथा
=================
या पुस्तकात त्यांनी इथल्या लोकांच्या दैनंदिन जगण्याचा, त्यांचं विज्ञानाशी नातं, आणि वेगळेपण स्वीकारण्याची वृत्ती यांचा तपशीलवार उल्लेख केला. त्यानंतर जगभरातील शास्त्रज्ञ, पत्रकार, आणि कलाकारांनी या बेटाचा अभ्यास सुरू केला. बेल्जियममधील Photographer सॅन दे व्हाइल्ड हिने २०१५ मध्ये या बेटाला भेट दिली. तिने एक वेगळा प्रयोग केला. तिने काही फोटोस ब्लॅक अँड व्हाईट इफेक्टमध्ये काढले आणि काही इन्फ्रारेड इफेक्टमध्ये काढले. त्यानंतर तिने हे फोटो इथल्या लोकांना दाखवले आणि विचारलं की हे रंगवा. त्या लोकांनी आपल्या कल्पनेनुसार रंग भरले. आश्चर्य म्हणजे त्यांनी कधीच रंग पाहिले नव्हते, तरीही त्यांनी लाल, निळा, पिवळा अशा रंगांविषयी ऐकलेलं होतं, आणि त्या ऐकलेल्या कल्पनांवरून त्यांनी चित्र रंगवलं. यावरून कळतं की रंग केवळ डोळ्यांनी पाहण्याची गोष्ट नाही, तर तो मनातल्या भावनेतूनही निर्माण होतो.(Island of the Colorblind)
आज पिंगेलॅप बेट विज्ञानासाठी संशोधनाचा विषय आहे. जीन थेरपीवर काम सुरू आहे आणि भविष्यात कदाचित या विकारावर उपाय सापडेल. पण तोपर्यंत इथल्या लोकांनी आपल्या जीवनाशी जुळवून घेतलं आहे. ते दिवसा अडचणींना तोंड देतात, रात्रीच्या अंधारात मासेमारी करतात, गाणी गातात आणि जीवन रंगांविना पण भावनांनी जगतात. खरं तर या बेटाची गोष्ट आपल्याला शिकवते की वेगळेपण ही कमजोरी नाही, तर ती आपली खरी ताकद आहे.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics