२५ फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित
स्मार्टफोनवर चित्रीकरण करून प्रदर्शित होणारा भारतातील पहिला मराठी चित्रपट ‘पॉंडीचेरी’. अवघ्या एका महिन्यात या अनोख्या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले. ‘पॉंडीचेरी’चे निसर्गसौंदर्य, अथांग समुद्रकिनारे, रंगीबेरंगी फ़्रेंच धाटणीची घरे आणि या शहरात निर्माण होणारे अनोखे नातेसंबंध या ट्रेलरमध्ये दिसले. ‘पॉंडीचेरी’बाबतची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात वाढत असतानाच आता चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘गुलाबजाम’ सारख्या दर्जेदार चित्रपटाची मेजवानी दिल्यानंतर आता सचिन कुंडलकर ‘पॉंडीचेरी’ची सैर घडवणार आहेत. या चित्रपटात सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, नीना कुळकर्णी, महेश मांजरेकर, गौरव घाटणेकर आणि तन्मय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर मिलिंद जोग यांनी छायाचित्रणकाराची भूमिका निभावत निसर्गरम्य ‘पॉंडीचेरी’ आणि तिथे निर्माण होणारे भावनिक नातेसंबंध टिपले आहेत.
निसर्गाची मुक्तपणे उधळण झालेल्या ‘पाँडीचेरी’ शहरात घडणारी ही कथा आहे. सई, वैभव आणि अमृता यांच्या आगळ्यावेगळ्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट असून ट्रेलर पाहता हा चित्रपट लव्ह ट्रॅन्गल असल्याचे जरी दिसत असले तरी नात्याची आणि कुटुंबाची नवीन व्याख्या ‘पाँडीचेरी’च्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये प्रत्येकाच्या आयुष्याचा एक वेगळा प्रवास दिसत आहे. हा प्रवास त्यांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर घेऊन जातो आणि त्यांच्या नात्यातील हा गुंता सुटतो का, हे ‘पाँडीचेरी’ पाहिल्यावरच कळेल.
सई ताम्हणकर आपल्या भूमिकेबद्दल सांगते, ” यात मी अशी व्यक्तिरेखा साकारत आहे, जी तिच्या पतीच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहात आहे. यात मी मराठी, तामिळ, फ्रेंच, हिंदी आणि इंग्रजी अशा पाच भाषा बोलले आहे. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी खूपच निराळा आहे. इतका उत्कृष्ट चित्रपट आणि इतकी दमदार व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली, यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजते. हा संपूर्ण चित्रपट आयफोनवर चित्रित करण्यात आला आहे, मात्र चित्रपट पाहताना हे कुठेही जाणवणार नाही.” तर वैभव तत्ववादी आपल्या व्यक्तिरेखेबद्दल सांगतो, ”माझ्या व्यक्तिरेखेला अनेक छटा आहेत. ज्या चित्रपटातील प्रत्येक मूडला साजेशा आहेत. एक अशी कथा जी पॉंडीचेरी शहरावर आधारित आहे, याच गोष्टीने माझे पहिले लक्ष वेधून घेतले. आकर्षक फ्रेम्स, जबरदस्त दिग्दर्शन आणि संपूर्ण चित्रपटाचे चित्रण हे प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन आहे, जे त्यांना नक्कीच आवडेल.” ‘पाँडीचेरी’तील आपल्या भूमिकेबद्दल अमृता खानविलकर म्हणते, ” मी एक अशी व्यक्तिरेखा साकारतेय, जिचे आयुष्य अत्यंत गुंतागुंतीचे होते आणि भूतकाळात झालेल्या आघातांवर ती मात करण्याचा प्रयत्न करत आहे. या भूमिकेसाठी हो म्हणायचे मुख्य कारण म्हणजे ही कथा मला खूप भावली आणि दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी खूपच रंजक पद्धतीने ती मांडली. मुळात हा चित्रपट स्मार्टफोनवर चित्रित करण्यात आला आहे. त्यामुळे हा अनुभवही खूप आगळावेगळा होता. कलाकारांसह केवळ पंधरा लोकांसोबत या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. मर्यादित क्रू सोबत काम करणे खूपच आव्हानात्मक होते. मात्र हे आव्हान पेलून आम्ही सगळ्यांनीच चित्रीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले. हा माझ्यासाठी नवीन आणि खूप छान अनुभव होता.”
====
हे देखील वाचा: हरीश दुधाडेची नवी इनिंग…
====
‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर ‘पाँडीचेरी’बद्दल म्हणतात, ”हा चित्रपट नात्याभोवती फिरणारा असला तरी नात्याची परिभाषा बदलणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण स्मार्टफोनवर झाले आहे, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र पडद्यावर बघताना प्रेक्षकांना याची कुठेही जाणीव होणार नाही. इतक्या सराईतपणे तो चित्रित करण्यात आला आहे. मोठ्या कालावधीनंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा प्लॅनेट मराठीचा हा पहिला चित्रपट असून सिनेरसिकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल आणि याचा अनुभव त्यांनी चित्रपटगृहातच घ्यावा. प्लॅनेट मराठी दर्जेदार, उत्कृष्ट आणि अनोख्या निर्मितीला नेहमीच प्रोत्साहन देते. आम्हाला फार आनंद आहे की, ‘पाँडीचेरी’ हा आमच्या या परिवाराचा एक भाग आहे.”
====
हे देखील वाचा: अदितीचा हा नवा अवतार देशमुखांच्या घरात घेऊन येणार नवं वादळ
====
अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी आणि क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत ‘पाँडीचेरी’ या चित्रपटासाठी सचिन कुंडलकर यांनी दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता अशा तिहेरी भूमिका साकारल्या आहेत. तर नील पटेलही या चित्रपटाचे निर्माता आहेत. मोह माया फिल्म्स आणि इंक टॅंक निर्मित हा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.