अमेरिकेच्या कॅलिफोर्निया भागाला आग काही सोडत नसल्याचे चित्र आहे. जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमधील काही भागाला आगीनं स्वाहा केलं आहे. आता थोड्या प्रमाणात विझलेली ही आग पुन्हा एखदा भडकली आहे. यावेळी ही आग लॉस एंजेलिसच्या उत्तरेकडील ह्यूजेस भागात आग लागली आहे. नव्यानं लागलेल्या या आगीमध्ये सुमारे 10 हजार एकर क्षेत्र जळून खाक झाले आहे. वाढती आग आणि जोरदार वारा यामुळे या भागातील 50 हजार नागरिकांना घरे सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या आगीवरुन अमेरिकेतील राजकारणही तापले आहे.
या आगीला काबूत करण्यासाठी लॉस एंजेलिसमधील प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. शिवाय येथील उपलब्ध पाण्याच्या साठ्याचा योग्यप्रकारे वापर केला नसून कॅलिफोर्नियाला देण्यात येणा-या आर्थिक मदतीमध्ये कपात करण्यात येईल, असेही ट्रम्प यांनी जाहीर केल्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजिलिस काऊंटीमध्ये आता नव्यानं आग लागल्यामुळे अमेरिकन प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. इतिहासातील सर्वात विनाशकारी आग असे या आगीचे वर्णन करण्यात येत आहे.
लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीत या नव्या आगीनं भर टाकली आहे. शहराच्या उत्तरेकडील कास्टेइक लेकजवळील डोंगराळ भागात बुधवारी दुपारी ही आग लागल्याचे दिसल्यावर तिथे आग प्रतिबंधक यंत्रणा सज्ज करण्यात आली. याबाबत चिंतेचे कारण म्हणजे, या आगीच्या सीमेवर अनेक निवासी क्षेत्रे आणि शाळा आहेत. या भागात सध्या जोरदार वारा आहे. त्यामुळे आग काही क्षणातच मोठ्या भागात पसरली आहे. अवघ्या दोन तासांत 5 हजार एकरपेक्षा जास्त परिसरात आग पसरली आहे. यापूर्वी शहरातील पॅलिसेड्स आणि ईटन भागात आगीमुळे भयानक विनाश झाला आहे. लॉस एंजेलिसमधील आगीत आतापर्यंत 28 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून या भागातील काही नागरिक बेपत्ताही झाले आहेत. आता नव्यानं लागलेल्या आगीमुळेही मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच सांता आना येथे जोरदार वारे वाहत असून हा सर्व भाग कोरड्या झुडुपांनी भरलेला आहे. त्यामुळे आगी मोठ्या प्रमाणात पसरणार आहे.
ही आग अधिक वेगानं पसरणार असल्यामुळे या भागातील, तलावाच्या आसपास रहाणा-या नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लॉस एंजेलिसच्या उत्तरेस 56 किलोमीटर अंतरावर असलेला हा परिसर सांता क्लॅरिटा शहराजवळ आहे. याच भागात नवीन आग लागल्याची घटना घडल्यामुळे रहिवाश्यांनी घाबरुन घरे रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. आग ज्या भागात पसरत आहे, त्या भागातील कॉस्टिकमधील एक तुरुंग रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातील 500 कैद्यांना अन्य जेलमध्ये हलवण्यात आले आहे. शिवाय तुरुंगातील अन्य भागात 4600 कैदी आहेत.
आगीची तिव्रता वाढल्यास या कैद्यांनाही हलवण्यात येणार असल्याचे प्रशासनानं सांगितले आहे. लॉस एंजेलिसमध्ये वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत, त्यासाठी तेथील हवामानही पुरक असल्याची माहिती आहे. आता ज्या भागात आग लागली आहे, त्या ठिकाणी 20 ते 30 मैल प्रति तास वेगानं वारे वाहत आहेत. या वा-यांचा वेग दिवसा अधिक वाढतो. त्यामुळे आगही वाढत आहे. यापूर्वी, लॉस एंजेलिसमध्ये जिथे आग लागली होती, ती जागा पूर्णपणे राखेत रूपांतरित झाली आहे. येथे आगीमुळे 22 हजारांहून अधिक घरे जळून खाक झाली आहेत. त्यामुळेच नव्या भागात जिथे आग लागली आहे, तिथे अधिक नुकसान होऊ नये म्हणून 4 हजार अग्निशामक जवान तैनात करण्यात आले आहेत.
================
हे देखील वाचा : Trump And Musk : ट्रम्प आणि मस्क कट्टर विरोधक ते पक्के मित्र !
Saif Ali Khan : पतौडी कुटुंबाचा शेवटचा नवाब
================
पण आग दर 3 सेकंदाला फुटबॉल मैदानाएवढा परिसर जळून खाक करीत असल्यानं चिंता व्यक्त होत आहे. कॅलिफोर्नियाच्या जंगलामध्ये गेल्या 50 वर्षात 78 हून अधिक आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अलिकडच्या काही वर्षात येथील जंगलाजवळ निवासी क्षेत्र वाढल्यामुळे आगीमुळे होणा-या नुकसानीत भर पडली आहे. 1933 मध्ये लॉस एंजेलिसमधील ग्रिफिथ पार्कला लागलेली आग ही कॅलिफोर्नियातील सर्वात मोठी आग होती. त्यात सुमारे 83 हजार एकर क्षेत्र व्यापले होते. यातून सुमारे 3 लाख नागरिकांनी आपले घर सोडून दुस-या ठिकाणी आसरा घेतला होता.
सई बने