पहिल्या भागातील श्रीकांतला मागे टाकत, द फॅमिली मॅनच्या दुसऱ्या भागातही मनोज वाजपेयीचा दमदार परफॉर्मन्स!
तब्बल वीस महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर फॅमिली मॅन या वेबसिरीचा दुसरा सिझन अमेझॉनवर रिलीज झाला. जाहीर केलेल्या वेळेच्या दोन तास आधीच ही सिरीज ओटीटी फ्लॅटफॉर्मवर आली आणि त्याच्यावर प्रेक्षकांच्या अक्षरशः उड्या पडल्या. मनोज वाजपेयीचा जबरदस्त अभिनय, त्याला तेवढीच टक्कर देणारी समंथा अक्कीनेनी आणि त्यांना शारीब हाश्मी, प्रिया मणी, सीमा बिस्वास, विपिन शर्मा, शरद केळकर या कलाकारांनी दिलेली साथ यामुळे फॅमिली मॅनच्या दुस-या सिरिजचे नऊही भाग जबरदस्त झाले आहेत. याआधी ज्या समंथाच्या भूमिकेवरुन गदारोळ झाला होता, त्याच समंथाचा अभिनय बघून मान्यवरांनी कौतुक केलं आहे. वास्तववादी अभिनय म्हणून समंथा या पहिल्याच हिंदी वेबसिरीजमधून भाव खावून गेली आहे. याचवेळी श्रीकांत तिवारी झालेला मनोज वाजपेयी आता तिस-या सिझनमध्ये काय करणार याचीही उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
गुप्तहेर संघटना टीएएससीचा अधिकारी श्रीकांत दिल्लीतील गॅस घटनेनंतर आपल्या कामापासून वेगळा झाला आहे. त्याची पत्नी, सुचीच्या सांगण्यावरुन तो एक कॉर्पोरेट नोकरी करतोय. तिथे त्याचा बॉस त्याच्यापेक्षा वयानं लहान आहे आणि तो त्याला सतत टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्रस्त करतोय. ही मन न रमणारी नोकरी करतांना श्रीकांत घरी आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठीही प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जेवण बनवण्यापासून तो सर्व काम करीत आहे. पण त्याचं मन मात्र त्याच्या जुन्या नोकरीतच आहे. त्यामुळेच तो त्याचा जुना सहकारी तळपदेला सारखा फोन करुन अपडेट घेत असतो. या सर्वात एक अशी घटना घडते की श्रीकांतला आपल्या जुन्या आणि आवडीच्या कामावर रुजू व्हावे लागते. त्यानंतर सुरु होतो एक पाठलाग…

फॅमिली मॅनच्या (The Family Man) या दुस-या सिझनची कथा मुंबई, दिल्ली, चेन्नई, श्रीलंका, लंडन, फ्रांस येथे घडत आहे. पण या कथेचा केंद्रबिंदू चेन्नई येथे आहे. श्रीलंकेच्या उत्तरी भागातील तामिळ विद्रोही संघटनेनं आपलं स्वतंत्र सरकार घोषित केलं आहे. या संघटनेचा मुख्य भास्करन आपले दोन विश्वासू साथीदार दिपन आणि छोटा भाऊ सुब्बू यांच्यासोबत मिळून स्वतंत्र देशासाठी लढाई लढत आहे. फ्रांन्स या वेगळ्या देशाला मान्यता देणार अशी शक्यता आहे. फक्त प्रश्न आहे भारताच्या मान्यतेचा… ही मान्यता महत्त्वाची आहे. त्यासाठी भारतीय पंतप्रधानांवर दबाव टाकण्याचा कट करण्यात येतो. एकीकडे चिन श्रीलंकेत एअरबेस करण्याच्या प्रयत्नात आहे.
हा एअऱबेस भारतासाठी धोक्याचा आहे. त्याला विरोध करण्यासाठी भारताकडून श्रीलंकेला आग्रह धरण्यात येतो. तेव्हा त्या बदल्यात सुब्बुची मागणी श्रीलंकेकडून होते. या सर्वात भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी आईएसआई ही प्रयत्न करत आहे. यात भारतीय आणि श्रीलंकेच्या पंतप्रधानांना थेट मारण्याचा कट करण्यात येतो. भारतीय गुप्तहेर संघटना ही कारस्थाने उद्धस्त करण्यासाठी कामाला लागतात. 9 ते 5 ऑफीस करुन बायकोची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करणारा श्रीकांतही हे कॉर्पोरेट काम सोडून आपल्या टीममध्ये पुन्हा सामिल होतो. ही सगळी उत्कंठावर्धक कथा सिरीजमध्ये बघतांना प्रेक्षक एका जागी खिळून जातात.

फॅमिली मॅन हिंदी आणि तमिळमध्ये उपलब्ध आहे. यातील संवाद, स्क्रीप्ट दमदार आहे. हिंदीचे संवाद सुपर्ण एस वर्मा यांनी लिहीले आहेत आणि तमिळ संवाद मनोज कुमार कलईवनन यांनी लिहिले आहेत. या सिरीजमध्ये भारतीय राजकारणातील काही घटनांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण हे करतांना अत्यंत संयम बाळगण्यात आला आहे. त्याचे सर्व यश या संवादलेखकांना जाते. दुनियाभर में टेररिज़म की डेफिनेशन समय-समय पर बदलती रहती है… जिसकी सरकार उसकी पॉलिसी… हा श्रीकांतच्या तोंडी असलेला डायलॉग या सर्वांचे सार आहे.
मनोज वाजपेयींनी (Manoj Bajpayee) आपल्याच पहिल्या भागातील श्रीकांतला मागे टाकले आहे, असं म्हणता येईल. इतका त्याचा अभिनय सहज आणि सजग झाला आहे. समंथा अक्कीनेनी ही दाक्षिणात्य अभिनेत्रीही या वेबसिरीजमधून पहिल्यांदा हिंदीत आली आहे. राजी ही तिची भूमिका बघतांना अंगावर काटा येतो. तिच्या चेह-याचे हावभाव बोलके आहेत. समंथा लवकरच हिंदीमध्ये मोठ्या बॅनरच्या चित्रपटात दिसली तर नवल नको… एकूण फॅमिली मॅनचा पहिला सिझन सॉलिड होताच… पण त्यापेक्षाही दुसरा सिझन आहे. त्यामुळेच आता या वेबसिरीजच्या तिस-या सिजनची उत्सुकता लागली आहे.
पहिल्या आणि दुस-या सिझनमध्ये तब्बल वीस महिन्यांचे अंतर पडले. तेवढी प्रतीक्षा तिस-या सिझनसाठी प्रेक्षकांना करावी लागू नये म्हणून फॅमिली मॅनची टीम कामालाही लागली आहे. दुस-या भागाच्या शेवटी त्याचा क्लू ही देण्यात आला आहे. दुस-या सिझनच्या शेवटच्या भागामध्ये कोलकत्यामध्ये मास्क घातलेला एक चिनी माणूस लॅपटॉपमधून चॅट करत आहे. त्यात भारताची परिस्थिती खूप नाजूक आहे, आता आपण आपलं मिशन पूर्ण करु शकू असे त्यांचे चॅट चालू आहे. त्यामुळे तिस-या सिझनमध्ये चिन, नागालँड, लडाख असा प्रवास फॅमिली मॅनची टीम करणार असा कयास लावण्यात येत आहे.
– सई बने