गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कवंडे येथे तब्बल एक हजार जवानांनी अवघ्या 24 तासात पोलीस मदत केंद्र उभारल्याने नक्षलवाद्यांचे प्रवेशद्वार आता बंद झाले आहे. नक्षलवाद्यांचे प्रवेशद्वार म्हणून दक्षिण गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कवंडे हे गाव कुख्यात होते. आता या गावाची ओळख बदलणार असून येथे आधुनिक सोयींनी सुसज्ज असे पोलीस मदत केंद्र उभे करण्यात आले आहे. हा नक्षलवाद्यांना मोठा धक्का मानला जातो. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवादी चळवळ संपवणार, असे सांगितले होते. तेव्हापासून नक्षलवाद्यांच्या विऱोधात सरकारनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यातीलच कवंडे येथील पोलीस मदत केंद्र हा एक भाग असल्याची माहिती आहे. (Gadchiroli)
नक्षलवाद्यांचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कवंडे येथे अचानक हजार जवान दाखल झाले. या जवानांनी कवंडे येथील जमिनीचा ताबा घेत जमिन समतल करण्यास सुरुवात केली. सोबतच एका केंद्राच्या उभारणीचे कामही सुरु केले. सुरुवातीला जवानांचा कॅम्प या भागात असल्याची चर्चा सुरु झाली. काही दिवसानंतर हे जवान परत जातील अशीही बातमी पसरली. पण तब्बल चोवीस तासानंतर येथे पोलीस मदत केंद्र कवंडे, भामरागड, गडचिरोली, राज्य महाराष्ट्र असा बोर्ड लागला. त्यानंतर मात्र खळबळ उडाली. (Marathi News)
10 जेसीबी, 9 ट्रेलर, 4 पोकलेन, 25 ट्रक व 10 डंपर ही साधने घेत अवघ्या 24 तासात एक हजार जवानांनी पोलीस मदत केंद्र उभारल्याने नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसला आहे. कवंडे हे गाव छत्तीसगड सीमेपासून केवळ दोनशे मीटर अंतरावर आहे. याच गावातून नक्षलवादी गडचिरोली राज्यात प्रवेश घ्यायचे. मात्र आता याच गावात सुसज्ज असे पोलीस केंद्र उभारल्यामुळे नक्षलवाद्यांची कोंडी झाली आहे. शिवाय येथे पोलीस केंद्र आल्यानं भविष्यात येथून छत्तीसगड मध्ये पोलीस शोध मोहीम सुरु झाल्यावर नक्षलवाद्यांभोवती अधिक भक्कम फास आवळणे पोलीसांना शक्य होणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादी चळवळ मोडीत काढण्यासाठी राज्यातील पोलीसांनी मिळून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच आदेशानुसार आता कवंडे गावातील पोलीस चौकी उभारली आहे. गेल्या तीन वर्षात गडचिरोली पोलिसांनी छत्तीसगड अबुझमाड सीमेवर सात पोलीस मदत केंद्राची स्थापना केली आहे. त्यामुळे या भागातील नक्षलवादी कारवाया रोखण्यात यश आले आहे. (Gadchiroli)
गडचिरोली जिल्ह्याचा भामरागड तालुका हा नक्षलवादी प्रभावित तालुका म्हणून ओळखला जातो. येथील नेलगुंडा, पेनगुंडा आणि कवंडे या गावात नक्षलवाद्यांचे संपर्कजाळे मोठ्याप्रमाणात आहे. मात्र आता याच भागाचा विकास सरकारनं हाती घेतला आहे. या भागात रस्ते करण्यात आले, तर मोबाईल नेटवर्क प्रभावी करत नक्षलवाद्यांच्या हालचालींवर याद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे नक्षलवादी कारवाया थंडावल्या आहेत. मात्र कवंडे येथील पोलीस चौकी ही या नक्षलवाद्यांसाठी एक धक्कातंत्र ठरली आहे. नक्षलवाद्यांचा गड समजल्या जाणा-या अबुझमाडची सीमा ही कवंडे गावाला लागून आहे. (Marathi News)
===============
हे देखील वाचा : Black Turmeric : भारताच्या काळ्या सोन्याला परदेशात मोठी मागणी !
Mukhava Mandir : माता गंगेचे माहेर !
===============
गेल्या काही महिन्यांपासून छत्तीसगडसह गडचिरोली पोलिसांनी अबुझमाडमध्ये नक्षलवाद्यांविरोधा मोठी कारवाई सुरु केली आहे. यामुळे नक्षलवादी कवंडे गावाचा आश्रय घेत होते. पण याच गावात पोलीस मदत केंद्र झाल्यामुळे अबुझमाडमध्ये होणा-या नक्षलविरोधी मोहिमध्ये या केंद्राची भूमिका लक्षवेधी ठरणार आहे. त्यातही नेलगुंडापासून कवंडेला जाण्यासाठी रस्ताच नव्हता. जवानांनी अवघ्या 24 तासात हा आठ किलोमीटरचा बनवत पोलीस चौकीचे सर्व साहित्य कवंडे गावात आणले. यामुळे कवंडे गावातील गावक-यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. पोलीसांनी गावक-यांशी संवाद साधत या पोलीस चौकीचे महत्त्व सांगितले. तसेच जगजागरण करत गावक-यांना जीवनावश्यक साहित्याचेही वाटप केले. गेली अनेक वर्ष ही गावे मुख्य प्रवाहापासून लांब होती. या पोलीस मदत केंद्रामुळे लवकरच येथे सर्व शासकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. शिवाय गावक-यांना आरोग्य सुविधाही पुरवल्या जाणार आहेत. गावक-यांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार करण्याचे कामही या पोलीस मदत केंद्रातर्फे कऱण्यात येणार आहे. (Gadchiroli)
सई बने