Home » America : अमेरिका आणि व्हेनेझुएलाच्या वादातील प्रमुख लक्ष !

America : अमेरिका आणि व्हेनेझुएलाच्या वादातील प्रमुख लक्ष !

by Team Gajawaja
0 comment
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन गुप्तचर संस्था, सीआयएला व्हेनेझुएलामध्ये आपले ऑपरेशन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच ट्रम्प प्रशासनाच्या आदेशानुसार अमेरिकेचे सर्वात मोठे विमानवाहू जहाज व्हेनेझुएलाशी युद्ध करण्यासाठी रवाना झाले आहे. त्यामुळे अमेरिका लवकरच राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना सत्तेवरून दूर करण्यासाठी व्हेनेझुएलावर हल्ला करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या सर्वात अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या बोटींवरही हल्ला करत त्यामध्ये ड्रग्ज असल्याचा दावा केला होता. हे होत असतांना व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनीही अमेरिकेसोबत दोन हात करण्यासाठी ५,००० इग्ला-एस क्षेपणास्त्र तैनात केली आहेत. त्यामुळे भविष्यात या दोन्हीही देशांमध्ये युद्ध होणार का, अशी चर्चा सुरु असली तरी या सर्वात अमेरिका व्हेनेझुएलामागे तेथील तेलसाठ्यांसाठी मागे लागल्याची बातमी आहे. (America)

व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात जास्त तेलाचे साठे उपलब्ध आहेत. सौदी अरेबियापेक्षाही व्हेनेझुएला आणि त्याच्या आसपाच्या समुद्रामध्ये तेल साठा उपलब्ध आहे. या सर्व तेलसाठ्यांवर अमेरिकेचे नजर आहे. त्यातूनच त्यांनी निकोलस मादुरो यांची सत्ता उलथवून टाकण्याचा कट रचला आहे. मादुरो यांना हटवून अमेरिका त्यांच्या धोरणांना पाठिंबा देणारा अध्यक्ष व्हेनेझुएलामध्ये बसण्याच्या प्रयत्नात आहे. असे झाल्यास अमेरिकेला तेथील तेलाच्या साठ्यांवर कब्जा करता येणार आहे. अमेरिकेचा हा डाव माहित असल्यामुळेच मादुरे हे आता थेट महसत्तेविरोधात युद्ध करण्याची भाषा करीत आहेत.अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यामध्ये युद्धाचे ढग अधिक गडद होत आहेत. यामागे तेलाचे राजकारण प्रमुख आहे. अमेरिकेला व्हेनेझुएलामधील तेलाच्या साठ्यावर नियंत्रण हवे आहे. मात्र व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेच्या धोरणाला कायम विरोध केला आहे. त्यामुळेच अमेरिका मादुरो यांना अध्यक्ष म्हणून मान्यता देत नाही. (International News)

आता तर मादुरो यांना सत्तेवरून दूर करण्यासाठी अमेरिकेने सीआयएला योजना दिली आहे. यातूनच व्हेनेझुएलाच्या अंतर्गत राजकीय अस्थिरता, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि आर्थिक संकट निर्माण होऊ लागले आहे. २०१९ मध्ये, अमेरिकेने व्हेनेझुएलाचे विरोधी पक्षनेते जुआन ग्वाइदो यांना व्हेनेझुएलाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून मान्यता दिली आणि निकोलस मादुरो यांनी अमेरिकेशी संबंध तोडले. तेव्हापासून मादुरो आणि अमेरिका हा वाद अधिक वाढला. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता आल्यापासून अमेरिकेने व्हेनेझुएलावर अनेक नवे आर्थिक निर्बंध लादले आहेत, शिवाय व्हेनेझुएलाचे एक विमान देखील जप्त केले आहे. त्यामुळे व्हेनेझुएलातून अमेरिकन राजदूतांची हकालपट्टी करण्यात आली. यासर्वात कॅरिबियनमध्ये अमेरिकेच्या लष्करी उपस्थिती वाढल्यामुळे व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी लष्कराला सराव करण्याच्या सूचना देत कधीही युद्धाची वेळ येणार असल्याचे सांगितले आहे. शिवाय ५,००० क्षेपणास्त्र तैनात केले आहेत. (America)

या सर्वामागे ट्रम्प आणि मादुरो यांच्यातील वैर असले तरी व्हेनेझुएलामधील तेलाचे साठेही कारणीभूत ठरले आहेत. व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात अधिक तेलसाठे असून ते ३०० अब्ज बॅरल पर्यंत असण्याची शक्यता आहे. ही संख्या सौदी अरेबियापेक्षाही अधिक आहे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार व्हेनेझुएलामध्ये कच्चे तेल खूप जास्त असून त्यातील बराचसा भाग विशेष देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय रिफायनरीजद्वारे प्रक्रिया केला जातो. २००६ पर्यंत, व्हेनेझुएला हा अमेरिकेचा तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार होता. दररोज अंदाजे १.४ दशलक्ष बॅरल कच्चे तेल व्हेनेझुएलाकडून अमेरिकेला जात होते. मात्र त्यानंतर या दोन्ही देशांमध्ये वितुष्ट आले आणि त्याचा परिणाम तेलाच्या निर्यातीवर झाला. २०१४ मध्ये व्हेनेझुएलामध्ये अराजकता निर्माण झाली. महागाईचा प्रकोप झाला. गरजेच्या वस्तूही मिळेनाशा झाल्या. त्यामुळे व्हेनेझुएलाचे नागरिक मोठ्या संख्येनं देश सोडून अन्य देशांच्या आश्रयास गेले. (International News)

=======

हे देखील वाचा : Tulshi Vivah : यंदा तुळशी विवाह कधी आहे? जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त

=======

या सर्वात अमेरिकेनं व्हेनेझुएलावर आर्थिक निर्बंध टाकण्यास सुरुवात केल्यामुळे तेथील अर्थव्यवस्था डबघाईला आली. भ्रष्टाचार आणि एकहाती सत्तेतून येणारी हुकूमशाही यामुळे तेलाची जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या व्हेनेझुएलाची आर्थिक घडी पार विस्कटली. यासर्वाला व्हेनेझुएलातील राजकीय नेते जबाबदार असल्याचा आरोप सुरुवातीपासून अमेरिका करत आहे. त्यामुळे येथील सरकारला अमेरिकेचा विरोध आहे. तेथील प्रस्थापित सरकार हटवून त्याजागी अमेरिकेला पाठिंबा देणारे सरकार स्थापन करायचे आहे. त्यातून व्हेनेझुएलातील प्रचंड तेलसाठ्यावर अमेरिकेचे नियंत्रण येणार आहे. असे झाल्यास अमेरिकेला सौदी अरेबियामधील तेलावर अवलंबून रहावे लागणार नाही. त्यामुळे या पुढच्या नितीसाठी सध्यातरी अमेरिका व्हेनेझुएलाच्या मागे लागल्याचे चित्र आहे. (America)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.