अयोध्येमध्ये उभारण्यात येणा-या भव्य राममंदिरात प्रभू रामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा कधी होणार आणि भक्तांसाठी हे मंदिर कधी खुले होणार याची उत्सुकता होती. त्यासाठी रामभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. पुढील वर्षी अयोध्येतील राममंदिरात प्रभूंच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी 22 जानेवारी ही तारीख जाहीर (Date announced) करण्यात आली आहे. राम मंदिराच्या उभारणीचे सुमारे 70 टक्के काम पूर्ण झाले असून नव्या वर्षात या मंदिराचा एक टप्पा पूर्ण होणार आहे. त्यामुळे 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी सोशल मिडीयामार्फत ही माहिती दिली आहे. सध्या राममंदिराच्या गर्भगृहाचे खांब 14 फुटांपर्यंत पूर्ण झाले असून पुढील वर्षात रामभक्तांसाठी हे मंदिर खुले करण्यात येणार आहे. (Date announced)
अयोध्येत सुरु असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे बांधकाम तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिला टप्पा ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण होईल. दुसरा टप्पा डिसेंबर 2024 मध्ये पूर्ण होणार असून संपूर्ण मंदिर पूर्ण होण्यासाठी 2025 साल लागणार आहे. मात्र तो पर्यंत मंदिराचा एक टप्पा पूर्ण झाल्यावर मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करुन भक्तांना दर्शन घेता येणार आहे. 22 जानेवारी 2024 पासून मंदिरात दर्शन आणि पूजेला सुरुवात होणार आहे. प्रभू रामांच्या या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी सुमारे 800 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. एकूण खर्च अंदाजे 1800 कोटी रुपये मंदिरासाठी अपेक्षित असून प्रत्येक टप्प्यावर हा खर्च होणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे हे सर्व नियोजन चालू आहे. 2024 मध्ये मकर संक्रांतीपासून प्रभू श्रीरामांच्या मंदिरात विविध उत्सव सुरु होणार आहेत. साधारण आठवडाभर आधीपासून पूजा विधी सुरु होतील. त्यानंतरच 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांची मुर्ती स्थानापन्न करण्यात येईल. प्रभू श्रीरामांच्या आणि सीतामाईच्या मुर्तीसाठी नेपाळहून खास शिळा आणल्या असून त्यावर काम करण्यात येत आहे. (Date announced)
अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे मंदिर पूर्ण झाल्यावर आणि त्यामध्ये पूजाअर्चा सुरु झाल्यावर अयोध्येत भक्तांची गर्दी वाढणार आहे. सध्याही अयोध्येत येणा-या पर्यटक आणि भक्तांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या सर्वांसाठी सुखकर अशी प्रवासाची सोयही सध्या स्थानिक प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. अयोध्येत परदेशातून थेट येणा-या भाविकांची संख्या अधिक आहे. या प्रभू श्रीरामांच्या भक्तांसाठी विमानतळही उभारण्यात येत आहे. अयोध्या व्हिजन 2047 अंतर्गत ही सर्व विकासकामे होत आहेत. अयोध्येत होणा-या विमानतळाच्या धावपट्टीचे काम 15 मे आणि टर्मिनलचे काम जून 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे. (Date announced) त्यासोबत भक्तांसाठी परिक्रमा मार्गही करण्यात येत आहे. हा परिक्रमा मार्गही आधुनिक करण्यात येत असून भक्तांना सर्वप्रकारे सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे. या परिक्रमामार्गावर पथदिवेही सौरउर्जा पद्धतीचे असून त्यातील फरशा आणि दगडही वैशिष्टपूर्ण असेच आहेत. याशिवाय संपूर्ण अयोध्येतील रस्ते आणि पदपथांचीही नव्यानं रचना करण्यात येत आहे. राममंदिर जसजसे पूर्ण होत आले आहे, तसेच संपूर्ण अयोध्येतील सोयी सुविधांचीही नव्यानं उभारणी करण्यावर प्रशासनाचा जोर आहे.
========
हे देखील वाचा : बद्रीनाथच्या मंदिरात ‘या’ कारणास्तव शंख वाजवत नाहीत
========
अयोध्येच्या रस्त्यावर दोन्ही बाजुला झाडेही लावण्यात येत आहेत. तसेच रस्त्याच्या बाजुला असलेल्या सर्व भिंतीवर चित्रे काढून त्या सजवल्या जात आहेत. कोसी परिक्रमा मार्गाचेही सुशोभिकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यापासून रोज हजारो भाविकांची वर्दळ अयोध्येत राहणार आहे, त्यादृष्टीने प्रशासन तयारी करत आहे. मुख्य म्हणजे, भाविकांना ट्रॅफीक जॅमचा कुठलाही अनुभव येऊ नये यासाठी प्रशासन आतापासून कामाला लागले आहे. यासाठी तब्बल 5 हजार कोटी रुपयांच्या रिंगरोडचे काम सुरू आहे. हा रिंगरोड अयोध्येतील 47 गावातून जाणार आहे. 67 किलोमीटर लांबीच्या रिंगरोडमुळे जवळपास 30 लाख लोकसंख्येला दिलासा मिळणार आहे. यामुळे वाहने अयोध्या नगरीत थेट न येता शहराच्या बाहेरुन जाणार आहेत. रिंगरोडच्या बांधकामामुळे अयोध्या शहरातील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. रिंगरोडमुळे अयोध्येची कनेक्टिव्हिटी सुधारणार असून रामभक्तांना सहजपणे या नगरीत प्रवेश करता येणार आहे. या रिंगरोडवर 11 मोठे आणि 12 छोटे पूल बांधले जाणार आहेत. चार ठिकाणी रेल्वे ओव्हरब्रिज बांधण्यात येणार आहेत. यासोबतच 22 वाहन अंडरपास किंवा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. हा रिंगरोड म्हणजे अयोध्येची नवीन ओळख ठरणार आहे. याशिवाय अयोध्येत मुख्य स्थानांवर रस्ता रुंदीकरणाची मोहीमही जोरानं सुरु आहे. या सर्वांमुळे अयोध्येचे रुप बदलणार आहे. मोठ्यासंख्येनं येणा-या भाविकांची सुरक्षाह महत्त्वाची आहे. या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी शरयू स्नान घाटावर एसडीआरएफची टीम तैनात रहाणार आहे. जानेवारी 2024 मध्ये प्रभू रामांचे दर्शन रामभक्तांना घेता येणार आहेच शिवाय अयोध्यानगरीचे आधुनिकरुपही पाहता येणार आहे.
सई बने