Home » Shanivarwada : पेशव्यांची भयानक तांडव गणपतीची मूर्ती, जिथे गेली तिथे…

Shanivarwada : पेशव्यांची भयानक तांडव गणपतीची मूर्ती, जिथे गेली तिथे…

by Team Gajawaja
0 comment
Shanivarwada
Share

कोणत्याही शुभ गोष्टीची सुरुवात आपण गणरायाचं नाव घेतल्या शिवाय करत नाही. पण श्री गणेशाची एक अशी मूर्ती होती जी पेशव्यांपासून ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आली. त्यांच्यासोबत काहीतरी वाईट किंवा विचित्र घडलं. ही मूर्ती म्हणजे अघोरी तांडव गणपतीची मूर्ती (Aghori Tandav Ganesha idol) ! या मूर्तीची गोष्ट काय आहे तिच्यामुळे काय काय घडलं? हे जाणून घेऊ.

तर या अघोरी तांडव गणपतीच्या मूर्तीबद्दलची (Aghori Tandav Ganesha idol) माहिती श्री प्रमोद ओक यांनी लिहिलेल्या पेशवे घराण्याचा इतिहास या पुस्तकात आहे. ती अशी की, १७६५ नंतर थोरल्या माधवराव पेशव्यांचे दुखणे वाढत चालले होते. वैद्यांनीही आशा सोडली होती. तेव्हा श्रीमंत रघुनाथराव दादासाहेब पेशवे यांना वाटलं की, ही पेशवेपद मिळवायची संधी आहे. मग त्यांना म्हैसूरमधल्या कोत्रकार नावाच्या माणसाने पंचधातुची बनलेली ही तांडव गणपतीची मूर्ती त्यांना दिली. जी त्याने कर्नाटकातून आणली होती. कोत्रकार हा माणूस अघोरी विद्येच्या बाबतीत रघुनाथरावांचा गुरू होता. त्याच्या सांगण्यावरून पेशवेपदाची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी रघुनाथराव या मूर्तीची पूजा करायला सुरूवात केली. ते रात्री-बेरात्री या मूर्तीची कडक पूजा करायचे. पण यामुळे त्यांचं काही बरं झालं नाही. (Shanivarwada)

१७७३ च्या अखेरीस निजामावर स्वारीच्या निमित्ताने रघुनाथराव पुण्यातून निघाले, तेव्हा त्यांच्या शेडाणीकर नावाच्या एका व्यक्तीने ही मूर्ती शनिवारवाड्यातून नेऊन शेडाणी गावातील एका पिंपळाखाली मूर्तीची स्थापना केली. पण थोड्याच दिवसात ती मूर्ती तिथून गायब झाली. मग ती चिंचवड, वाई, अशी फिरत साताऱ्याला एका ब्राह्मणाच्या घरी पोहोचली. या मूर्तीच्या अशुभ प्रभावाने त्रासून त्या ब्राह्मणाने ती मूर्ती जुन्या विहिरीत विसर्जित केली. आता या मूर्तीची गोष्ट इथे संपली असेल असं वाटतं असेल, तर नाही! (Top Stories)

साधारण ५०-६० वर्षांनी. साताऱ्यातील प्रसिद्ध संन्यासी गोडबोले शास्त्री, म्हणजे नाथपंथीय स्वामी स्वच्छंदानंद, यांना स्वप्नात ही मूर्ती दिसली. त्यांनी आपला शिष्य वामनराव कामत यांना तिचा शोध घ्यायला सांगितलं. कामत यांनी तिचा शोधं घ्यायला सुरूवात केली. या शोधा दरम्यान त्यांना त्या मूर्तीचा इतिहास कळाला… ज्या ब्राह्मणाकडे ही मूर्ती होती तो निसंतान वारला होता. त्यामुळे कामत हे तिचा शोध घेण्यात टाळाटाळ करू लागले, पण स्वामी स्वच्छंदानंद यांना वारंवार त्या मूर्तीचे दृष्टांत होत होते. शेवटी नाइलाजानं कामतांनी मूर्ती शोधून काढली आणि आपल्या घरी देवघरात ठेवली आणि तिची पूजा सुरू केली. त्यानंतर ८-१० वर्षांत कामत कुटुंबातील सगळे जण एकेक करून मरण पावले. शेवटी कामतही निसंतान १९३८ साली वारले.

त्यांच्या लांबच्या नात्यातील एका बाईने मूर्ती देवघरातून ओसरीच्या कोनाड्यात ठेवली. १९४३ च्या सुमारास कामतांच्या गुरुभगिनी ताई चिपळुणकर यांनी पुन्हा त्या मूर्तीची पूजा सुरू केली. पण त्यांच्यावरही मूर्तीचा कहर झाला. त्या अर्धांगवायू झाल्या. दरम्यान, मुंबईचे डॉ. मोघे यांना जुन्या पुराणवस्तू गोळा करण्याचा छंद होता. त्यांना या मूर्तीबद्दल कळताच त्यांनी मित्र धुंडिराजशास्त्री बापटांनाही मूर्ती आणण्यासाठी साताऱ्यात पाठवलं. बापटांचे मित्र नानासाहेब सोनटक्के यांनी टॅक्सीने मूर्ती पुण्याला आणली. रात्री प्रवास नको म्हणून दुसऱ्या दिवशी मुंबईला जायचं त्यांनी ठरवलं. पण त्या रात्री सोनटक्के यांच्या बायकोला पोटदुखी सुरू झाली, जी असह्य होत होती. सकाळी सोनटक्के मूर्तीसह मुंबईला निघाले, आणि टॅक्सी दूर जाताच त्यांच्या बायोकचं दुखण थांबलं. (Shanivarwada)

=================

हे देखील वाचा : Rajasthan : माउंट अबूचे अद्भूत सिद्धी विनायक गणेश मंदिर !

=================

पुढे २-३ वर्षे मूर्ती डॉ. मोघ्यांकडे होती. या काळात त्यांना मुलगा झाला पण तो मानसिकदृष्ट्या कमकुवत होता. याच वेळी त्यांचं त्यांच्या मोठ्या मुलाशी भांडण झालं त्रासून मोघ्यांनी मुंबई सोडली. मुंबई सोडताना मोघ्यांनी त्या मूर्तीचा संपूर्ण इतिहास सांगून ती मूर्ती त्यांच्या घरी राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला म्हणजेच केशवराम अय्यंगारला दिली.

आता अय्यंगारनं काय केलं? त्याने म्हैसूरच्या मूर्तीकाराकडून या तांडव मूर्तीची तंतोतंत प्रतिकृती बनवली. त्या दोन्ही मुरत्या त्याने कांचीपुरमच्या शंकराचार्यांना द्यायचं ठरवलं. त्या शंकराचार्यांनी त्या मूर्तींनवर नजर टाकली आणि प्रतिकृती मूर्ती त्यांनी ठेवून घेतली आणि अघोरी मूर्ती परत केली. निराश झालेला अय्यंगार मद्रासला परतले, तेव्हा त्याची पत्नी गरोदर होती आणि जेव्हा त्याच्या घरात मुलगा जन्माला आला. आणि तोही मुलगा मानसिकदृष्ट्या कमकुवत होता. अय्यंगारांची अवस्था ऐकून त्यांचे मित्र श्री. सुबय्या यांनी अय्यंगार नको म्हणत असताना सुद्धा मूर्ती स्वत:जवळ ठेवली. नंतर सुबय्यांनी ती मद्रासच्या लंबूचेट्टी स्ट्रीटवरील शंकरमठाला दिली. त्यानंतर वर्षभरात सुबय्या मरण पावले. आता मूर्ती शंकरमठात आहे असं म्हणतात.(Top Stories)

श्री गणेशा हे दैवत आपल्या प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा देत वर्षभर आपण त्यांच्या आगमनाची वाट पाहतो. त्यामुळे या तांडव मूर्तीच्या संपर्कात येणाऱ्यांसोबत जे घडलं ते रहस्यमयी असलं, तरी काळाच्या ओघात या तांडव मूर्तीच्या घटनांमध्ये लोककथेतून आणखी काही गोष्टी अॅड झाल्या असतील. आणि त्या कोणत्या असतील हे आपण सांगू शकत नाही. या मूर्तीची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.