ब्रिटीश टिव्ही शो ‘प्रेस’ या वेबसिरीजचा हिंदी रिमेक असलेली वेबसिरीज ‘द ब्रोकन न्यूज’ हिट ठरली आहे. झी5 वर आलेल्या या सिरीजचं वैशिष्ट म्हणजे सोनाली ब्रेंद्रेचे यशस्वी पुनरागमन. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आत्तापर्यंत माधुरी दीक्षित, सुष्मिता सेन, रवीना टंडन या अभिनेत्रींचं आगमन झालंच आहे. यांच्या आता पाठोपाठ सोनाली बेंद्रेचेही दिमाखात आगमन झालं आहे. अनेक वर्षांनंतर पडद्यावर आलेल्या सोनाली बेंद्रेने ‘द ब्रोकन न्यूज’मध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. (The Broken News)
‘द ब्रोकन न्यूज’ या सिरीजमध्ये सोनालीसोबत जयदीप अहलावत, श्रिया पिलगांवकर, इंद्रनील सेनगुप्ता, तारुक रैना, आकाश खुराना, किरण कुमार, मुग्धा गोडसे, संजीता भट्टाचार्य यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विनय वायकुल यांनी दिग्दर्शित केलेली ही वेबसिरीज 10 जूनला प्रदर्शित झाली. न्यूज चॅनल वॉर, टीआरपी म्हणजे काय…याची झलक या सिरीजमधून बघायला मिळते.(The Broken News)
आवाज भारती आणि जोश 24/7 या मुंबईतील दोन वृत्तवाहिन्यांमधील चढाओढ ‘द ब्रोकन न्यूज’ मध्ये पहायला मिळते. दोन्हीही चॅनलचे ऑफीस एकाच बिल्डींगमध्ये आहे. आवाज भारतीची एडीटर अमीना म्हणजेच सोनाली बेंद्रे, तर जोश 24/7 या चॅनलचा एडीटर दीपांकर सान्याल आहे. या दोन्ही चॅनलमध्ये प्रचंड वैर आहे की, प्रत्येकाचा रंगही वेगळा आहे. एकीकडे निळा रंग तर दुसऱ्याचा भडक लाल रंग. एका चॅनेलमध्ये बातम्या सांगतांना कुठलाही आरडाओरडा नाही तर दुसरीकडे प्रचंड गदारोळ ‘गाने पर झूमी बिल्ली’ अशा टॅगलाईन. हा फरक कपड्यांमध्येही आहे. एकीकडे साधे कपडे, तर दुसरीकडे शर्ट पॅन्ट… प्रत्येक बातमीवरुन या दोन्ही चॅनेलमध्ये होणाऱ्या चढाओढीचे वेगवेगळे पैलू दाखवण्यात आले आहेत. या दोन चॅनेल्समधील हे वैर मग पत्रकारांच्या खाजगी आयुष्यापर्यंतही पोहचतं.
‘द ब्रोकन न्यूज़’मध्ये जयदीप अहलावत यांनी दीपांकर ही भूमिका केली आहे. दीपांकर हा अत्यंत अहंकारी आहे. जी वस्तू हवी ती मिळवण्यासाठी तो काहीही करु शकतो. तसंच आपली बातमी मिळवण्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी असते. अर्थातच त्यामुळे त्यांच्या चॅनेलचा टीआरपी अधिक असतो. (The Broken News)
=====
हे देखील वाचा – नाना पाटेकरही आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर, ‘या’ वेबसिरीजमधून करणार पदार्पण
=====
दुसरीकडे आवाज भारतीची एडीटर अमिना, म्हणजेच सोनाली बेंद्रे दाखवली आहे. ती भावनांपेक्षा वस्तुस्थिती काय आहे, याला महत्त्व देते. तिच्या बातम्याही तशाच असतात. अर्थात तिच्या चॅनलचा टीआरपी कमी असतो. या दोघांमध्ये राधा भार्गव नावाची पत्रकार येते. ही भूमिका श्रिया पिळगावंकरने केली आहे. तिला अमिनाची भूमिका आवडते, पण दीपाकंरचा बातमी मिळवण्याबाबतचा अट्टाहासही तिला भावतो.
‘द ब्रोकन न्यूज’ ही मिडीया हाऊसमधली स्टोरी नाही. तर या न्यूज चॅनेलवर अवलंबून असलेल्या प्रत्येक माणसाची स्टोरी आहे. झी 5 वर ब्रोकन न्यूजला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. सिरीज प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच आठवड्यात हीटचा मान मिळाला. विशेष म्हणजे सोनालीच्या भुमिकेचं तिच्या लाखो चाहत्यांनी कौतुक केलं आहे. यावर सोनालीही खूष आहे. (The Broken News)
सिरीजच्या पहिल्या सिझनमध्येच एवढं यश मिळाल्यावर दुसऱ्या सिझनसाठी आपण उत्सुक असल्याचे सोनालीनं सांगितलं आहे. जयदीप अहलावत यांनीही दीपांकरच्या भुमिकेला प्रेक्षकांनी स्विकारल्याचे आर्श्चय वाटलं आहे. नकारात्मक रंगाची भूमिका असली तरी त्यातील वास्तवाची जाण प्रेक्षकांनी ठेवल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. श्रिया पिळगांवकरने साकारलेल्या राधाच्या भूमिकेचेही कौतुक होत आहे. ‘ द ब्रोकन न्यूज’ झी 5 वर हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड भाषेमध्ये उपलब्ध आहे. (The Broken News)
– सई बने