कार्यालयीन कामकाजामध्ये येणारा ताण हा आता जीवनाचा एक भाग झाला आहे. त्यात नोकरीचे ठिकाण गाठण्यासाठी होणारा दैंनदिन प्रवासही अनेकांना शारीरिक थकवा देण्यास कारणीभूत ठरतो. कोरोनाच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ ही नवी संकल्पना आली. यातून नोकरीवर जाण्यासाठी होणारी प्रवासाची दगदग थांबली असली तरी कार्यालयीन कामकाजाचा बोजा वाढला आहे, तसेच कामाचे तासही वाढले आहेत. या सर्वांचे शरीरावर वाईट परिणाम होत आहेत. पाठीच्या आणि मानेच्या दुखण्यांनी अनेकांना हैराण केले आहे. या सर्वात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत काही काळ केलेला योगाचा सराव मोठा दिलासादायक ठरु शकतो. (Yoga In The Workplace)
अनेकवेळा कॉम्प्युटरवर काम केल्यामुळे मान, खांदे, पाठीचे स्नायू यावर ताण पडतो आणि त्यातून असह्य अशा वेदना होतात. त्यावर वेळीच उपाय योजना केली नाही, तर हे दुखणे मोठे होते आणि मग बसायलाही त्रास जाणवू लागतो. त्याचा कार्यालयीन कामकाजावर तर परिणाम होतोच पण शरीरावरही परिणाम होतो. मात्र काही योगप्रकार टेबलावर बसल्या बसल्या दिवसभरात कधीही करता येतात. यामुळे शारीरिक थकवा, ताण तणाव, वेदना दूर होतात. स्नायूंची ताकद वाढते. स्नायूंची कार्यक्षमता वाढते. तसेच ते अधिक लवचिक होतात. त्याचा फायदा म्हणजे दिवसभर ताजेतवाने वाटते.

बसल्याजागी आपली मान चक्राकार गोल फिरवणे या प्रकाराने मानेवर आलेला ताण कमी होतो. डोळे सावकाश बंद करत हनुवटी छातीवर टेकवायची आणि मान चक्राकार पद्धतीने सावकाश फिरवायची. प्रथम उजव्या बाजूला आणि नंतर डाव्या बाजूला अशी मान फिरवायची. मात्र हे सर्व करण्याआधी आपले कपडे सैलसर असतील याची काळजी घ्यावी. विशेषतः पुरुषांमध्ये शर्टाची बटनं गळ्यापर्यंत लावलेली असतात. काहीवेळा टाय बांधलेला असतो. हा व्यायाम प्रकार करण्याआधी टाय थोडा सैल करावा. यानंतर आपले दोन्ही हात समोर करुन मुठी वळायच्या आणि त्यानंतर या मुठीही गोल गोल फिरवायच्या एकदा सरळ झाल्यावर हीच क्रिया उलट करायची. यामुळे हातातील, बोटातील ताण दूर होण्यासाठी मदत होते. (Yoga In The Workplace)
असेज हात वर करुन वर नमस्कार केल्यासारखे करायचे. आपले नमस्कार केलेले हात वर खेचल्यासारखे करावे. त्यातून शरीरावर आलेला सर्व ताण दूर होण्यास मदत होते. पायाचेही असेच बैठे व्यायाम करता येतील. प्रथम पायातील बूट काढून याची सुरुवात करावी. दोन्ही गुढग्यांवर हात ठेवून ते ताठ करण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर पायांच्या बोटे ताठ करुन ती गोल गोल फिरवायची. यामुळे पायांमध्ये आलेला ताण दूर होण्यास मदत होते.
====
हे देखील वाचा – मासिक पाळीच्या वेदनांपासून सुटका हवी असेल, तर नियमित करा हे योगप्रकर!
====
या हलक्या व्यायामाच्या प्रकारानंतर गरुडासन हे आसन करावे. यामुळे संपूर्ण शरीरावर आलेला ताण एकाचवेळी दूर होण्यास मदत होते. सरळ उभं राहून उजव्या हाताने डाव्या हाताला विळखा घालावा. नमस्कार केल्याप्रमाणे दोन्ही तळवे एकमेकांना जोडावे. तसेच पायांचाही विळखा घ्यालण्याचा प्रयत्न करावा. जर उभं रहाणं शक्य नसेल, तर बसल्या जागीही ही क्रीया करता येते. हाच व्यायाम प्रकार परत डावा हात, उजव्या हातावर ठेऊन करावा. यातून हातावर, पायावर आणि पाठीवर आलेला ताण कमी होतो. (Yoga In The Workplace)

ऑफीसमध्ये सलग 9 तास बसून काम करणे हे खूप त्रासदायक ठरते. सुरुवातीला उत्साहाच्या भरात जरी असे बैठे काम केले, तरी त्याचा नंतर त्रास जाणवू लागतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच जर या सर्वात अशा बैठ्या योगाचे नियोजन केले, तर त्याचा आपल्याला फायदा होतो. कॉर्पोरेट योगाची संकल्पना त्यातूनच आली आहे. दर दोन तासांनी मोबाईलमध्ये असा ब्रेक पॉईंट लावला आणि काही मिनिटांचा ब्रेक घेतल्यास त्याचा नक्की फायदा होतो.
– सई बने