राज्यात विधानसभेच्या निवडणूक अंतिम टप्यात आली आहे. सर्वच पक्षांच्या निवडणुकांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत. पक्षांचे अधिकृत उमेदवार ते बंडखोर आणि अपक्षांनीही फॉर्म भरले आहेत. प्रत्येक जागेवर लढत नेमकी कोणत्या नेत्यांमध्ये होणार, हे आता फिक्स झाल आहे. अनेक जागांवर दुरंगी ते तिरंगी अशा फाइट होणार आहेत. यातीलच चुरशीच्या जागांबद्दल गाजावाजावर आपण जाणून घेणार आहोत. विधानसभेच्या रणधुमाळीत आज आपण पाहणार आहोत ठाणे विधानसभा मतदारसंघ. ठाणे विधानसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार संजय केळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर उद्धव ठाकरेंच्या सेनेने माजी खासदार राजन विचारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. महत्वाचं म्हणजे, मनसेनेहि पुन्हा एकदा तुल्यबळ उमेदवार देत युवा नेते अविनाश जाधव यांना संधी दिली आहे. अशावेळी या तिरंगी लढतीत नेमकं कोणाचं पारडं जड असेल? कोणते मुद्दे या जागेवर महत्वाचे ठरतील? आणि महत्वाचं म्हणजे, तिघाही उमेदवारांना या जागेवर विजय हवा असताना, या मतदारसंघातील गणितं नेमक्या कोणाच्या बाजूने राहू शकतात? जाणून घेऊया. (Thane Assembly Constituency)
तर ठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये जुन्या ठाणे शहरातील जुन्या आणि नव्या ठाण्याचा काही भाग येतो. मराठी, गुजराती, जैन, मुस्लिम अशा संमिश्र लोकवस्तीच्या या मतदारसंघात ३ लाख ७४ हजार १५३ मतदार आहेत. यामध्ये जुन्या ठाण्यातील जीर्ण इमारती, सोसायटी, चाळींपासून ते ढोकाळी, मानपाडा, ब्रह्मांड येथील उच्चभ्रू टॉवरमधील वर्गाचा समावेश आहे. तसेच भूमिपुत्र आगरी व कोळी समाजाची राबोडी, बाळकूम, महागिरी, कोलशेत पट्ट्यात वस्ती आहे. राबोडी व महागिरीत मुस्लिम समाज वास्तव्याला आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. १९९० पासून २००९ पर्यंत या मतदारसंघातून शिवसेनेचा आमदार निवडून येत होता. महत्वाचं म्हणजे ठाकरे गटाकडून सध्या निवडूक लढणारे राजन विचारे हे ही या मतदारसंघातून २००९ मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. विशेष म्हणजे, मराठी बहुल मतदारसंघ आणि मनसेची लाट असतानाही राजन विचारेंनी हा मतदारसंघ शिवसेनेसाठी राखला होता. मात्र २०१४ मध्ये सेनेच्या या गडाला भाजपने सुरुंग लावला. २०१४ विधानसभा निवडणूकीत एकसंघ शिवसेना आणि भाजपची युती तुटली होती. या निवडणूकीत शिवसेनेकडून रविंद्र फाटक यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर भाजपने संजय केळकर यांना रिंगणात उतरवले होते. या निवडणूकीत संजय केळकर यांनी फाटक यांचा पराभव करत शिवसेनेला एकप्रकारे मात दिली होती. ठाणे हातातून गेल्याने हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला होता. (Political News)
संजय केळकर यांनी २०१९ मध्ये पुन्हा असाच विजय रिपीट केला. २०१९ मध्ये शिवसेना भाजपची युती होती, त्यावेळी या मतदारसंघात भाजपने पुन्हा केळकर यांना उमेदवारी दिली. यावेळी मनसे आणि भाजप अशी थेट लढत होती. संजय केळकर यांच्याविरोधात मनसेचे नेते अविनाश जाधव हे निवडणूक लढत होते. युती असतानाही अविनाश जाधव यांचा केवळ सुमारे २० हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे शिवसेनेतील एका गटाची अविनाश जाधव यांना छुपी साथ मिळाल्याची चर्चा रंगली होती. आता तिसऱ्यांदाही भाजपने पुन्हा संजय केळकर यांना उमेदवारी दिली आहे. एक स्वच्छ इमेजचा नेता म्हणून केळकर यांचं नाव घेतलं जातं. केळकर यांनी ठाण्यात भाजपचा कमबॅक होण्यात मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळेच केळकर यांच्याच नेतृत्वखाली भाजपने ठाणे लोकसभा मतदारसंघावरही दावा केला होता, आणि अगदी अखेरच्या क्षणापर्यंत भाजपने हा ठाणे लोकसभा मतदारसंघ शिंदेंना सोडला नव्हता. पक्ष संघटेनचं मजबूत जाळं आणि राज्यस्तरीय नेत्यांचं पाठबळ हे देखील संजय केळकर यांचं बलस्थान आहे. ठाण्यात सर्वाधिक नगरसेवक असणं, हे ही संजय केळकर यांच्यासाठी सुखावणारी बाब आहे. (Thane Assembly Constituency)
मात्र संजय केळकर यांनी ठाण्यात भाजपाची ताकद वाढवताना एकनाथ शिंदे यांच्याशी पंगा घेतला होता. गेल्या वर्षांच्या कार्यकाळात केळकर यांनी अनेकदा ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे भूमिका घेतली आहे. त्यांचा रोख अनेकदा ठाणे महापालिकेवर एकहाती अंमल असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिला आहे. गेल्या अडीच वर्षांत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही केळकर यांनी ठाणे महापालिकेतील गैरकारभार, बेकायदा बांधकामे, दर्जाहीन कामे आदी मुद्द्यांवरून शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल केल्याचे अनेकदा दिसून आले. त्यामुळे शिंदे गटाने केळकर यांच्याविरोधात पुन्हा एकदा स्टँड घेतला तर आश्चर्य वाटायला नको. महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी या आधी २०१९ मध्ये शिवसेना भाजप युती असतानाही भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे शिंदे गटाशी जुळवून घेणं हे संजय केळकरांपुढील सर्वात मोठं आव्हान राहणार आहे. (Political News)
नाहीतर मग राजन विचारे त्यांना तुल्यबळ लढत देऊ शकतात. राजन विचारे ठाण्यातील एकमेव मोठे नेते आहेत, ज्यांनी ठाकरेंची साथ दिली आहे. ठाकरेंनी त्यांना पुन्हा लोकसभेच तिकीटही दिलं होतं. मात्र राजन विचारेंना त्यात पराभव स्वीकारावा लागला होता. शिंदेंच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनी राजन विचारे यांचा दीड लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. एवढंच नाही तर ठाणे विधानसभा मतदारसंघातूनही राजन विचारे ४५ हजारांपेक्षा जास्त मतांनी मागे होते. अशावेळी ही कसर भरून काढण्यात राजन विचारे यांची दमछाक होणार आहे. मात्र, मतदारसंघात असलेला कनेक्ट शिंदेच्या सेनेचा उमेदवार नसल्याने शिवसेनेच्या पारंपरिक मतांमध्ये विभाजन होण्याची कमी शक्यता या बाबींवर राजन विचारे यांची भिस्त असणार आहे. (Thane Assembly Constituency)
मात्र हि लढत दुरंगी नसणार आहे. मनसेने या मतदारसंघातून पुन्हा एकदा अविनाश जाधव यांच्यासारखा तुल्यबळ उमेदवार दिला आहे. या मतदारसंघात मनसेला मानणारा एक वर्ग राहिला आहे. अगदी २००९ मध्ये ही मनसेच्या उमेदवार इथे दुसऱ्या क्रमांकावर होता, आणि केवळ ३००० हजार मतांनी मनसेचे राजन राजे पराभूत झाले होते. २०१९ मध्येही मनसेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अविनाश जाधव यांनी ७२ हजार मतं घेतली होती आणि कोणतीही लाट नसताना मनसेचा उमेदवार केवळ २० हजार मतांनी मागे पडला होता. सतत आंदोलनाच्या मार्गातून चर्चेत राहणे, तरुण नेतृत्व, मतदारसंघातील स्थानिक कनेक्ट हि अविनाश जाधव यांची काही बलस्थानं आहेत. त्यातच राज ठाकरे यांनी या जागेकडे विशेष लक्ष दिलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंची एक तुडुंब भरलेली सभा अविनाश जाधव यांना मोठा आधार ठरू शकते. (Political News)
======
हे देखील वाचा : वरळी – माहीममध्ये ठाकरेपुत्रांचा विजय होणार का?
========
थोडक्यात, ठाणे विधानसभा मतदारसंघात हि निवडणूक तिरंगी असणार आहे. महत्वाचं म्हणजे, या तिन्ही उमेदवारांना आणि त्यांच्या पक्षांना या जागेवरून विजय हवाच आहे. कारण संजय केळकर यांच्या ताकदीवर भाजप अगदी ठाण्यातही शिवसेनेला आणि त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेलाही भिडत आहे. अशावेळी जर हि जागा निवडून आली नाही, तर एकनाथ शिंदे पुन्हा या जागेवर दावा करू शकतात. त्यामुळे ठाण्यातल्या अस्तित्वासाठी भाजपाला आणि शिवसेनेला हिट सीट हवी असणार. राजन विचारे यांच्यासाठी हि करो या मरोचीच लढत असणार आहे, कारण लोकसभेत राजन विचारेंचा पराभव झाला होता. अशावेळी, एकनाथ शिंदे यांच्यासारखेच आपणही तुल्यबळ आहोत, हे दाखवण्यासाठी ठाण्यात राजन विचारेंना हि शेवटची संधी असणार आहे. अविनाश जाधव हे सातत्याने चर्चेत असतात, पण निवडणुकीच्या रिंगणात त्यांना यश मिळवता आलेलं नाही. त्यातच सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागल्यास, अविनाश जाधव यांच्या निवडणुकीच्या राजकारणाला घर घर लागू शकते. त्यामुळेही अस्तित्वासाठी हे तिन्ही उमेदवार जिवाची बाजी लावताना दिसतील. या मतदारसंघातून कोणता उमेदवार निवडून येणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कोममेंट्स मध्ये नक्की सांगा. (Thane Assembly Constituency)