Home » Thackeray Unite : ठाकरे बंधू एकत्र पण खरी गोची पवार आणि काँग्रेसची?

Thackeray Unite : ठाकरे बंधू एकत्र पण खरी गोची पवार आणि काँग्रेसची?

by Team Gajawaja
0 comment
Thackeray Brothers Unite | Latest Marathi News
Share

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास फिक्सच झाल्याचं बोललं जात आहे. दोघांकडून तसे उघडपणे सिग्नलही दिले जात आहेत. सध्या हिंदी सक्तीच्या विरोधात राज व उद्धव ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. राज्य सरकारच्या त्या धोरणाविरोधात एकत्र येत मोर्चा काढण्याचा निर्धार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने व मनसेने केला होता. मात्र महायुती सरकारने मग जनतेपुढे नमते घेत हिंदी सक्तीच्या विरोधातील दोन्ही जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच राज्यभरातील मनसे व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले. याच्याच पुढे अजून एक पाऊल जात ठाकरे बंधू 5 जुलैला एकत्र येत विजयोत्सव साजरा करणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणूकांपासून या दोन्ही बंधूंचे पक्ष एकत्र लढू शकतात असं बोललं जात आहे. अशावेळी हे दोघं एकत्र आले तर राज्याचं राजकारण कसं बदलेल? यामुळे महायुती आणि महाविकासआघाडी या दोन्हींवर कसा फरक पडेल? जाणून घेऊ.  (Thackeray Unite)

तर अखेर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार हे आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनाच उद्धव ठाकरे गट ही नवी युती उदयास येईल. सध्या राज ठाकरे हे कोणत्याही युतीत नसल्याने ते कोणत्या मित्रपक्षाची साथ सोडून येणार नाहीयेत. मात्र उद्धव ठाकरेंचं तसं नाहीये उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी बरोबर आघाडीत आहे. त्यामुळे राज ठाकरेंबरोबर जाताना त्यांना अय आघाडीबाबत निर्णय घ्यावा लागेल. याचं पहिलं कारण म्हणजे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत येण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याची कोणतीही हिंट दिलेली नाहीये.

उलट ज्याप्रकारे राज ठाकरे यांची राजकीय कारकीर्द आणि विचारधारा राहिली आहे त्यानुसार राज ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याची शक्यता सध्यस्थितीत नाहीच्या बरोबर आहे. त्यामुळे मग राज ठाकरे की महाविकास आघाडी हा पर्याय उद्धव ठाकरेंना निवडावा लागेल. आणि ज्याप्रकारे उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांची बॉडी लँग्वेज राहिली आहे त्यानुसार उद्धव ठाकरेंनी जवळपास राज ठाकरे हाच पर्याय निवडल्याचं दिसतं. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडून ती पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी एवढ्यापुरतीच मर्यादित राहील असं जाणकार सांगतात. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या मिलनाचा पहिला परिणाम होऊ शकतो तो म्हणजे प्रमुख विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या महाविकास आघाडीत फूट. (Thackeray Unite)

या फुटाचा पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षावरही वेगळा परिणाम दिसू शकतो. सुरवात करू शरद पवारांपासून. शरद पवार यांनी शिवसेनेला सोबत घेऊन भाजपाला मजबूत असा पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर पहिले शिवसेना आणि त्यानंतर स्वतः पवारांच्या पक्षातच फूट पडली. त्यातच विधानसभा निवडणुकीत जो दारुण पराभव झाला त्यामुळे तर पक्षाची अवस्था अजूनच गंभीर बनली आहे. शरद पवारांच्या पक्षाचे अनेक आमदार आणि खासदार सत्तेत असलेल्या अजित दादा पवारांच्या पक्षाशी जवळीक साधून असल्याचं चित्र आहे. शरद पवार यांनी स्वतःही सत्तेत जाण्याची आमदारांची इच्छा असल्याचं मान्य केल आहे.

ज्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चाही झाल्या होत्या. त्यातच काँग्रेसला काही भविष्य आहे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात असल्याने सत्तेत जाण्याच्या मागणीला अजूनच बळ मिळू शकतं. अशावेळी जर सत्तेत जाण्याचा आणि अजित दादांशी हातमिळवणी करण्याचा पर्याय जर शरद पवारांनी निवडला तर पवारांनी अजित दादांचं नेतृत्व स्वीकारल्यावर शिक्कामोर्तब होईल आणि कारकिर्दीच्या अखेरच्या टप्यात मात खाल्याची सल शरद पवारांना बोचत राहू शकते. दुसरा पर्याय म्हणजे ठाकरे बंधू आणि शरद पवार असाही पर्याय होऊ शकतो. मात्र राज ठाकरेंनी शरद पवारांवर गेल्या काही वर्षात केलेल्या टीका पाहता सध्यातरी हा ऑप्शन तितकासा सोप्पा नाहीये. (Thackeray Unite)

Thackeray Brothers Unite

आत तिसरा मुद्दा म्हणजे काँग्रेसचं काय होणार? सध्या काँग्रेस नावाला का होइना पण राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे त्यामुळे आपली दोन नंबरची खुर्ची पक्ष राखून आहे. मात्र पक्षाला लागलेली गळती काय थांबत नाहीये. पक्षाकडे कोणता प्लॅनच नसल्याने अनेक जुने नेते पक्षाला राम राम करत आहेत. त्यातच जर महाविकास आघाडी फुटली तर काँग्रेस एकाकी पडू शकते आणि पुन्हा काँग्रेसच्या अस्तित्वा वर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने काँग्रेसला सत्तेऐवजी विरोधी पक्षाच्या स्थानसाठीच संघर्ष करावा लागेल. महत्वाचं म्हणजे या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याने राजकीय मुद्देही बदलतील. मराठीचा मुद्दा जेव्हा येईल तेव्हा राष्ट्रीय पक्ष असलेली काँग्रेस आपोआपच बॅकफूटला जाईल. त्यातच उत्तर भारतातला मतदार राखायचा असल्याने काँग्रेस मनसे शिवसेना उबाठा युतीबरोबर जाऊही शकणार नाही. त्यातच मराठीच्या मुद्यावर जनमत जर ठाकरेंच्या मागे उभा राहणार असेल तर काँग्रेसकडे दुसरे पर्यायी मुद्दे आहेत का? याबाबत ही साशंकता आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणाच्या या नाट्यमय घडामोडीत काँग्रेसला पुन्हा एकदा फटकाच बसणार आहे.

आता येऊ महायुतीकडे. महायुतीत सध्या भाजपा ठाकरे बंधूंच्या निशाण्यावर आहे. हिंदीच्या मुद्यावर भाजपा जरी बॅकफूटला गेली असली तरी भाजपाने या दोघांशी लढण्याची पुरेपूर तयारी केल्याचं दिसतं. महत्वाचं म्हणजे भाजपाची सातत्याने वाढत जाणारी ताकद, सततचे पक्षप्रवेश आणि त्यामुळे होणारा पक्ष संघटनेचा विस्तार ही भाजपसाठी जमेची बाजू असणार आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंचा करिष्मा तात्काळ भाजपाला आव्हान देईल, असं म्हणणं धाडसी ठरेल.

मात्र महायुतीतल्या दुसऱ्या पक्षासाठी वाट खडतर होऊ शकते तो पक्ष म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना. एकनाथ शिंदे सध्या शिवसेना कशी त्यांचीच आहे याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जेव्हा ठाकरे आणि तेही मराठीच्या मुद्यावर एकत्र असं जेव्हा होईल तेव्हा पक्षाचं कॅडर. मतदार ठाकरे बंधूंच्या मागे जास्त जाईल हे उघड आहे. ठाकरे एकत्र आल्यावर शिवसेनाच हक्क सांगणंही एकनाथ शिंदेंना सोप्पं राहणार नाही. त्यातच शिवसेना फोडल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे या दोन्ही बंधूंचे सॉफ्ट टार्गेटही राहू शकतात. सोबतच भाजपने हिंदीसाठी सॉफ्ट कॉर्नर दाखवण्यासारखे मुद्दे उचलून धरले तर एकनाथ शिंदेंच्या अडचणीत अजूनच वाढ होऊ शकते. (Thackeray Unite)

=================

हे देखील वाचा :  Narendra Modi : अभिमानास्पद! पंतप्रधान मोदींना मिळाला घानाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान

=================

मुंबई महानगरपालिकेचंच उदाहरण घ्यायचं झाल्यास भाजप मराठी मतदारांना हिंदू कार्डने सोबत घेताना उत्तर भारतीय मतदारांनाही अपील करण्याचा प्रयत्न करेल अशावेळी एकनाथ शिंदे केवळ मराठी कार्ड कसं खेळणार असा प्रश्न असेल.त्यामुळे महायुतीच्या पक्षांमध्ये ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा फटका बसू शकतो. (Thackeray Unite)

महायुतीतल्या तिसऱ्या पक्षाचा विचार करता अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मतदारच वेगळा असल्याने त्यांना थेट फटका बसेल का? याचं उत्तर सध्यातरी क्लियर नसेल. मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी जर शरद पवारांची साथ सोडली तर मात्र मग शरद पवारांवर अजित दादांसोबत जाण्यासाठीचा दबाव वाढेल आणि आधी आपण बोललो तसं काका पुतण्याच्या लढाईत शेवटी पुतण्याचं जिंकल्याचं चित्र निर्माण होऊ शकतं. मात्र त्याचवेळी जर उद्धव ठाकरे – राज ठाकरे आणि शरद पवार असं कॉम्बिनेशन समोर आलं तर मात्र अजित दादा पवारांसमोरील अडचणी वाढू शकतात. थोडक्यात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलटफेर होईल हे मात्र नक्की.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.