Home » Bijnor Gang : बॉलिवूडमध्ये बिजनौर गॅंगची दहशत !

Bijnor Gang : बॉलिवूडमध्ये बिजनौर गॅंगची दहशत !

by Team Gajawaja
0 comment
Bijnor Gang
Share

बिजनौर हे उत्तर प्रदेशातील मुरादाबाद विभागाच्या उत्तर-पश्चिम काठावर वसलेले शहर आहे. बिजनौर शहर हे बिजनौर जिल्ह्याचे मुख्यालयही आहे. पण याच शहराच्या नावानं सध्या बॉलिवूडमध्ये दहशतीची वातावरण आहे. त्याला कारण ठरली आहे, ती येथील बिजनौर गॅंग. ही बिजनौर गॅंग अपहरण करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. या गॅंगचे लक्ष कोणी व्यापारी वा राजकीय व्यक्ती नसून त्यांनी आत्तापर्यंत बॉलिवूडमधील कलाकारांना आपले लक्ष केले आहे. हे कलाकार दुस-या आणि तिस-या फळीतील असतात. एखाद्या कार्यक्रमाचे अमिष दाखवून या बिजनौर गॅंगचे सदस्य त्यांच्याबरोबर संवाद साधतात आणि मग हे कलाकार त्यांच्या जाळ्यात आले की त्यांचे अपहरण करत त्यांच्याकडून मोठी रक्कम मिळवत आहेत. या गॅंगचा बिमोड करण्यासाठी उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं कडक पावले टाकली आहेत. त्यातील एक-दोन सदस्यांना अटकही केली आहे. पण अद्यापही या गॅंगचा म्होरक्या पोलीसांच्या हाती न मिळाल्यामुळे बॉलिवूडमधील गॅंगची दहशत कायम आहे. (Bijnor Gang)

या बिजनौर गॅंगची महिती अभिनेते मुश्ताक खान यांच्या अपहरणानंतर अधिक बाहेर आली. काही दिवसापूर्वी कॉमेडियन सुनील पाल यांचेही एका धाब्यावरुन अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर पोलीसांनी तातडीनं तपास करीत तीन आरोपींनी अटक केली. हे आरोपी बिजनौर येथील होते. त्यांची चौकशी केल्यावर या गॅंगने आत्तापर्यंत अनेकांचे अपहरण करत त्यांच्याकडून पैसे उकळल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र अभिनेते मुश्ताक खान यांच्या अपहरणानंतर या बिजनौर गॅंगची काम करण्याची पद्धत उघड झाली. आणि बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली. कारण यापूर्वीही अशा अनेक अभिनेत्यांकडून या बिजनौर गॅंगनं पैसे उकळल्याचा अंदाज आहे. मात्र हे अभिनेते अधिक बदनामी नको, म्हणून गप्प राहिल्याचा अंदाज आहे. मुश्ताख खान यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणावर एक व्हिडिओ बनवत सावधानतेचा इशारा दिला आहे. (Latest Updates)

बिजनौर गॅंग बॉलिवूडमधील दुय्यम दर्जाच्या कलाकारांना आपल्या जाळ्यात ओढत आहे. या गॅंगमधील सदस्य एका कार्यक्रमाची आखणी करतात. त्याचे पोस्टरही छापले जातात. मग यातून अभिनेत्याला संपर्क साधला जातो. अभिनेत्याची खात्री पटावी म्हणून त्याच्या खात्यात काही आगाऊ पैसेही जमा केले जातात. शिवाय येण्याजाण्याचे विमानाचे वा रेल्वेचे तिकीटही दिले जाते. या अभिनेत्याला मग नेण्यासाठी विमानतळावर गाडी पाठवली जाते. या गाडीतून अभिनेत्याला नेत असतांना काही अंतरावर गाडी बदलली जाते. विमानतळावर असलेल्या सीसीटिव्हीवरुन गाडीची ओळख पटू नये म्हणून ही काळजी घेतली जाते. (Bijnor Gang)

गाडी काही अंतर पार करुन गेल्यावर मग काही कारण सांगून त्या अभिनेत्याला अन्य गाडीत बसवण्यात येते. या दुस-या गाडीनं काही अंतर पार केल्यावर मग त्या गाडीमध्ये गॅंगमधील अन्य सदस्य बसतात आणि मग अभिनेत्याला त्याचे अपहरण झाल्याचे सांगण्यात येते. येथून मग त्याच्याजवळचे सर्व पैसे, मोबाईल नंबर आणि क्रेडिट कार्डही काढून घेतले जाते. अशाच प्रकारे काम करत बिजनौर गॅंगनं अन्य दोन अभिनेत्यांनाही लाखोचा गंडा घातल्याची माहिती आहे. असेच अभिनेते मुश्ताक खान यांचे 20 नोव्हेंबर रोजी अपहरण करण्यात आले होते. मेरठ आणि मुझफ्फरनगरच्या खतौलीमध्ये मोबाईल फोनद्वारे त्यांना ऑनलाइन पेमेंट करण्यात आले होते. त्यावर विश्वास ठेवून मुश्ताक खान बिजनौरला आले आणि अपहरकर्त्यांच्या जाळ्यात सापडले. त्यांना बिजनौरच्या चाहशिरी येथे ठेवण्यात आले होते. बदमाशांनी मुश्ताक यांच्या क्रेडिट कार्डमधून 25 हजार रुपयांची रोकड काढली. (Latest Updates)

====================

हे देखील वाचा : 

America : अमेरिका यातही नंबर वन !

Uttar Pradesh : महाकुंभमध्ये 12 ज्योतिलिंग !

====================

या बदमाशांनी राजेश पुरी यांनाही चांगलेच गंडावले असल्याची माहिती आहे. तसेच अभिनेते शक्ती कपूर यांच्याबरोबरही त्यांचा संपर्क झाला असल्याची माहिती आहे. मात्र कपूर यांनी अधिक रकमेची मागणी केल्यामुळे ही बोलणी फिस्कटली आणि शक्ती कपूर हे अपहरणकर्त्यांच्या तावडीमधून सुटले. अशाच पद्धतीनं कॉमेडियन सुनील पाल यांचे अपहरण झाले होते. या प्रकरणी उत्तरप्रदेश पोलीसांनी बिजनौर गॅंगच्या चारजणांना अटक केली असली तरी गॅंगचा प्रमुख आणि त्याचे सहा साथीदार फरार आहेत. आता उत्तरप्रदेशचे पोलीस बॉलिवूडमधील अन्य कुठल्या कलाकाराला या बिजनौर गँगनं गंडा घातला आहे, याचा शोध घेत आहेत. (Bijnor Gang)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.