उत्तरप्रदेशच्या मेरठ कोतवाली परिसरात सुमारे तीन हजार वर्षे जुने असलेल्या चंडीदेवी मंदिरात (Chandee Devi Temple) गर्दी पाहायला मिळते. सर्वइच्छा पूर्ण करणा-या या देवीची मुर्ती रावणाची पत्नी मंदोदरी हीने स्वतःच्या हाताने तयार केल्याची माहिती आहे. देवीची भक्त असलेल्या मंदोदरीने मंदिराची स्थापना स्वतः केली होती आणि देवीची मुर्ती आपल्या हातांनी तयार करुन मंदिरात देवीची स्थापना केली. या मंदिरात रोज पुजेसाठी येणे सुलभ व्हावे म्हणून मंदोदरीने आपल्या महालापासून मंदिरापर्यंत एक मोठी गुहाही खोदली होती.आताही मेरठच्या नौचंडी मैदानाजवळ असलेल्या या प्राचीन श्री चंडी माता मंदिराच्या परिसरात या वास्तुचे पौराणिक महत्त्व सांगणा-या खुणा आहेत. पुढे या मुळ मंदिराची मुघलांच्या काळात खूप हानी झाली. नंतर येथे नवीन मंदिर उभारण्यात आले. मात्र मुर्ती मुळ आहे. याच मंदिरासमोर आता बलेमियॉंची कबर आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठीही हे मंदिर प्रसिद्ध आहे.
उत्तरप्रदेशच्या मेरठमधील नौचंडी मैदानाजवळ असलेले प्राचीन श्री चंडी माता मंदिर(Chandee Devi Temple) हिंदु-मुस्लिम ऐक्याचे उदाहरण आहे. रामायण काळातील या मंदिरातील चंडी मातेची अष्टधातू मूर्ती रावणाची पत्नी मंदोदरीने तयार केली आहे. मंदोदरीची भक्ती या देवीवर होती. देवीची नित्यनियमानं पुजा करण्यासाठी मंदोदरीनं आपल्या महालापासून मंदिरापर्यंत सुमारे चार किलोमीटरची गुहा तयार केली होती. याच गुहेतून मंदोदरी पुजेसाठी मंदिरात येत असे. काही वर्षापूर्वी या भागात खोदकाम झाले, त्यावेळी या गुहेचे पुरावेही मिळाले. रावणाची पत्नी मंदोदरी ही मयदानवाची कन्या होती. मायदानवाने आजचे मेरठ हे शहर वसवले होते. त्याचे मुळ नाव मायाराष्ट्र होते. शिवपार्वती भक्त असलेल्या मंदोदरीने तेव्हाच इथे चंडीदेवीचे मंदिर बांधले. त्याचवेळी मंदोदरीनं येथे बिल्वेश्वर नाथ मंदिराचीही उभारणी केली.
आता या चंडी माता मंदिरात नाग देव, पृथ्वी माता, श्रीगणेश, भगवान हनुमान यांच्या मूर्तीही असून त्या प्राचीन आहे. पुरातनवास्तू विभागानंही या मुर्तींना विशेष दर्जा दिला आहे. सध्या या मंदिराचे महंत म्हणून महेंद्रकुमार शर्मा काम बघतात. शर्मा यांचे कुटुंब पिढ्यानपिढ्या मंदिरात सेवा करत आहे. या चंडी मातेचे हात रक्ताने माखलेले असल्याचे महंत सांगतात. पौराणिक कथांनुसार रक्तबीज या राक्षसाचा वध करण्यासाठी देवीने चंडीचे रूप धारण केले. रक्तबीजच्या नाशाच्या वेळी माता चंडीने काली मातेचे आवाहन केले. रक्तबीजाचा नाश केल्यावर मातेचे हात त्याच्या रक्तानं रंगून गेले. अशाच उग्र स्वरुपातील मातेचे इथे पुजा होते. मंदिरात चंडी मातेचे हे रूप दर्शवणारी मुर्ती अष्टधातूची आहे. या चंडी मातेला रक्तबीज संहारिणी असेही म्हणतात.या मंदिराचा इतिहासही रक्तरंजित असाच आहे.(Chandee Devi Temple)
मंदिराचे महंत महेंद्र कुमार शर्मा सांगतात की, मंदोदरीने बांधलेल्या प्राचीन मंदिरावर सुमारे एक हजार वर्षांपूर्वी, मुघल काळात कुतुबुद्दीन ऐबकचा सेनापती बले मियाँ याने हल्ला केला. त्यावेळी मंदिराचे पुजारी पंडित हजारीलाल होते. मंदिराच्या रक्षणासाठी आठवडाभर जाट आणि मुघल सैन्यामध्ये युद्ध झाले. पण या सैन्यासमोर कोणाचाही निभाव लागला नाही. आक्रमणकर्त्यांनी चंडीमातेची मूर्ती नष्ट करण्याआधीच पुजार्यांनी मातेची मुर्ती आपल्या घरात लपवून ठेवली. जेव्हा मुघल सैन्य ही मुर्ती नष्ट करण्यासाठी आले तेव्हा त्यांना मुळ मुर्ती नसल्याचे लक्षात आले. त्यांनी मुर्तीसाठी पुजाऱ्याच्या घरावर हल्ला केला. येथे पुजार्याची कन्या मधु चंडीबाला ही देवीच्या रक्षणासाठी हातात तलावार घेऊन मुघल सैन्यावर चालून गेली. या युद्धात शूर मधु चंडीबालानं बलेमियॉंचे बोट कापले. मात्र या युद्धात चंडीबालाचाही मृत्यू झाला. पुढे मंदिराची पुन्हा निर्मिती करण्यात आली आणि तिथे मातेची मुर्ती स्थापन करण्यात आली. आणि मंदिरसमोरच बालेमियॉंनची कबर बांधली गेली.चंडीदेवी मंदिराची(Chandee Devi Temple) स्थापना झाल्यापासून येथे दोनवेळा जत्रा भरते. होळीच्या एका आठवड्यानंतर एकदा जत्रा भरते. पूर्वी ती तीन दिवस भरायची, आता ही जत्रा महिनाभर असते. यावेळी 2076 वा मेळावा पार पडला, असे मंदिराच्या पुजा-यांनी सांगितले, यावरून हे मंदिर आणि जत्रा किती प्राचीन आहे हे समजू शकते. मंदिरात नवरात्रीनिमित्तही नऊ दिवस मोठा यात्राउत्सव भरतो. मंदिराचे विद्यमान महंत महेंद्रकुमार शर्मा यांच्या आधी त्यांचे पूर्वज येथे पूजा करत आले आहेत. पंडित रामचंद्र शर्मा, पंडित भगवती प्रसाद, पंडित खराती लाल, चंडी प्रसाद, पंडित फकिरी राम, पंडित सीता राम यांनी येथे सेवा केली आहे. सध्याचे पंडित महेंद्र कुमार हे स्वतः ८२ वर्षांचे असून आजही मंदिराची देखभाल करत आहेत.
========
हे देखील वाचा :दगडांच्या रचनेने उभारलेल ‘हर्षद माता मंदिराची’ खासियत ….
========
चंडी माता मंदिरात(Chandee Devi Temple) देवी जागरण होते आणि बलेमियॉंची कबर जेथे आहे तिथे उर्स, कव्वाली आयोजित केली जाते. उर्स, कव्वाली आणि जागरण एकत्र असताना आजपर्यंत कधीही हिंदू-मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण झाली नाही, असे स्थानिक अभिमानाने सांगतात. मुख्य पुजारी पंडित महेंद्र कुमार शर्मा सांगतात की, देवी चंडीदेवी सर्वांच्या मनोकामना पूर्ण करते, भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्या-या या चंडीदेवी मंदिरात म्हणूनच भक्ताची गर्दी वाढत आहे.
सई बने