Home » Tamil-Brahmi Inscriptions : इजिप्तमध्ये सापडले तमिळ ब्राह्मी शिलालेख…

Tamil-Brahmi Inscriptions : इजिप्तमध्ये सापडले तमिळ ब्राह्मी शिलालेख…

by Team Gajawaja
0 comment
Share

हजारो वर्षापासून भारत हा जगभर व्यापार करत आहे. इसवी सनच्या पहिल्या शतकाच्या आसपास भारत आणि इजिप्तमधील व्यापार प्रामुख्याने हिंद महासागरातील समुद्री मार्ग आणि लाल समुद्राच्या बंदरांमधून होत असे. दोन हजार वर्षापूर्वी भारताबरोबर व्यापार करणा-या इजिप्तमध्ये रोमन साम्राज्य होते. यामध्ये भारतातून मसाल्याच्या पदार्थांना इजिप्तमध्ये मोठी मागणी होती. शिवाय उत्तम सुती कापड, रेशीम, माणिक, हिरे, मोती आणि हस्तिदंताचीही मोठ्या प्रमाणात निर्यात होत असे. याबदल्यात इजिप्तमधून भारतात ऑलिव्ह तेल, वाइन, काचेची भांडी आणि चांदीची नाणी भारतात आयात होत असत. हजारो वर्षापूर्वी समृद्ध व्यापारानं या दोन्ही देशांचे बंध जुळले होते. त्याकाळी इजिप्तमधील अलेक्झांड्रिया हे व्यापाराचे सर्वात मोठे केंद्र होते. तर भारताच्या गुजरात आणि मुझिरीस या केरळमधील प्रमुख बंदरांवर इजिप्तमधील व्यापारी जहाजे येत असत. ( Tamil-Brahmi Inscriptions )

आता दोन हजार वर्षानंतर या दोन देशातील व्यापारावर शिक्कामोर्तब करणारी एक बातमी आली आहे. इजिप्तच्या रॉयल व्हॅलीमध्ये तमिळ ब्राह्मी शिलालेख सापडले असून यामधून प्राचीन व्यापारी संबंधांवर अधिक प्रकाश पडला आहे. भारताप्रमाणे इजिप्तची संस्कृतीही हजारो वर्ष जुनी आहे. हे दोन्ही देश व्यापार आणि संस्कृतीच्या माध्यमातून एकमेकांशी हजारो वर्षापासून जोडले गेलेले आहेत. आता याचे नव्यानं पुरावे मिळाले आहेत. इजिप्तमधील एका राजाच्या थडग्याचे उत्खनन चालू असतांना त्यात हजारो वर्षापूर्वीच्या भारतसोबतच्या व्यापाराच्या खाणाखुणा सापडल्या आहेत. इजिप्तमधील राजाच्या थडग्याच्या प्रवेशद्वारावर तमिळ ब्राह्मी शिलालेख सापडला आहे. यातून या दोन देशांचे संबंध अत्यंत मैत्रीपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्राचीन तमिळ युग, भारताचे इतर भाग आणि रोमन साम्राज्य यांच्यातील व्यापारी संबंधांवर एका अभूतपूर्व शोधाने नवीन प्रकाश पडला आहे. विशेष म्हणजे, एखाददुसरा शिलालेख येथे मिळालेला नाही. तर तमिळ, ब्राह्मी, प्राकृत आणि संस्कृतमध्ये लिहिलेले जवळजवळ ३० शिलालेख आहेत. हे शिलालेख पहिल्या ते तिसऱ्या शतकातील असल्याची माहिती आहे. यामध्ये भारत आणि इजिप्तच्या व्यापार, सांस्कतृतिक संबंधाची उहापोह कऱण्यात आलेला आहे. २०२४ आणि २०२५ मध्ये पॅरिसमधील फ्रेंच स्कूल ऑफ एशियन स्टडीज चे प्राध्यापक चार्लोट श्मिड यांनी यासंदर्भात संशोधन केले आहे. त्यांच्यासोबत स्वित्झर्लंडमधील लॉसाने विद्यापीठाचे प्राध्यापक इंगो स्ट्रॉच यांनीही या शिलालेखांचा अभ्यास केला. ( Tamil-Brahmi Inscriptions )

श्मिड आणि स्ट्रॉच यांच्या नेतृत्वाखाली काम करणा-या पथकाने थेबन नेक्रोपोलिसमधील सहा थडग्यांमध्ये शोध घेतला. मनोरंजक म्हणजे, हे थडगे मूळतः इ.स.पूर्व १६०० च्या सुमारास बांधले गेले. नंतर वेगवेगळ्या देशांतील लोक त्यांना भेट देत असत आणि त्यांची नावे तिथे कोरत असत. याच थडग्यात तीसहून अधिक शिलालेख आढळून आले. यामध्ये संस्कृत भाषा असल्यामुळे हे शिलालेख भारतासंदर्भात आहेत, याची प्राथमिक माहिती संशोधकांना मिळाली. नंतर त्यांचा अभ्यास केल्यावर त्यात तमिळ, ब्राह्मी भाषांमधूनही लिहिल्याचे स्पष्ट झाले. एका संस्कृत शिलालेखात उल्लेख आहे की पश्चिम भारतावर राज्य करणाऱ्या क्षहरत राजवंशाच्या एका दूताने इसवी सनाच्या पहिल्या शतकात या स्थळाला भेट दिली होती. या शिलालेखांवर आंतरराष्ट्रीय परिषदेत “फ्रॉम द व्हॅली ऑफ द किंग्ज टू इंडिया: इजिप्तमधील भारतीय शिलालेख” हा शोधनिबंधही सादर करण्यात आला आहे. यातून भारतीय उपखंडाच्या वायव्य, पश्चिम आणि दक्षिणेकडील प्रदेशातून आलेल्या भारतीय व्यापा-यांनी हे शिलालेख लिहिल्याचे सांगण्यात आले आहे.

=======

हे देखील वाचा : Kadu Malleshwara Temple : कडू मल्लेश्वर मंदिरातील नंदीधारेचे रहस्य

=======

या शिलालेखांमध्ये चिकाई कोरन हे नाव अनेकवेळा आढळून आले आहे. त्याचा संस्कृत अर्थ शिखर किंवा मुकुट आहे. कोरन या शब्दाचा अर्थ तमिळमध्ये विजय आणि वध अशा अर्थाने घेतला जातो. इजिप्तमधील इतर शोधांमध्येही कोरन हे नाव सापडले आहे. १९९५ मध्ये लाल समुद्रातील बेरेनिके बंदर शहरात सापडलेल्या कोरनपुमन या मातीच्या भांड्याच्या तुकड्याही असेच नाव आढळून आले आहे. हे नाव संगम ग्रंथांमध्ये आहे. त्यात चेरा राजा पित्तनकोरन यांना कोरन असे संबोधले जाते. यावरुन बहुतांश दक्षिणेकडील व्यापारी नियमीत इजिप्तला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. दक्षिमेकडील मसाल्याच्या पदार्थांना इजिप्तमध्ये मोठी मागणी होती, त्याबदल्यात इजिप्तमधून चांदिचे दागिने भारताच्या दक्षिण प्रांतात आणले जात होते, असाही उल्लेख या शिलालेखांमध्ये आहे. आता हा शोध लागल्यावर प्राध्यापक श्मिड आणि प्राध्यापक स्ट्रॉच यांनी तामिळनाडू सरकारकडेही संपर्क साधला आहे. त्यातून या दोन देशांमधील व्यापार आणि संस्कृतीच्या खाणाखुणा अधिक उलगडण्याची शक्यता आहे. ( Tamil-Brahmi Inscriptions )

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.