Home » तहव्वूर राणाला भारतात आणणार…

तहव्वूर राणाला भारतात आणणार…

by Team Gajawaja
0 comment
Tahavur Rana
Share

मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी असलेल्या तहव्वूर राणाला (Tahavur Rana) भारतात आणले जाणार आहे. सर्व मुंबईलाच नाही तर जगाला हादरवणा-या या हल्ल्यात 166 निर्दोष नागरिकांचा बळी गेला होता. या हल्ल्यातील आरोपींना तहव्वूर राणानं मदत केली होती. तहव्वूर या हल्ल्यानंतर परदेशात पळून गेला होता. त्याला आणण्यासाठी गेले काही वर्ष भारतातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. राणा (Tahavur Rana) अमेरिकन तुरुंगात आहे. आता त्याला भारतात आणण्यासाठी अमेरिकन कोर्टानं  मंजूरी दिली असून राणा भारतात आल्यावर या हल्ल्याबाबत पडद्याआड असलेले आणखी काही पुरावे समोर येणार आहेत. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या या हल्ल्यानं भारताचे मोठे नुकसान झाले होते.  

2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी फरार असलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती तहव्वूर राणा आता भारत सरकारच्या ताब्यात येणार आहे. राणाला भारताकडे प्रत्यार्पण करण्यास कॅलिफोर्नियातील अमेरिकन न्यायालयाने परवानगी दिली आहे. 10 जून 2020 रोजी भारताने 62 वर्षीय राणाला भारताच्या ताब्यात द्यावे यासाठी मागणी करण्यात आली. त्यानंतर बायडेन प्रशासनाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला पाठिंबा दिला आणि त्याला मान्यता दिली.(Tahavur Rana)  

राणानं गंभीर गुन्हा केला असून त्यानं केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळण्यासाठी त्याला भारताच्या ताब्यात देणे गरजेचे असल्याचे मत न्यायालयानं नोंदविले आहे. 62 वर्षीय उद्योगपती असलेला हा राणा प्रत्यार्पण करण्यायोग्य असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी, मुंबईतील भीषण दहशतवादी हल्ल्यातील त्याची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे भारतांनं अमेरिका प्रशासनाकडे त्यासंदर्भात पुरावे सादर केले आणि राणाला अटक करण्याची विनंती केली होती.(Tahavur Rana)  

राष्ट्रीय तपास संस्थेने राणाला राजनैतिक माध्यमांद्वारे भारतात आणण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या 26/11 च्या हल्ल्यातील राणाच्या भूमिकेची एनआयएकडून चौकशी सुरू आहे.  मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह एकूण 166 निर्दोष नागरिकांचा मृत्यू झाला होता. हे हल्ले करणारे पाकिस्तानी दहशतवादी होते.  त्यांना पाकिस्तानात या हल्ल्यासाठी रितसर प्रशिक्षण देण्यात आले होते. मुंबईतील ताज हॉटेल, रेल्वे स्थानकासह अन्य महत्त्वाच्या ठिकाणी हे हल्ले 60 तासांहून अधिक काळ सुरू होते.  या हल्लासाठी मदत करणारे दहशतवादी अजूनही पाकिस्तानमध्ये मोकळे आहेत.  प्रत्यक्ष हल्ल्यातील दहा आरोपींपैकी एक असलेला अजमल कसाब हा दहशतवादी जिवंत पकडला गेला.  बाकीचे नऊ दहशतवादी मारले गेले.  जिवंत पकडलेल्या अजमल कसाबवर खटला चालवण्यात आला.  त्यानं पाकिस्तानात कशाप्रकारे या हल्ल्यासंबंधी प्रशिक्षण दिले आणि हल्ल्यासाठी कोणी मदत केली याची माहिती दिली.  अजमल कसाब याला 21 नोव्हेंबर 2012 रोजी फाशी देण्यात आली होती.  आता त्याच हल्ल्यासाठी मदत करणा-या राणाला भारतात आणले जाणार आहे. तहव्वूर राणा (Tahavur Rana) हा मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड हेडलीचा बालपणीचा मित्र आहे.  हेडली हा  लष्कर-ए-तैयबाचा हस्तक म्हणूनही काम करत आहे.  राणानं हेडलीला आर्थिक मदत केल्याचं स्पष्ट झालं आहे. राणा (Tahavur Rana)या हल्यमागील घटनांचा प्रमुख साक्षीदार आहे.  हल्याचा मास्टरमाईंड हेडली हल्ल्यापूर्वी एक पर्यटक म्हणून भारतात येऊन गेला होता.  त्यानं मुंबईमधील सर्व पर्यटन स्थळांना भेट देऊन त्यांचे फोटो काढले होते. त्यामुळे त्याच्या या हल्ल्याच्या योजनेमध्ये आणखी कोण कोण होते, याची पूर्ण माहिती राणाकडे आहे.  

======

हे देखील वाचा : वॉर झोन : युक्रेन युद्धावर डॉक्युमेंटरी

======

हेडली हल्ल्याबाबत कोणाला भेटत होता. कोण त्याला मदत करत होते हे राणाला माहीत आहे. राणा हा या संपूर्ण कटाचा एक भाग असून दहशतवादी हल्ल्यासाठी निधी पुरवण्याचा गुन्हा त्याने केला असण्याची शक्यताही अमेरिकन सरकारनं व्यक्त केली आहे.  राणा एवढा निडर आहे की त्यानं मुंबई  हल्ल्यात मारल्या गेलेल्या नऊ दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराचा सर्वोच्च नागरी सन्मान, निशान हैदर देण्यात यावा असा आग्रह धरला होता.  राणा हा या हल्ल्यामुळे सुखावल्याचे स्पष्टीकरण अमेरिकन कोर्टानं दिले आहे.  तो पाकिस्तानमधील दहशतवाद्यांबरोबर थेट संपर्क साधत असे. या राणाकडे (Tahavur Rana) अनेक दहशतवाद्यांची माहिती असून अत्यंत निर्ढावलेला हा राणा आता भारत सरकारच्या ताब्यात सापडणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.