Home » २ ऑक्टोबरपासून ताडोबा व्याघ्र प्रकल्प होणार सुरु

२ ऑक्टोबरपासून ताडोबा व्याघ्र प्रकल्प होणार सुरु

by Jyotsna Kulkarni
0 comment
Tadoba Tourism
Share

फिरण्याचे वेड सगळ्यांनाच असते. कोणाला समुद्र किनारी जायला आवडते तर कोणाला दरी खोऱ्यात वेळ घालवायला आवडतो. फिरण्यासाठी सगळेच प्लॅनिंग करताना देश विदेशातल्या ठिकाणांचा देखील विचार करतात. समुद्र आणि डोंगर यांसोबतच अजून एका ठिकाणी आपण फिरायला जाऊ शकतो. ते ठिकाण म्हणजे आपल्या देशातील राष्ट्रीय उद्याने. जंगली प्राणी, पक्षी हे सर्व आपली संपत्ती आहे. आपण फक्त यांच्याबद्दल वाचतो, ऐकतो मात्र यांना प्रत्यक्ष अनुभवण्यास राष्ट्रीय उद्याने असतात.

देशात परदेशात आपण विविध राष्ट्रीय उद्यानांना भेटी देऊन आपण या सर्व प्राण्यांना जवळून बघू शकतो. त्यांना अनुभवू शकतो. हा देखील एक अतिशय सुखद आणि कायम स्मरणात राहणार अनुभव असतो. आपल्या देशातील राष्ट्रीय उद्यानांबद्दल बोलायचे झाल्यास, आपल्याकडे अनेक लहान मोठे जग प्रसिद्ध असे राष्ट्रीय उद्याने आहेत. यासर्वांमधे नेहमीच चर्चेत असणारे उद्यान म्हणजे ‘ताडोबा’ राष्ट्रीय उद्यान. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील एक प्रमुख व्याघ्र प्रकल्प आहे.

वाघांसाठी ताडोबा हे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान असून ते विदर्भातील चंद्रपूर जिल्हयात आहे. या उद्यानाची स्थापना १९५५ साली झाली. हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानात आढळणाऱ्या मगरी, सुसरी आणि गवा हे इथले मुख्य वैशिष्ट्य आहे. या प्रकल्पात ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचा ११६.५५ किमी क्षेत्र आणि अंधारी अभयारण्याचे ५०८.८५ किमी क्षेत्र संयुक्तपणे आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे ६२५ चौरस किमी इतके आहे.

Tadoba Tourism

ताडोबा हा भारतात असलेल्या एकूण ५४ व्याघ्रप्रकल्पांपैकी एक मुख्य व्याघ्रप्रकल्प आहे. हे बांबूचे घनदाट जंगल असुन ते पूर्व महाराष्ट्रातील विदर्भात आहे. हे जंगल म्हणजे भारतात आढळणाऱ्या रॉयल बंगाल टायगरचे मुख्य आणि अतिशय जुने नैसर्गिक निवासस्थान आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आपण वाघाला पहाण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता. ताडोबात सर्व ऋतूंचे स्वतःचे एक वेगळे सौंदर्य आहे. परंतु तरीही नोव्हेंबर ते मार्च पर्यंत तुम्ही कधीही ताडोबा सहल प्लॅन करू शकता.

ह्या वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानाला भारत सरकारचा वनसंवर्धन विभाग संरक्षित करतो. हे संपूर्ण जंगल १,७५० चौ.कि.मी. मध्ये पसरलेले असून, जंगलामध्ये प्रवेश करण्यासाठी सर्व बाजूनी या जंगलाला एकूण १९ प्रवेशद्वार आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प हा भारतातील एक मुख्य आणि महाराष्ट्रातील सर्वात जुना व सर्वात मोठा व्याघ्रप्रकल्प आहे. हा प्रकल्प चंद्रपूरपासून ३४ कि.मी. अंतरावर आहे आणि नागपूर शहरापासून सुमारे १५० कि.मी. आहे.

ताडोबा अभयारण्यात सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी आणि पक्षी भरपूर आढळतात. वाघांसोबतच या उद्यानात भारतीय बिबट्या, पट्टेदार हायना, जंगली मांजरी, बार्किंग डियर, सांबर, ठिपकेदार हरण, दलदलीची मगर, भारतीय कोब्रा, भारतीय अजगर, मोर, क्रेस्टेड सर्प ईगल आणि इतर प्राणी देखील आहेत. या उद्यानात साग, ऐन, तेंदू, हिरडा, महुआ मधुका, कराया डिंक, अर्जुन आणि बांबू या सर्वात जास्त सापडणाऱ्या वनस्पती आहेत.

दरम्यान ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प १ जुलैपासून बंद करण्यात आले होते. आता पावसाळी सुट्टी संपल्याने येत्या बुधवारपासून ताडोब्याचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहेत. यंदा ताडोबा अभयारण्य येत्या १ ऑक्टोबरपासून खुले होणार आहे. दरवर्षी हजारो लोक याठिकाणी भेटी देत वाघाला प्रत्यक्ष बघण्याचा अनुभव घेत असतात. हे अभयारण्य दर मंगळवारी बंद असते. तर दररोज सकाळी ६ ते १० (रात्री 8 वाजेपर्यंत प्रवेश) आणि दुपारी ३ ते ६ (सायंकाळी 4.30 पर्यंत प्रवेश) सफारी आयोजित केली जाते.

========

हे देखील वाचा : महाराष्ट्रातल्या जागृत साडे शक्तिपीठांची माहिती

========

ताडोबा राष्ट्रीय उद्यानापासून चंद्रपूर ४९ किमी आणि नागपूर १५१ किमी ही अगदी जवळची रेल्वे स्थानके आहेत. तर दुसरीकडे नागपूर विमानतळ ताडोबापासून हे १४० किमी अंतरावर असून, हे ताडोबा राष्ट्रीय उद्यानाच्या सर्वात जवळचे विमानतळ आहे. या विमानतळावरून टॅक्सी करून जवळपास ३ तासांत उद्यानात पोहोचता येते. मुंबई किंवा पुण्याहून येत असल्यास पुणे-अहमदनगर महामार्गाने राष्ट्रीय उद्यानात पोहचता येते. तर ताडोबापासून सर्वात जवळचे बस स्थानक चिमूर हे असून, ते ३२ किमी अंतरावर आहे. राष्ट्रीय उद्यान आणि शेजारील शहरांदरम्यान नियमित बस सेवा उपलब्ध आहेत.

बुकिंग कसे करायचे ?
ताडोबा राष्ट्रीय उद्यानात सफारी बुक करण्याचा सर्वात सोपा आणि सोयीचा मार्ग म्हणजे राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे. ताडोबा राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन बुकिंगद्वारे, आपल्या पसंतीचा सफारी स्लॉट, वाहनाचा प्रकार निवडू शकता. सुरक्षित पेमेंट गेटवेद्वारे ऑनलाइन पेमेंट करू शकतात. पार्कमध्ये परवानगी असलेल्या वाहनांची संख्या मर्यादित असल्याने सफारी आधीच बुक करणे सोयीस्कर आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.