७ नोव्हेंबरला न्यूझीलंडने अफगाणिस्तानला हरवले आणि भारताच्या दृष्टीने टी २० विश्वचषक स्पर्धेचे सूप वाजले. त्यानंतर नेहमीप्रमाणे संघाच्या, क्रिकेट मंडळांच्या नावाने शिमगा करण्याचा माध्यमांचा तसेच क्रिकेट रसिकांचा नेहमीचा कार्यक्रम सुरु झाला. आजकाल प्रत्येक सामन्याकडे/स्पर्धेकडे एक सोहळा (event) म्हणून पाहण्याची जी प्रवृत्ती फोफावली आहे त्याचाच हा परिपाक आहे.
भारतात क्रिकेट म्हणजे सोन्याची अंड देणारी कोंबडी असल्याने प्रचंड आर्थिक हितसंबंध यात गुंतले आहेत त्यामुळे संघाच्या पराभवापेक्षा आर्थिक नुकसानीचे दुःख अधिक तीव्र असते आणि त्याचे खापर खेळाडूंवर व प्रशासकांवर फुटते.
तटस्थ वृत्तीने या पराभवाचे विश्लेषण करायचे म्हटल्यास खालील मुद्दे विचारात घ्यावे लागतील…

१ – संघाची निवड :-
या स्पर्धेसाठी संघाची निवड करताना चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने काही मूलभूत चुका केल्या. पहिली चूक म्हणजे इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या बहुतांशी कसोटी खेळाडूंना कायम ठेवण्यात आले. वरूण चक्रवर्ती व राहुल चहर हे दोन अपवाद सोडले तर बाकी सर्व खेळाडू कधी ना कधी भारतातर्फे कसोटी सामने खेळलेले होते. या सर्व खेळाडूंनी काही अपवाद वगळता वयाची तिशी पार केलेली होती त्यामुळे त्यांचा स्टॅमिना व चपळता इतर संघांच्या तुलनेत कमी होती.
दुसरी चूक म्हणजे चांगल्या अष्टपैलू खेळाडूंकडे दुर्लक्ष करून हार्दिक पांड्याला तो गोलंदाजी टाकू शकत नसताना सुद्धा दिलेले प्राधान्य. याचा फटका भारतीय संघाला बसला कारण आपल्याकडे जरुरीच्या वेळी उपयोगी ठरू शकणारा सहावा गोलंदाज उपलब्ध नव्हता. जडेजा हा एकमेव अष्टपैलू खेळाडू संघात होता. यापूर्वी जेव्हा जेव्हा भारताने स्पर्धा जिंकल्या आहेत त्यावेळी संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असे त्यामुळे गोलंदाजीत पुरेसे पर्याय उपलब्ध होत आणि फलंदाजी सुद्धा सखोल होत असे.
या वेळच्या संघात पहिले पाच जण निव्वळ फलंदाज तर जडेजा वगळता उरलेले चार जण निव्वळ गोलंदाज होते त्यामुळे संघाचे संतुलन बिघडले. फलंदाजीत सुद्धा देवदत्त पदिक्काल, ऋतुराज गायकवाड यासारख्या ताज्या दमाच्या सलामीवीरांपेक्षा रोहित व राहुल या दमलेल्या जोडीवर ठेवलेली भिस्त अंगाशी आली. दीपक चहर याला संघाबाहेर ठेवण्याचे तर्कशास्त्र समजले नाही. तो शाहीन आफ्रिदीप्रमाणेच झटपट पहिली विकेट काढू शकतो.

२ – नियोजनाचा अभाव :-
खरं म्हणजे भारतीय संघ व्यस्थापनाला दुबई, अबुधाबी येथील वातावरणाचा चांगला परिचय होता. नाणेफेक हरल्यास उत्तरार्धात गोलंदाजी करताना मैदानावरील दवाचा त्रास होईल हे लक्षात घेणे आवश्यक होते व त्यासाठी इंग्लंडप्रमाणे सराव करायला हवा होता. इंग्लंडने चेंडू व हात पाण्यात भिजवून गोलंदाजी करण्याचा सराव केला होता.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघानी भारतीय खेळाडूंचा पूर्ण अभ्यास करून रणनीती आखली होती. सुरवातीला धावा रोखून धरून त्यांनी भारतावरील दडपण वाढवत नेले आणि फलंदाजांना उंच फटके मारण्यास उदुक्त करून विकेट्स काढल्या.
याउलट भारताकडे अशी कुठलीही योजना/अभ्यास नव्हता. पाकिस्तानची एकही विकेट आपण काढू शकलो नाही. रिझवान ऑन साईडलाच फटके मारून धावा जमवतो तर त्याला ऑफ साईडला खेळवून धावा रोखण्याचा प्रयत्न आपल्या एकाही गोलंदाजाने केला नाही.
३ – धावा पळण्यातील कुचराई :-
आपले फलंदाज एकेरी, दुहेरी धावा घेऊन धावफलक हलता ठेवण्यात अपयशी ठरले. क्षेत्ररक्षणातील ‘गॅप्सचा’ फायदा त्यांनी उठवला नाही. एका वेळी तीन धावा काढण्याचा प्रयत्न ते करतच नव्हते. न्यूझीलंडविरुद्ध, जी सगळ्यात दूर सीमारेषा होती, त्याच बाजूला उंच फटके मारून भारतीय फलंदाज बाद झाले. बाकीच्या संघांचे फलंदाज जवळ असलेल्या सीमारेषेच्या दिशेने फटके खेळून चौकार/षटकार वसूल करत होते.

४ – होमवर्क कमी पडले :-
पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी याचा तुफान वेग आणि अचूकता याला तोंड देण्यासाठी कुठलेही धोरण भारताने आखल्याचे दिसले नाही. तीच गत न्यूझीलंडविरुद्ध झाली. बोल्ट आणि सौदी हे शॉर्ट ऑफ गुड लेंग्थ गोलंदाजी करत होते त्याला आपल्याकडे उत्तर नव्हते.
वरील उणिवा लक्षात घेता नुसते नाणेफेक हरणे हे पराभवाचे एकमेव कारण होऊ शकत नाही हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळेच भारताला साखळी स्पर्धेतच चंबूगबाळे आवरावे लागले. अर्थात एक स्पर्धा हरली म्हणून काही जगबुडी होत नाही. यातून बोध घेऊन चुका दुरुस्त केल्या तर २०२२ ची टी२० स्पर्धेत आपण आपली कामगिरी उंचावू शकतो. घोडामैदान जवळच आहे.
– रघुनंदन भागवत
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.