संयुक्त अरब अमिरात (Dubai) आणि ओमान येथे १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या T20 विश्व चषक स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघावरून नजर टाकली असता एक गोष्ट जाणवते की निवड समितीने अनुभवी खेळाडूंना जास्त प्राधान्य दिले आहे.
या संघात चार निव्वळ फलंदाज, पाच फिरकी गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू व तीन जलदगती गोलंदाज आणि दोन यष्टीरक्षक निवडले आहेत. श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर व दीपक चहर हे राखीव खेळाडू आहेत.
सलामीची जोडी म्हणून रोहित व राहुल या कसोटीतील जोडीलाच प्राधान्य दिले आहे तसेच द्रुतगती गोलंदाज म्हणून बुमराह, शमी आणि भुवनेश्वर कुमार याना निवडलं आहे. फिरकी गोलंदाज म्हणून अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल या कसोटी गोलंदाजांबरोबर राहुल चहर आणि वरूण चक्रवर्ती याना निवडलं आहे. हार्दिक पंड्या हा अष्टपैलू खेळाडू आहे.
सलामीचा अतिरिक्त फलंदाज म्हणून ईशान किशन याची निवड झाली आहे. तो यष्टीरक्षक सुद्धा आहे. मला असे वाटते की देवदत्त पदिक्कल या कर्नाटकच्या खेळाडूची निवड सलामीचा फलंदाज म्हणून व्हावयास हवी होती. पड्डीक्कलने गेल्या दोन IPL मोसमात छाप पाडली आहे. त्याचे वय पण लहान आहे त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने चांगली गुंतवणूक झाली असती.
ऋषभ पंतला (Rishabh Pant) यष्टीरक्षक म्हणून के एल राहुलचा (KL Rahul) पर्याय आहेच त्यामुळे ईशान किशनऐवजी पड्डीकलची निवड अधिक योग्य ठरली असती.
चार वर्षानंतर अश्विनला (Ravichandran Ashwin) परत संघात घेण्यापेक्षा कृणाल पंड्या अधिक उपयुक्त ठरू शकला असता. तो डावखुरा फिरकी गोलंदाज तर आहेच शिवाय उपयुक्त डावखुरा फलंदाज आणि उत्तम क्षेत्ररक्षक सुद्धा आहे.

दीपक चहर राखीव खेळाडूंऐवजी मुख्य संघात हवा होता. शमीपेक्षा तो उपयुक्त ठरू शकला असता कारण तो चांगला फलंदाज पण आहे आणि सुरवातीलाच विकेट काढण्याची कला त्याला अवगत आहे. जुलै मध्ये श्रीलंकेत झालेल्या एक दिवसीय मालिकेत त्याने उत्तम कामगिरी केली होती. शमी, रवींद्र जडेजा व अश्विन यांना कसोटी क्रिकेटसाठी राखून ठेवणे अधिक संयुक्तिक ठरले असते.
शार्दूल ठाकूरला राखीव खेळाडू ठेवण्याचे प्रयोजन समजत नाही. इंग्लंडमध्ये त्याने कसोटीत अष्टपैलू कामगिरी केली. तसेच 2020 च्या न्यूझीलंड दौऱ्यावर T20 मालिकेत त्याने डेथ ओव्हर्स मध्ये चांगली गोलंदाजी केली होती.
वरूण चक्रवर्तीला (Varun Chakravarthy) निवडून निवड समितीने जुगार खेळला आहे. तो एकतर तिशीला आला आहे आणि फक्त IPL च्या शिदोरीवर त्याची निवड झाली आहे.
लेग स्पिनर राहुल चहर (Rahul Chahar) ऐवजी यजुवेंद्र चहल आपल्या अनुभवाच्या जोरावर अधिक उपयुक्त ठरू शकला असता.
सरतेशेवटी धोनीला (Mahendra Singh Dhoni) मेंटॉर करून सत्तेची दोन केंद्रे तयार केली आहेत. शास्त्रीशी त्याचे मतभेद झाले तर अंतिम शब्द कोणाचा असेल त्याचा खुलासा आधीच होणे आवश्यक आहे अन्यथा संघाच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होऊ शकतो ही गावस्करांची भीती अगदी रास्त आहे.
एकूणच निवड समितीची धारणा जुने ते सोने अशी दिसत असून 2007 नंतर सतत हुलकावणी देणारा सोनेरी विश्व चषक हेच ‘जुने सोने’ भारतात आणेल असा विश्वास निवडलेल्या भारतीय संघावर दाखवला आहे असे म्हणावे लागेल.
– रघुनंदन भागवत
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.