अनेक वर्षांपासून हृदयविकारांकडे वृद्धांची समस्या म्हणून पाहिले जात होते. मात्र, गेल्या दशकात बिघडलेल्या जीवनशैलीच्या सवयी आणि आहारातील गडबड यामुळे तरुण लोकही या गंभीर समस्येला बळी पडत आहेत. हृदयविकाराची वेळीच काळजी घेतली नाही, तर गंभीर परिस्थितीत हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो. हृदयविकाराचा(heart attack) झटका ही आपत्कालीन स्थिती आहे, ज्यामध्ये वेळेवर उपचार न केल्यास मृत्यू देखील होऊ शकतो.
हृदयाचा रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. रक्तातील हा अडथळा अनेक कारणांमुळे निर्माण होऊ शकतो. जसे की फॅट्स, कोलेस्टेरॉल इत्यादी. हे पदार्थ रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागतात आणि रक्ताचा सामान्य प्रवाह रोखतात. रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाल्यामुळे हृदयाच्या स्नायूंना नुकसान व्हायला सुरुवात होते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हृदयविकाराचा (heart attack) झटका येण्यापूर्वी शरीरात अनेक प्रकारचे बदल दिसून येतात, ज्याची वेळीच काळजी घेतल्यास हृदयविकारापासून बचाव करता येतो. सर्व लोकांनी अशा लक्षणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे, जेणेकरून ही गंभीर आरोग्य समस्या टाळता येईल. चला जाणून घेऊया की, कोणत्या लक्षणांच्या आधारे हृदयविकाराचा धोका ओळखता येतो?
=====
हे देखील वाचा – कोरोना महामारी नंतर पसरतोय ‘हा’ संसर्गजन्य रोग,कशी घ्याल काळजी ?
=====
छातीत अस्वस्थता
छातीत अस्वस्थता हे हृदयविकाराच्या झटक्याचे सर्वात सामान्य लक्षण आहे. छातीत सतत दाब, वेदना होणे हे हृदयविकाराच्या (heart attack) झटक्याचे लक्षण मानले जाते. या प्रकारची समस्या प्रामुख्याने डाव्या बाजूला उद्भवते. तर काही परिस्थितींमध्ये वेदना खूप तीव्र असू शकतात. जर तुम्हाला छातीत सतत अस्वस्थता जाणवत असेल, तर त्याबद्दल तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
शरीराच्या इतर भागांच्या समस्या
हृदयविकाराचा (heart attack) झटका येण्यापूर्वी छातीशिवाय शरीराच्या इतर भागांमध्येही अनेक समस्या उद्भवू शकतात, ज्यावर सर्वांनी लक्ष देणे आवश्यक आहे. एक किंवा दोन्ही हात, पाठ, मान, जबडा यात वेदना आणि अस्वस्थता जाणवणे, हे देखील हृदयाच्या समस्यांचे लक्षण मानले जाते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. हृदयविकाराचा झटका ही एक जीवघेणी स्थिती आहे, म्हणून त्याच्या लक्षणांच्या तीव्रतेकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे.
श्वासोच्छवासाच्या समस्या
हृदयविकाराच्या बाबतीत, विशेषत: हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी श्वासोच्छवासाच्या समस्या देखील सामान्य मानले जातात. जर तुम्हाला छातीत दुखत असेल किंवा श्वास घेण्यात त्रास होत असेल, तर या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अशा समस्या हार्ट अटॅकचे लक्षण असू शकतात. या सततच्या समस्यांबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घ्या, जेणेकरून हृदयविकाराचा संभाव्य धोका टाळता येईल.
‘या’ लक्षणांकडेही द्या लक्ष
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हृदयविकाराचा (heart attack) झटका येण्याअगोदर शरीरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. सामान्यत: आपण सर्वच अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. मात्र असे केल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. या लक्षणांबाबत सर्व लोकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.
– छाती किंवा हातामध्ये दाब आणि किंवा वेदना जाणवणे.
– छातीचे दुखणे तुमची मान, जबडा किंवा पाठीपर्यंत पसरू शकते.
– मळमळ, अपचन किंवा पोटदुखी.
– सर्वसाधारणपणे श्वास घेण्यात अडचण जाणवणे.
– जास्त घाम येणे किंवा सतत थकवा जाणवणे.
– चक्कर येणे.